मराठी तितुकी मेळवावी

0

परदेशस्थ मराठी भाषक आपले भाषक संस्कार विसरलेले नाहीत. मराठी भाषा आपल्या पुढच्या पिढीलादेखील भाषिक गोडवा देत राहावी व संस्कार करत राहावी यासाठीच परदेशस्थ मराठी भाषक धडपडताना दिसतात. आपल्या भाषेची नाळ जुळून राहावी यासाठी हे परदेशस्थ मराठी भाषकांचे भाषासंवर्धन नक्कीच कौतुकास्पद व आपल्याला अंतर्मुख करणारे आहे.
……………………….

पृथ्वीतलावर माणूस म्हणून जन्माला येणार्‍या प्रत्येक जीवाला जशी आई गरजेची असते, तशीच बोलण्यासाठी मातृभाषा आवश्यक असते. जन्माला आल्यानंतर कानी पडणारी व नंतर विचारविनिमय करता येणारी भाषा त्या बाळाची मातृभाषाच असते. माणसाच्या सर्वांगीण विकासाचा आधार मातृभाषा असते. त्याच्यावरील सर्व संस्कार, त्याचे सर्व व्यवहार मातृभाषेद्वारेचं पार पडत असतात. त्यामुळे मातृभाषेच्या माध्यमातूनच माणसाची नाळ आपल्या संस्कृतीशी, परंपरांशी जोडलेली राहते.

कोणत्याही माणसाची सामाजिक आणि भाषिक ओळख त्याच्या मातृभाषेद्वारेच होत असते. मराठी भाषक जेव्हा परदेशात जातात, तेव्हा त्यांची ओळख मराठी माणसं’ अशीच होते. शिक्षणानिमित्त, नोकरी-धंद्यानिमित्त जेव्हा ही माणसं आपले आप्तस्वकीय, मातृभूमी सोडून दूर देशी जातात, तेव्हा ते आपल्या मातृभाषेलाही पारखे झालेले असतात. त्या परमुलखात ते आपल्या प्रियजनांप्रमाणे मराठी भाषेच्या गोडव्याला मुकलेले असतात. माणूस जसा आपल्या आईला विसरू शकत नाही, तसा तो आपल्या मातृभाषेलाही विसरू शकत नाही. जगाच्या कानाकोपर्‍यात राहत असलेले मराठी भाषक आपली भाषा विस्मृतीत जाऊ नये, पुढच्या पिढीपर्यंत तिचे वहन कायम होत राहवे, ह्या विचाराने त्या परमुलखांत आपापल्यापरीने मराठीचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करीत असतात. हे काम एकट्यादुकट्याचे नसल्याने परदेशात स्थायिक झालेल्या अनेक महाराष्ट्रीयन लोकांनी एकत्र येऊन त्या-त्या देशांत बृहन्महाराष्ट्र मंडळे स्थापन केली आहेत. त्याद्वारे ते आपले उत्सव साजरे करत आपली संस्कृती जपण्याचा तर प्रयत्न करत असतातच, त्यासोबतच पुढील पिढीलादेखील संस्कृतीची ओळख करून देत असतात. ही महाराष्ट्र मंडळे तेथे मकरसंक्रात, गुढीपाडवा, महाराष्ट्र दिन, गणेशोत्सव, दसरा व दिवाळी यांसारखे सण साजरे करतानाच महाराष्ट्रीय संस्कृतीचा व मराठी भाषेच्या संवर्धनाचा प्रयत्न करताना दिसतात. शास्त्रीय संगीत, भावगीतगायन अथवा वाद्यवादनाचे विविध कार्यक्रम मराठी कलाकारांना बोलावून तिथे आयोजित करतात. कित्येक देशांमध्ये मराठी नाटकांचा महिना-दोन महिन्यांचा दौरा देशभर आयोजित केला जातो. अशा कार्यक्रमांना परदेशात मराठी माणसांचा उदंड प्रतिसाद मिळत असतो. दौर्‍यावर आलेल्या नाटकाच्या संपूर्ण संचाला तिथल्या मराठी कुटुंबामध्ये राहायला बोलावले जाते. कलाकारांसोबत भेटून, राहून ही परदेशस्थ मराठी कुटुंबं सुंदर भाषिक अनुभवाच्या संचिताची साठवण आपल्या पुढील पिढीसाठी करताना दिसतात.

परदेशात राहत असल्यामुळे अनेकांना त्या-त्या देशातली भाषा व्यवहारात आणावी लागते. पण आपली मराठी भाषा आपल्या मुलाबाळांना उत्तमपणे बोलता यावी यासाठी ही मराठी माणसं जाणीवपूर्वक घरात मराठीतच बोलताना दिसतात. त्यामुळे खूप वर्षे  दूर राहूनही त्यांची वाणी मराठमोळी राहिलेली आहे. महाराष्ट्रातल्या मराठी घरांमध्ये जसे लहान मुलांना शुभंकरोती, स्तोत्रे, श्लोक इत्यादी शिकवून संस्कार केले जातात, तसे तिथले मराठी पालक आपल्या मुलांना जमेल तसं मातृभाषेत संस्कार करण्याचा प्रयत्न करत असतात. कित्येक पालक आपल्या मुलांसोबत बसून मराठी चित्रपट, मराठी कार्यक्रम आवर्जून बघतात. देऊळ, ग्रंथालय किंवा कम्युनिटी सेंटरमध्ये शनिवार, रविवार चालणार्‍या मराठी शाळांमध्ये मराठी पालक जाणीवपूर्वक आपल्या पाल्यांना मराठी शिकण्यासाठी पाठवतात. त्या शाळेत होणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमांत मुलांना भाग घ्यायला लावतात. परदेशात जन्माला आलेल्या व वाढलेल्या मुलांना मराठी शिकणं थोडं अवघड जात असतं. पण तरी ती मुलं आपली मातृभाषा अभिमानाने शिकण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यांच्या पालकांचा मुलांवर मातृभाषेचा संस्कार करण्याचा अट्टहास खरंच वाखाणण्याजोगा आहे.

परदेशस्थ मराठी माणसं आपले सगळे सण पारंपरिक पद्धतीने साजरे करताना दिसतात. हे करताना ते पारंपरिक पदार्थ बनवतात. पारंपरिक वेशभूषा परिधान करून देवाची साग्रसंगीत पूजाअर्चा करतात. बासुंदी, मोदक, जिलेबी, पुरणपोळी, पिठले भाकरी, ठेचा असे पारंपरिक पदार्थ बनवून ते आपलं मराठीपण जपत असतात. गुढीपाडव्याला गुढी उभारून ढोलताशा व लेझिमच्या तालावर पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रा काढून मराठी नववर्षाची सुरुवात उत्साहाने करतात. तिथे अनंत चतुर्दशीपर्यंत मराठमोळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. ह्या कालावधीत लहानथोरांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. जसे, मोठ्या माणसांसाठी नाट्यस्पर्धा, लहान मुलांसाठी विविध गुणदर्शन दाखविणार्‍या स्पर्धा इत्यादी. ह्या स्पर्धांमधून मराठीपण जपण्याचाच प्रयत्न ही मराठी माणसं करत असतात.

परदेशात फक्त सण साजरे करून मराठी माणूस मराठी भाषेचे संवर्धन करत नाही, तर मराठीला जिवंत ठेवण्यासाठी खास रेडिओ स्टेशन चालविले जातात. जिथे मराठी गाणी वाजविली जातात, मराठी कथा-कविता सादर केल्या जातात. परदेशस्थ मराठी कवींची ऑनलाईन संमेलनं, चर्चासत्रे आयोजित केली जातात.

‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ असा उपदेश 17व्या शतकात संत रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिला होता. याचा अर्थ असा होता की मराठी जनतेला एकत्र आणून मराठी संस्कृतीचे जतन करावे व आपली मराठी संस्कृती वाढवावी. आज 21व्या शतकात परदेशस्थ मराठी भाषिक ह्या उपदेशाचे पालन करताना आपल्याला पाहायला मिळतात. ही परदेशस्थ मंडळी मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी काय-काय करतात हे त्यांनी त्या-त्या देशांत केलेल्या प्रयत्नांतून आपल्याला कळेल. जसे- अमेरिकेतल्या लॉस एंजिलीसचे महाराष्ट्र मंडळ 40 वर्षांपासून दक्षिण कॅलिफॉर्नियातल्या मराठी माणसांना एकत्र आणण्याचे व मराठी भाषेच्या संवर्धनाचे काम करते आहे. अवघ्या काही कुटुंबांनी एकत्र येऊन सुरू केलेले महाराष्ट्र मंडळ आज हजारो मराठी लोकांना एकत्र आणणारे त्यांचे माहेरघर झाले आहे. आजच्या तारखेस महाराष्ट्र मंडळात 250 ते 300 कुटुंब सहभागी झाली आहेत. दरवर्षी ह्या सभासदांमधून 11-13 सदस्यांची कार्यकारिणी विविध उपक्रम राबवून आपली महाराष्ट्रीय संस्कृती व मराठी भाषा जतन करण्याचा प्रयत्न करताना दिसते. लॉस एंजिलीस सारख्या मोठ्या शहरात विखुरलेली मराठी कुटुंबं सणानिमित्त एकत्र येऊन भाषिक आदानप्रदान करत पारंपरिक पद्धतीने सण साजरे करतात. याशिवाय स्थानिक कलाकार ह्या उत्सवात आपल्या कलेचे प्रदर्शन करून मराठीच्या संवर्धनास हातभार लावतात. आपल्या आईवडिलांचा उत्साह पाहून आज इथली अनिवासी मराठी मुले मोठ्या संख्येने मंडळात सामील होऊन मराठीचा पाठपुरावा करताना दिसतात. मराठी माणसांची मराठी वाचनाची भूक भागविण्यासाठी मंडळातर्फे मराठी पुस्तकांचे फिरते पुस्तकालय चालू केले आहे, ज्यात क्षुल्लक किंमतीत पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. दरवर्षी ’उत्सव’ हा दिवाळी विशेषांक लॉस एंजिलिसमध्ये प्रकाशित केला जातो, ज्यातून तिथल्या मराठी भाषकांची सर्जनशीलता दिसून येते.

अनिवासी मराठी मुलांना आपल्या मायबोलीची ओळख व्हावी, त्यांना आपली संस्कृती कळावी ह्या उद्देशाने अमेरिकेतल्या अनेक शहरांत पालकांनी पुढाकार घेऊन शनिवार, रविवार चालणार्‍या मराठी शाळा सुरू केल्या आहेत. ह्या शाळांमधून शिकवण्यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाने खास अभ्यासक्रम तयार करून घेतला आहे. ह्या अभ्यासक्रमात अमेरिकेतील रोजच्या जीवनातील आणि मुलांच्या ओळखीचे संदर्भ घेतले आहेत. या अभ्यासक्रमाला 2009-10च्या दरम्यान भारती विद्यापीठ, पुणे यांची मान्यता मिळाली असून उत्तर अमेरिकेतल्या बहुतांशी शाळेत हा अभ्यासक्रम शिकवला जातो आहे. अमेरिकेतल्या काही राज्यांनी मराठीला सेकंड लॅँग्वेज, अर्थात दुसर्‍या भाषेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे मराठी शिकणार्‍या मुलांना हायस्कूलमध्ये परदेशी भाषा (मराठी) शिकल्याबद्दल श्रेयगुण(क्रेडिट्स) मिळतात. ते गुण त्यांना युनिव्हर्सिटी प्रवेशासाठी उपयुक्त ठरतात.

भारताबाहेर राहूनही मुलांनी आपली मातृभाषा साध्या सोप्या पद्धतीने शिकावी, त्यांना आपले विचार मराठीत मांडता यावेत आणि सहजरित्या मराठीत संवाद साधता यावा, मुलांना आपले संस्कार, संस्कृती व इतिहास इत्यादी कळावे आणि आपले सण, त्यामागील शास्त्र समजावे यासाठी 2011साली सिएटल महाराष्ट्र मंडळाच्या स्वयंसेवकांनी तिथे मराठी शाळा सुरू केली होती. ती शाळा 2013पर्यंत चालू राहिली. त्यानंतर आता पुन्हा 2022पासून तिथे मराठी शाळा सुरू करण्यात आलेली असून तिथे मराठीच्या संवर्धनाचे काम पुन्हा सुरू झाले आहे.

ऑस्ट्रेलिया देशात मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी तिथे स्थायिक असलेल्या मराठी भाषकांनी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ह्या राज्याची राजधानी असणार्‍या पर्थ ह्या मोठ्या शहरात 2012 साली ’पर्थ महाराष्ट्र’ मंडळाची स्थापना केली. मराठी भाषेचा, साहित्याचा आणि संस्कृतीचा प्रसार व्हावा, मराठी भाषिकांचे ऋणानुबंध वाढावेत ह्या हेतूने हे मंडळ स्थापन करण्यात आले आहे. दरवर्षी ह्या मंडळातर्फे महाराष्ट्र आणि मराठी भाषेशी जोडणारे सांस्कृतिक, कला, साहित्य क्षेत्रातील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. तसेच कोणत्याही महिन्यात पाचवा शुक्रवार आल्यास मंडळातील सदस्यांच्यावतीने पर्थमधील देवळामध्ये प्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. त्याचप्रमाणे दर तीन महिन्यांनी ’रेडिओ संगम पर्थ’तर्फे एफएम 95.3वरुन मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात येतो. विविध खेळांच्या स्पर्धांचे, वार्षिक सहलीचे मंडळाकडून आयोजन करण्यात येते. पर्थमधल्या एकूण मराठी लोकसंख्येच्या पन्नास टक्के लोक महाराष्ट्र मंडळाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपस्थित असतात. दर तीन महिन्यांनी मंडळाच्या उपक्रमांचा आढावा मराठीत प्रसिद्ध होणार्‍या नियतकालिकात हे मंडळ घेत असून त्याच्या आधारे पुढील धोरणे ठरवतं. भविष्यात पर्थमध्ये नव्याने येणार्‍या मराठी भाषिक लोकांकरिता मार्गदर्शक फोरम सुरू करण्याचा व मराठी भाषा, संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच मराठी सिनेमा आणि नाटके पर्थमध्ये उपलब्ध करून देण्याचा मानस महाराष्ट्र मंडळाने जाहीर केला आहे.

जपानमधील मराठी भाषिकांना एकत्र आणण्याकरिता व मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जतनाकरिता एदोगावा भारतीय सांस्कृतिक कलामंदिर, टोकियो मराठी मंडळ व इतर संस्था मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असून, मराठी भाषा संवर्धनास हातभार लावीत आहेत. मराठी भाषा जपानमध्ये शिकविण्यासाठी शासनातर्फे झालेल्या करारानुसार मराठी माध्यमातील पुस्तके ही जपानमध्ये मराठी शिकणार्‍या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या पाठ्यपुस्तकांत जपानमधील गरजेप्रमाणे 20 टक्के बदल करण्याची मुभा दिली गेली आहे. जे विद्यार्थी येथील मराठी आणि राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा देतील त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून प्रमाणपत्रे दिली जाणार असून, जपानमधील शिक्षकांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षण दिले जाणार आहे. मराठी बांधव आणि मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी जपानमध्ये वाचनालय तयार करण्याचा प्रयत्नही केला जात आहे.

मराठी माणूस कोणत्याही देशात गेला आणि तेथील देशातील वातावरणाशी मिळते जुळते घेऊन राहायला लागला तरी आपली भाषा आणि संस्कृती टिकवून ठेवणे त्याला जरूरीचे वाटते. जर्मनीत स्थायिक झालेली मराठी माणसे देखील आपली भाषा, संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. 2014ला मराठी तरूणांनी एकत्र येऊन फ्रँकफर्ट येथे ’मराठी कट्टा’ स्थापन केला आहे. त्या कट्ट्यातर्फे सण, उत्सव एकत्र साजरे केले जातात. जुन्या व नव्या पिढीतील भाषेचा फरक नाहीसा करण्यासाठी कट्ट्यातर्फे मराठी शाळा व वाचनालय सुरू केले आहे. नवीन पिढीला मराठी शिकवून हे मंडळ मराठीचे संवर्धन करते आहे. इतकंच नाही तर मराठी चित्रपट तिथल्या चित्रपटगृहात दाखवून मिळणारा नफा महाराष्ट्रातल्या स्वयंसेवी संस्थाना देण्याचा, वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर शिबिरे आयोजित करण्याचा उपक्रमदेखील हा कट्टा राबवत आहे. मराठी कट्ट्यासारखी मराठी मंडळे बर्लिन, हॅम्बुर्ग इत्यादी शहारात चालवली जात असून, त्या मंडळांच्या विविध उपक्रमांतून मराठी भाषेचे जर्मनीत संवर्धन केले जात आहे.

इस्त्रायल देशात राहणार्‍या भारतीय ज्यू लोकांपैकी 70टक्क्याहून स्थायिक ज्यू लोकांचे पूर्वज महाराष्ट्र राज्यातून स्थलांतरीत झालेले आहेत. त्यामुळे तेथे अजूनही मराठी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते. मराठी बोलणार्‍या ज्यू लोकांचे ’आमची शैली’ नावाचे ठाण्यातून प्रकाशित होणारे मराठी मासिक आजही जगभर असणार्‍या ज्यू लोकांपर्यंत पोहचते आहे. यात बेने इस्त्रायली समाजाने लिहिलेल्या लघुकथा, कविता, त्यांचे उत्सव, कार्यक्रम, मृत्युलेख, मुलाखती इत्याही गोष्टी प्रसिद्ध होत असतात. इस्त्रायलमध्ये हे मासिक लोकप्रिय असून ते मराठी भाषा संवर्धनात मोलाची कामगिरी पार पाडत आहे.

इंग्लडमधील शेफील्ड ह्या सर्वांत मोठ्या शहरात ’शेफील्ड मराठी सांस्कृतिक मंडळ’ 1990पासून मराठी भाषा, संस्कृती तिथल्या मराठी कुटुंबामध्ये टिकवण्याचा प्रयत्न करत आहे. मराठी भाषेबद्दलची ओढ, तिच्या विविध कला, छटा यांचे दर्शन ह्या मंडळाच्या छोट्यामोठ्या कार्यक्रमांतून दिसत असते. त्याचबरोबर घराघरांतले मराठी संस्कार पुढच्या पिढीत रूजण्यासाठी संस्कार वर्ग येथे चालविले जातात. लंडनमधल्या मराठी मुलांना मराठी भाषा समजावी व तिचा प्रचार व्हावा यासाठी महाराष्ट्र मंडळ, लंडनतर्फे चालवल्या जात असलेल्या शाळांमधल्या पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम शिकण्याची सोय गेल्या वर्षीपासून करण्यात आलेली आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स संस्थेत गेल्या वर्षी मराठी विद्यार्थ्यांनी मराठी वाड्.मय मंडळ स्थापन केले आहे. ह्या मंडळातर्फे वेगवेगळे साहित्यिक कार्यक्रम, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, मराठी भाषा दिन असे अनेक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. त्याचबरोबर मंडळाच्या सदस्यांनी लिहिलेले लेख, कविता इत्यादी साहित्य मराठी अंक काढून प्रकाशित केले जाणार आहेत.

हॉलंडमध्ये राहणार्‍या मराठी मंडळींनीही एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करायला सुरुवात केल्यावर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून ’रश्मिन’ हा दिवाळी अंक काढला. आपलं मराठीपण जपण्यासाठी हॉलंड व नेदरलँडमधले मराठी हौशी कलाकार एकत्र येऊन मराठी सुगम संगीताच्या मैफिली करत आहेत व आपल्या भाषेचा गोडवा तिथल्या मराठी लोकांमध्ये रूजवताना दिसत आहेत.

थोडक्यात काय, तर परदेशस्थ मराठी भाषक भलेही आपली मातृभूमी सोडून परदेशात स्थायिक झाले असतील, पण ते आपले भाषक संस्कार विसरलेले नाहीत. आपल्या अभिजात भाषेचा त्यांना खूप अभिमान आहे. अमृतातेंही पैजा जिंकणारी आपली गोड मराठी भाषा आपल्या पुढच्या पिढीलादेखील भाषिक गोडवा देत राहावी व संस्कार करत राहावी यासाठीच परदेशस्थ मराठी भाषक धडपडताना दिसतात. आपल्या भाषेची नाळ जुळून राहावी यासाठी हे परदेशस्थ मराठी भाषकांचे भाषासंवर्धन नक्कीच कौतुकास्पद व आपल्याला अंतर्मुख करणारे आहे.

– मंगल कातकर

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech