मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. पण मराठी भाषेची वैशिष्ट्ये टिकवून ठेवण्याची, तिचा अधिकाधिक वापर करण्याची, त्यातील बोली व प्रमाण भाषा टिकवण्याची जबाबदारी समाजाची आहे.
आजची माध्यमे आणि व्याकरणशुद्धता हा खूपच बोजड विषय आहे. तो लेखापेक्षा प्रबंधाचाच विषय वाटतो. विषयात व्यकरणाचाच उल्लेख असला तरी संपादकांना त्यासोबत शुद्धलेखनही अपेक्षित असणार. व्याकरण आणि शुद्धलेखन ह्या दोन वेगळ्या बाबी आहेत. ढोबळ मनाने सांगायचे तर शुद्धलेखन हे शब्दांचे लिहिणे व उच्चार याविषयी असते आणि व्यकरणाचा संदर्भ वाक्यरचनेशी असतो. मात्र ह्या दोन्ही गोष्टी परस्परपूरक आहेत. त्यामुळे इथेही माध्यमांची व्याकरणशुद्धता असे म्हटले असले तरी त्यात शुद्धलेखन अभिप्रेत असणार. याचे कारण आज सर्वत्र केवळ माध्यमांच्या व्याकरणापुरते प्रश्न उपस्थित केले जात नसून, शुद्धलेखनाचाही वारंवार उल्लेख होतो आहे. व्याकरण व शुद्धलेखन ह्या दोन्हीवर अनेक जण तुटून पडताना दिसतात. माध्यमांची भाषा बिघडली, असे ते म्हणतात, तेव्हा त्यात दोन्हीचे संदर्भ असतात, असो. आता मूळ मुद्द्याकडे वळण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करणे गरजेचे आहे आणि ती म्हणजे इथे फक्त मराठी माध्यमांचा विचार आहे. इंग्रजी व हिंदी माध्यमांचा विचार नसेल. मात्र हिंदी व इंग्रजीचा मराठी शुद्धलेखन व व्याकरण यावर जो प्रचंड परिणाम होत आहे, त्याची दखल घ्यायलाच हवी. अन्य भाषेतील शब्दांचा जो चुकीच्या पद्धतीने वापर होतो, हेही सांगायलाच हवे. हे विशेषत: इलेक्ट्रॉनिक म्हणजेच दृक-श्राव्य माध्यमांच्या बाबतीत दिसते. अनेकदा खासगी वा सरकारी वृत्तवाहिनीचा वार्ताहर संबंधित गाव वा शहरातील बातमीची सविस्तर माहिती देताना, ‘मी इथे जो उभा आहे, तिथे काल रात्री मोठा अपघात झाल्याचे पाहावयास मिळत आहे. ह्या ठिकाणी ती बस दरीत कोसळली असल्याचे सांगण्यात येत असून, अपघातातील जखमींना रुग्णालयात नेल्याचे दिसत आहे,’ अशी वाक्ये एकवत असतो. मुळात, ‘आमचे वार्ताहर अमूकतमूक तिथे उपस्थित असून, ते अपघाताविषयी सविस्तर माहिती देतील’, असे वृत्त निवेदकाने सांगितल्यावर ‘मी इथे जो उभा आहे’ हे सांगण्याची गरज काय? शिवाय काल रात्री अपघात झाला असेल तर तो पाहावयास कसा मिळणार? समजा, अपघात पाहायला मिळाला, तर बस ‘इथे कोसळल्याचे सांगण्यात येत आहे’, ह्या वाक्याची गरजच नाही. त्यापुढील वाक्य तर हास्यास्पद. ‘जखमींना रुग्णालयात नेल्याचे दिसत आहे.’ ज्यांना रुग्णालयात काल रात्री नेले ते दृश्य दुसर्या दिवशी दिसणार कसे? अन्य भाषेचे काही शब्द येणार, हे स्पष्ट आहे. पण वाक्यरचना व मांडणी हिंदी पद्धतीने होत असल्याने आपल्या भाषेत असलेली गंमत संपते.
हे मराठी बातम्यांतील एखादे उदाहरण नाही. सरसकट अशी भाषा आणि व्याकरण दिसत राहते. वाक्याची सुरुवात किमान ५० टक्के वेळा ‘नक्कीच’ पासून का होते, हे तर समजूच शकत नाही. बर्याचदा वृत्त निवेदकच पूर्ण बातमी आपल्याला आणि संबंधित वार्ताहराला ऐकवतो. त्यामुळे वार्ताहर ‘नक्की’ ह्या शब्दाने वाक्य सुरू करतो. बहुसंख्य वार्ताहर आणि वृत्त निवेदकांना वाक्य संपवायचे असते, हे जणू माहीतच नसते. त्यामुळे ते ‘आणि म्हणून’, ‘आणि म्हणून’ने वाक्याला वाक्य जोडत असतात. कित्येकदा एका बातमीचे दोन वा तीन भाग असतात. पहिला भाग म्हणजे मुख्य बातमी, दुसर्या भागात त्याचे परिणाम आणि तिसरा भाग असतो सरकारी वा संबंधिताची प्रतिक्रिया वा तत्सम. अशा वेळी आणि म्हणूनने वाक्य जोडणे हास्यास्पद असते. आगीत सहा वा सात होरपळून मेले, शेजारच्या इमारतीचेही थोडे नुकसान झाले आणि सरकारची मदत असे तीन भाग वाक्य तोडूनच सांगायचे असतात. पण वार्ताहर न थांबता बोलतच सुटतो. त्याला थांबवण्याचे काम वृत्त निवेदकाला करावे लागते. निवेदकाने अडवले नाही तर बातमी संपतच नाही. अशा वेळच्या वाक्यात तर शुद्धलेखन वा व्याकरणाचा बोजवरा उडतो. टीव्हीवरील मराठी बातम्यांवर हिंदीचा प्रचंड प्रभाव जाणवतो. त्यामुळे अनेक चुकीचे शब्द सातत्याने वापरले जातात. त्यातील एक शब्द म्हणजे खुलासा. मराठीत खुलासाचा अर्थ स्पष्टीकरण असे आहे. हिंदीत तो शब्द आरोप म्हणून वापरला जातो. त्यामुळे मराठी बातम्यातही एखाद्याच्या आरोपाची बातमी सांगतांना ‘सनसनी खुलासा’, ‘मोठा खुलासा’ असा शब्दप्रयोग सर्रास केला जातो. त्याचप्रमाणे अमूक एकाने ‘साक्षात्कारमध्ये म्हटले आहे’, असे वाक्य सहज ऐकू येते. मराठीत ‘साक्षात्कार’ नव्हे, तर ‘मुलाखत’ म्हणतात, हे जणू त्यांच्या गावीच नसावे. आता टीव्हीसारख्या अत्यंत प्रभावी दृक-श्राव्य माध्यमामुळे लोकांना ‘व्यक्ती’ हा शब्द पुल्लिंगी वाटू लागला आहे. ‘तो व्यक्ती’ असे वारंवार टीव्हीवर ऐकू येते. ‘व्यक्ती’ हा शब्द स्त्रीलिंगी आहे, हे त्यांना कोण शिकवणार? ‘पोलीस’ हा शब्द हिंदीत स्त्रीलिंगी तर मराठीत पुल्लिंगी आहे. मध्यंतरी एका वाहिनीवर, ‘पोलीस आली होती’, असे ऐकून धक्काच बसला. टोमॅटोला ग्रामीण भागात टमाटी, तंबाटी, टांबाटी म्हटले जाते. त्यामुळे तसे म्हटले तर समजू शकू. ‘तो चहा’ऐवजी ‘ती चहा’ म्हणणेही समजण्यासारखे आहे. पण टीव्हीवर मराठीत ‘चाय’ म्हटले जाते, तेव्हा कसेसेच होते. एखादी व्यक्ती कामात गर्क (हा आता कोणीच वापरत नाही) असल्यास मराठीत त्यासाठी ‘व्यग्र’ असा शब्द आहे. हिंदीत मात्र ‘व्यस्त’ वापरला जातो. तो ऐकून मराठीतही ‘व्यग्र’साठी नेहमीच ‘व्यस्त’ शब्दाचा वापर रोजच्या रोज टीव्हीवर आणि वृत्तपत्रात होऊ लागला आहे. ‘व्यस्त’चा अर्थ प्रमाणातील फरक (एक अधिक, दुसरे कमी) असा आहे. त्यावरूनच अस्ताव्यस्त (उलटसुलट) हा शब्द आला आहे. ‘व्यस्त’ नव्हे, ‘व्यग्र’ शब्द वापर योग्य आहे, हे सांगूनही माध्यमातील पत्रकारांना मान्य होत नाही. ‘आमच्याकडे व्यस्तच वापरतात’, ‘व्यग्र व व्यस्त एकच’, असा दावा हल्ली केला जाऊ लागला आहे. ‘आवाहन’ व ‘आव्हान’ हे दोन वेगळे शब्द आहेत. पण नेहमीच दोन्ही शब्द चुकीच्या संदर्भात वापरले जातात. ‘आरोप सिद्ध करा, असे आवाहन दिले आहे’, असे म्हणणे चूकच. तिथे ‘आव्हान’ हा शब्द योग्य आहे, हे बहुधा एकही वृत्तवाहिनीतील संपादक व पत्रकारांना माहीत नसते. बर्याचदा तर ‘आव्हाण’ वा ‘आवाहण’ समोरच्या टीव्ही स्क्रीनवर दिसतं तेव्हा स्वत:चे डोके फोडून घ्यावेसे वाटते. ‘अमक्या तमक्याला पोलिसांनी अटक केली आहे’, असे लिहिणे व बातमीत सांगणे बंदच झाले आहे. त्याऐवजी ‘पोलिसांकडून अटक करण्यात आली’, असे निष्कारण जड वाक्य लिहिण्यात व वाचनात येऊ लागले आहे.
असाच एक आणखी वापरला जाणारा शब्द म्हणजे ‘हलक्यात घेणे वा घेऊ नका’, ‘स्वस्तात घेऊ नका’ वगैरे. हिंदीत नेहमी ‘मुझे हलके में नहीं लेना’, सस्ते में नहीं लेना’चे तसेच्या तसे भाषांतर कशासाठी? मराठीतील सर्व शब्द वा शब्दप्रयोग संपून गेले की काय? टीव्हीची भाषा वृत्तपत्रापेक्षा वेगळी असणार हे उघडच आहे. ती अधिक संवादी व प्रभावी असणे गरजेचे असते. तसेच ती संवादी होण्यासाठी बोलीभाषेचा वापर करणे स्वाभाविक आणि आवश्यकच असते. प्रमाण भाषेत सतत कोणी बोलू लागला की, ते ऐकणे निरस होते. बोली भाषा अधिक गोड आणि ऐकायला सुलभ वाटते, हे खरे असले तरी मूळ भाषेचे सौंदर्य व सौष्ठव टिकून राहणे गरजेचे असते. पण बोली भाषेच्या किंवा ग्रामीण वा स्थानिक मराठीच्या नावाखाली चुकीचे सांगितले जाते, तेव्हा धक्का बसतो. काही वेळा अगदी प्रमाण व काही वेळा बोली असा प्रकारही हास्यास्पद वाटतो. ऐकताना ते हमखास खटकते. सरकारी मराठी भाषा तर फारच बोजड व न कळणारी आहे. तशा अतिवाईट भाषेचे पुस्तकच सरकारने प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे मराठीचे खूप नुकसान झाले आहे. राज्य सरकारने अत्यंत क्लिष्ट भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे. सरकारी वाक्यरचना समजण्याच्या पलीकडची असते. ‘आदेश निर्गमित केले आहेत’, ‘प्रस्ताव पारित केला आहे’, ‘निर्देश दिले आहेत’, असे शब्दप्रयोग, संदिग्धता निर्माण करणारी सहा ते सात ओळींची मोठी वाक्ये यातून सरळ बातमी तयार करण्यात पत्रकारांची भंबेरी उडते. माध्यमांनी त्यातील शब्द, वाक्ये तशीच वापरण्याचे काहीच कारण नाही वा नव्हते. पण सरकारी पत्रकातील माहिती, बातमी जशीच्या तशी वापरण्याची सवय माध्यमांना लागली आहे. त्यामुळेही भाषा व व्याकरण बिघडले आहे. मध्यंतरी फाईलच्या ऐवजी ‘नस्ती’ हा शब्द टीव्हीवर पाहिला. आपण ‘नस्ती कटकट’ असे म्हणतो. पण सरकारची ‘नस्ती’ म्हणजे ‘फाईल.’ फाईल, टीव्ही, रेडिओ, टेबल हे इंग्रजी शब्द असले तरी ते मराठीत पूर्णपणे रूळले आहेत. असे असताना ‘नस्ती’ वगैरे शब्द कशासाठी वापरायचे? इंग्रजीच्या झेळपीं ेष ेीवशी ला ‘हरकतीची सूचना’ हा सोपा शब्द असताना ‘व्यवस्थेचा मुद्दा’ वा ‘आक्षेपाचा मुद्दा’ आणि Aवर्क्षेीीपाशपीं ोींळेप साठी ‘तहकुबी सूचना’ हा मराठी सोपा शब्द असताना ‘स्थगन प्रस्ताव’ असे जड सरकारी शब्द सर्वच माध्यमे नेहमीच वापरू लागली आहेत. मराठी अनिवार्य म्हणणार्या सरकारचा राज्यभाषेचे सौंदर्य व सोपेपणा यांच्याशी काहीच संबंध नाही. मात्र ते टिकवून ठेवण्याचे काम माध्यमांचे असते, याचाच त्यांना विसर पडला आहे. दृक-श्राव्य माध्यमांच्या इतकीच मुद्रित माध्यमे, म्हणजे वृत्तपत्रेही यास जबाबदार आहेत. हे वारंवार होत आहे. पण त्यास केवळ माध्यमे जबाबदार असे म्हणून चालणार नाही. असे होण्याची अनेक कारणे आहेत. एक कारण म्हणजे अलीकडच्या शहरी पिढीकडे फारशी शब्दसंपदा नाही. गणित, विज्ञान, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र ह्या विषयांना खूप महत्त्व देत असताना, भाषा म्हणजेच मराठीकडे, विद्यार्थ्यांचे म्हणजे एकूण ९० टक्के तरुणांचे दुर्लक्ष झाले व होत आहे. त्यांच्याशी बोलताना संभाषणात हिंदी व इंग्रजीचा सर्रास वापर दिसतो. आपल्याला भाषेत करिअर करता येत नाही, ह्या समजामुळे हे घडत आहे.
मराठी ह्या विषयात केवळ पास होण्याइतके मार्क मिळवण्याकडेच लक्ष दिले जाते. त्या तुलनेत इंग्रजीचाही अभ्यास अधिक केला जातो. समाजात फिरताना व नोकरीत इंग्रजी गरजेची वाटू लागल्यानेही मराठीकडे दुर्लक्ष होते. विशेषत: व्याकरण व शुद्धलेखनाकडे. शहरी भागात अभ्यासाची पुस्तके व अधूनमधून वृत्तपत्रे याखेरीज मराठीत वाचन होणे जवळपास थांबले आहे. त्यामुळे रोजच्या बोलण्यात जितके शब्द येतात, तेवढेच माहीत. औरंगाबादमध्ये जन्मलेली निकी तांबोळी ही मराठी अभिनेत्री ‘वांगी कशी टेस्ट करतात’, हे माहीत नाही, असे म्हणते. वास, सुवास व दुर्गंध यासाठी फक्त वास शब्दच माहीत असतो. अनेक भाज्यांची नावे माहीत नसतात. आपल्याला माहीत आहेत, त्या पलीकडे प्रचंड शब्द आहेत, आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्य व साहित्यिक आहेत, हे बर्याच तरुणांना माहीत नाही. मात्र यातील तरुण-तरुणींना टीव्हीच्या वृत्तवाहिन्या वा वृत्तपत्रात काम करण्याची इच्छा असते. टीव्हीवर दिसण्याची हौस तर अधिकच. अशा मंडळींमुळे माध्यमांचे व्याकरण व शुद्धलेखन बिघडते, हे उघड आहे. पण ह्याबद्दल तरुण विद्यार्थ्यांना सर्वं दोष देऊन चालणार नाही. पाचवी वा सातवीच्या विद्यार्थ्यांना सहजपणे चार मराठी वाक्ये वाचून दाखवता येत नसतील, तर तो दोष शिक्षकांचाच म्हणायला हवा.
कोणत्याही भाषेचा शिक्षक म्हणजे केवळ शिकविता येणारी व्यक्ती नव्हे. त्या व्यक्तीला भाषेची आवड हवी, भाषेतील साहित्य व साहित्यिक माहीत असायला हवेत. पण अनेकदा शिक्षकच गाईड वाचून धडे व कविता शिकवतात, असे मध्यंतरी वाचनात आले. अशी परिस्थिती असेल तर केवळ माध्यमांना दोष देऊन काय उपयोग? माध्यमांत येणारे लोकही याच शिक्षणव्यवस्थेतून, समाजातून येत असतात. समाजाची भाषा बिघडली असेल तर त्याचे दर्शन माध्यमांत दिसणारच. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. पण मराठी भाषेची वैशिष्ट्ये टिकवून ठेवण्याची, तिचा अधिकाधिक वापर करण्याची, त्यातील बोली व प्रमाण भाषा टिकवण्याची जबाबदारी समाजाची आहे. हल्ली मराठीतील साहित्यविषयक व अन्य परिसंवाद, कवी संमेलने आणि मराठी नाटके व चित्रपटांनाही हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. वाचक मिळत नसल्याने मराठी पुस्तके व ग्रंथ यांच्या आता जेमतेम ३०० वा ४०० प्रतीचे काढल्या जातात. मराठी मासिके व साप्ताहिके बंद पडली आहेत. दोन मराठी लोक भेटले तरी इंग्रजीतून बोलू लागले आहेत. ‘माझी माय सरस्वती’ किंवा ‘अमृताशी पैंजा जिंके’ आणि ‘माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट’ अशा कविता आणि गाणीही नव्या मराठी पिढीला माहीत नाहीत. मराठीपेक्षा जर्मन वा फ्रेंच शिकण्याकडे कल असतो. कॉलेजातील मराठीच्या शिक्षकांच्या नोकर्या गेल्या व जात आहेत. आपण मराठी दिन, मराठी साहित्य संमेलने भरवून भाषा दिवस साजरा करतो. पण मराठीचा वापर कमी होत आहे आणि जो होत आहे, त्यातही शुद्धलेखन व व्याकरण चुकीचे. माध्यमांतील चुका दिसतात आणि आपणही शोधतो. पण तसे होण्यास आपणच जबाबदार आहोत. मुद्रित शोधक नेमून चुका सुधारता येतील, पण आपण स्वत:च भाषेचे व्याकरण, शुद्धलेखन व सौंदर्य टिकवायला हवे.
– संजीव साबडे