आपण आज बोलतो ती मराठी ज्ञानोबा-तुकाराम बोलत नव्हते, चक्रधर बोलत नव्हते. ही शिवकालीन मराठी नाही. तीच उद्या असेल, असे नाही. मराठीचा इतिहास हेच सांगतो आहे. तेव्हा भाषेने बदलू नये, असा अट्टहास कोणी धरू नये. नवनवे शब्द त्यांच्या संकल्पनांसह येऊ द्यावेत. किंवा मग त्यांना चपखल प्रतिशब्द तयार करून ते रूळवावेत.
…………………………..
सर्वांनाच काही ना काही सांगायचे असते. आता वनस्पतीसुद्धा एकमेकांना काही तरी सांगत असतात म्हटल्यावर प्राण्यांचे तर विचारायलाच नको. त्यातही तो माकडापासून उत्क्रांत झालेला मनुष्यप्राणी असेल, तर तो विविध प्रकारे बोलतो. पहिल्यांदा म्हणजे चार-पाच लाख वर्षांपूर्वी केवळ कसलेसे आवाज काढून वा हावभावाने तो बोलत होता. अशीच दोन-अडीच हजार वर्षे गेली असतील मध्ये. मग त्याच्या ह्या अभिव्यक्तीला काहीसा आकार आला. त्याची स्वरभाषा तयार झाली. तीसुद्धाही तेव्हा होती तशीच पुढे राहिली असे नाही. तिच्यात सातत्याने बदल होत गेले. नवनवे रुप-रंग आले. ती ‘प्रौढ’ होत गेली. तिची नीट संकेतव्यवस्था तयार झाली. भाषा बनत बनत गेली. जगभरातल्या अनेक भाषांचे असे झाले असेल. हे सारे भाषांचे घडणे घडले गेल्या तीसेक हजार वर्षांत.
पण हा प्रवास काही असाच सुखरूप चाललेला नव्हता. गणेश देवी हे मोठे भाषाशास्त्रज्ञ. ते सांगतात, साधारणतः दहा हजार वर्षांपूर्वी जगातल्या तेव्हाच्या बहुतांश भाषा लयाला गेल्या. ते का झाले, तर तेव्हाच्या व्यवस्था लयाला जाऊन वेगळ्या व्यवस्था निर्माण होऊ लागल्या. झाले असे, की पूर्वीचा तो समाज होता एकतर शिकार करणार किंवा अन्न गोळा करणारा. पुढे बायकांना लागला शेतीचा शोध. मग पुरूष मंडळी स्वयंपाकांत, शिकारीत गुंतली आणि बायका करू लागल्या शेती. त्यातून मनू बदलला. श्रम आणि अर्थव्यवस्था बदलली. व्यवहार बदलला. त्यासाठी जुनी भाषा अपुरी ठरू लागली. नव्या शब्दांची गरज भासू लागली. नवी भाषा आकाराला आली. अभिव्यक्ती आणि संवादासाठीचे ‘चलन’ म्हणजे ही भाषा. साधारणतः गेली दहा हजार वर्षे हे चलन कायम आहे. पण आता त्यात बदल होऊ लागले आहेत.
दहा हजार वर्षांपूर्वी जे घडले तसे काहीसे होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. जगात आज लहान-मोठ्या अशा सुमारे सहा हजार भाषा आहेत. त्यातल्या किमान दोन तृतीयांश भाषा राम म्हणण्याची शक्यता आहे आणि आपल्याकडे तर मराठी भाषा मुमूर्षू आहे काय? असा रोकडा सवाल विचारला गेलेला आहेच. पुण्यातल्या शारदोपासक संमेलनाच्या अध्यक्षपदावरून इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी विचारलेला हा सवाल. ते संमेलन झाले होते १९२६ साली. म्हणजे पुढच्या वर्षी ह्या सवालाचीही शंभरी आपण साजरी करू. हा शतकी इतिहास पाहिला, तर दिसते ते हेच, की हा सवाल अजूनही जिवंत आहे आणि मराठी भाषाही मेलीबिली नाही. पण माणसांना ती मरते की काय याची मोठी काळजी आहे. एकंदरीत मराठी भाषा मरू घातलीय, बिघडतेय वगैरे चिंताही चिरायू दिसते. राजवाड्यांच्या काळात ती होती. त्या आधीही ७०-८० वर्षे ती होती आणि आज तर काळजीच काळजी. तेव्हा आता ही नेमकी काय भानगड आहे, हे नीट पाहिले पाहिजे.
भाषेची चिंता दोन स्तरीय असते. पहिला स्तर भाषेच्या प्रकृती बिघाडाचा. भाषा बिघडते म्हणजे काय होते? तर तिच्यात परभाषेतील शब्द घुसखोरी करतात. जुनेजुने शब्द गळून जातात. तिचे व्याकरण बिघडते. अशुद्धलेखन बळावते. भाषा बिघडते. हे झाले प्रकृतीचे. दुसरा भाग असतो वजनाचा. तिचे समाजातील वजन, प्रतिष्ठा नामशेष होऊ लागते. म्हणजे होते काय, की ती भाषा बोलणार्या लोकांचे सामाजिक मूल्य कमी होते. बाजाातील पत घटते. परिस्थिती अशी निर्माण होते, की समजा नाही त्या भाषेत बोलले, तरी कुणाचे काही नुकसान होत नाही. समजा नाही त्या भाषेत पाट्या लावल्या, तरी त्याने गिर्हाईके काही घटत नाही. हां, कधीमधी पाट्या फुटतात. पण त्याचेही नीटसे ‘व्यवस्थापन’ केले की सारे काही सूतासारखे सरळ व सुरळीत होते. मग हळूहळू असे होते, की तो कमी वजनवाला भाषिक समाज जास्त वजनवाल्या भाषिक समाजाच्या मानसिक गुलामगिरीत अडकतो. त्याने मग तो एक तर जास्त वजनवाल्या समाजाचीच भाषा बोलायला लागतो किंवा त्यांचे शब्द उचलतो, त्यांच्या भाषिक लकबींचे अनुकरण करू लागतो.
मध्ये काही काळ गेला, की अचानक कोणाच्या तरी लक्षात येते, की अरे, आपली भाषा भ्रष्ट होत चालली आहे. मग भाषाशुद्धीच्या चळवळी निर्माण होतात. त्यांचे म्हणणे काय असते, तर आपण आपली पारंपरिक, जुनी भाषाच बोलू या. परभाषेतले शब्द हुसकावून लावू या. ज्यांच्यावाचून आपले अडते अशा परभाषेतल्या शब्दांना आपल्या भाषेत प्रतिशब्द शोधू या. येथे एक लक्षात घ्या, की म्हणजे हे भाषाशुद्धीवाले प्राध्यापक, लेखक, समीक्षक, पुढारी व तत्सम लोक परंपरावादी असणे ही आवश्यक बाब होऊन बसते. तर मुद्दा असा, की हा हलकल्लोळ झाला, की खरोखरच काही परकी शब्द गळून पडतात, काही राहतात. कालांतराने ते परकी आहेत हेच विसरले जाते. ते त्या भाषेत जिरून जातात. असे हे चक्र फिरतच असते.
उदाहरणार्थ आपल्या मराठी भाषेकडे पाहा…
सलिलयपदसंचारा, पयडिय मयणा, सुवण्ण रयणेल्ला
मरहठ्ठ भासा कामिणि य अडवीय रेहन्ती’
मराठी भाषा सललितपदसंचारा, प्रकटितमदना, सुवर्णरचनावती अशी कामिनी असून, ती भाषा आपल्या वैभवात विराजत आहे. ‘धर्मोपदेशमाला’ ह्या नवव्या शतकातील ग्रंथात मरहठ्ठ भासेचा असा गौरव केलेला आहे. ह्या भाषेचा इतिहास कुठून सुरू होतो? मराठीतले पहिले लिखित वाक्य (म्हणजे आपल्याला माहित असलेले) आहे, ‘श्री चावुण्डराये करवियले’. हा श्रवणबेळगोळचा शिलालेख शके ९०५ (इसवीसन ९८३)चा. ज्याअर्थी ९८३ मध्ये मराठी लिहिली जाऊ लागली होती, त्याअर्थी तत्पूर्वी किमान दोन-तीन शतके तरी ती सहजच उत्पन्न झालेली असणार. याचा अर्थ मराठी भाषा इसवीसन ६०० ते ७०० च्या सुमारास उत्पन्न झाली असणार.
आता कोणतीही भाषा अशी एकाएकी निर्माण होत नाही. तिची निर्मिती आणि विकास ही सतत चालणारी प्रक्रिया असते. तेव्हा मराठीही अशीच हळूहळू, शब्दाला शब्द जोडत निर्माण झाली असणार. तर हे जे शब्द मराठीत आले, ते कोठून आले? काही लोक म्हणतात, संस्कृतमधून आले. असा एक सिद्धांत आहे, की पूर्वी संस्कृत ही लोकांच्या बोलण्यातली भाषा होती. ख्रिस्तपूर्व ६०० च्या सुमारास तिचे रोजच्या व्यवहारातली भाषा म्हणून महत्त्व कमी झाले. याच काळात महाराष्ट्री, पाली, शौरसेनी, मागधी ह्या भाषा बनण्यास सुरूवात झाली. ख्रिस्तपूर्व २०० च्या सुमारास याच भाषा प्रचारात आल्या. प्राकृत म्हणतात त्या याच भाषा. प्राकृत शब्द आला पाअड ह्या शब्दापासून. पाअड भाषा म्हणजे प्रकट भाषा. लोकव्यवहाराच्या भाषा. पण ह्या भाषाही फार काळ होत्या त्याच स्वरूपात टिकल्या नाहीत. त्यांचे अपभ्रंश झाले आणि तेच पुढे रूढ झाले, प्रतिष्ठित झाले. म्हणजे, संस्कृतमधील शब्दांची उसनवारी करून महाराष्ट्री प्राकृत भाषा तयार झाली. मग तिचा अपभ्रंश झाला आणि त्यातून मराठी भाषा आकाराला आली, असे हे सगळे प्रकरण.
आता ह्या भाषाशास्त्राचीही एक गंमत आहे. सर विल्यम जोन्स (१७४६-१९९४) म्हणून एक भाषातज्ज्ञ होते. त्यांनी एक भाषाशास्त्रीय सिद्धांत मांडला, की संस्कृत आणि ग्रीक आणि लॅटीन या भाषा-भगिनी आहेत आणि त्यांचा उगम एकाच भाषेतून झाला असावा. ह्या मूळ काल्पनिक भाषेला त्यांनी नाव दिले ‘इंडो-युरोपियन’. ही भाषा बोलणारे लोक ते आर्यवंशाचे. ते मध्य आशियातल्या कॉकेशस पर्वतापासून सर्वत्र पसरले. काही भारतात आले. मग त्यांना ऋग्वेद वगैरे दिसला. हा सिद्धांत लांबवत नेला, की लक्षात येते, की मराठी ही आर्य लोकांच्या भाषेतून निर्माण झालेली भाषा आहे आणि द्रविडांच्या भाषा वेगळ्या आहेत. परंतु आपल्याकडचे सुप्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ विश्वनाथ खैरे यांनी एक ‘संमत’ विचार मांडला आहे. त्यानुसार मराठी आणि तमिळ ह्या भाषा आणि संस्कृतीचेही गाढ संबंध होते. त्यांच्या म्हणण्यानुसार मराठीतल्या अनेक शब्दांची व्युत्पत्ती शोधायची तर त्यासाठी तमिळ भाषेचा आधार घ्यावा लागतो. शिवाय काही शब्द तर शुद्ध तमिळच आहेत. उदाहरणार्थ छे, इश्श, अय्या हे उद्गार. ते सांगतात, ओवी, अंगाई, पोवाडा, गोंधळ हे सगळे तमिळमधून आले. खंडोबा, त्याचा येळकोट, विठ्ठल, तुळजाई, बोल्हाई, काळूबाई, फिरंगाई हे सगळे तमिळमधूनच आलेले आहे. शेंडीपासून बोटापर्यंतच्या सर्व मानवी अवयवांचे शब्द तमिळ आहेत. हे तर काहीच नाही. खरी गंमत आहे ती मर्हाटमोळे ह्या शब्दाची. अस्सल मराठी भाषेला आपण मराठमोळी म्हणतो. ज्ञानेश्वरांनी ‘मर्हाटाची बोलु’ असा शब्दप्रयोग केलेला आहे. खैरे सांगतात, की तमिळमधला ‘मर्रा’ मराठीत ‘मर्हा’ झाला. त्याचा अर्थ न झाकलेले, उघडे, स्पष्ट. आणि ‘मोळि’ म्हणजे बोली, भाषा. ज्ञानेश्वरीत 22 वेळा ‘मर्हाटाची बोलु’ हा शब्द आलेला आहे, तो याच अर्थाने!
विश्वनाथ खैरे यांचा हा संमत विचार पाहताना, शं. बा. जोशी यांच्या ‘मर्हाटी संस्कृती – काही समस्या’ या ग्रंथाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यात त्यांनी मराठी आणि कानडी भाषेचा संबंध दाखवून दिला आहे. पण पुढे ‘महाराष्ट्र संस्कृती’त पु. ग. सहस्त्रबुद्धेंनी त्याचा प्रतिवाद केला आहे.
पण खरी मौज वेगळीच आहे. सध्याचे प्रचलित मत काय आहे, तर संस्कृत, महाराष्ट्री प्राकृत, तिच्यावरून महाराष्ट्री अपभ्रंश आणि तिच्यापासून मराठी अवतरली. पण ‘अभिजात मराठी भाषा समिती’ने २०१३ मध्ये जो अहवाल तयार केला त्यात मराठी-संस्कृत संबंधावर वेगळाच प्रकाश टाकलेला आहे. म्हणजे असे, की आपण म्हणतो संस्कृतपासून मराठी आली. तर ते तसे नाही. वेदपूर्वकालीन आणि वैदिक भाषा ह्या विविध बोलींचे समूह होते. त्यातल्याच एका उत्तरकालीन वैदिक बोलींचे व्याकरण पाणिनीने रचले. तीच आपल्याला माहीत असलेली संस्कृत भाषा. पण तेव्हा अन्य बोलीही होत्याच. त्यातूनच विविध प्राकृत भाषा पुढे आल्या. म्हणजे असे, की मराठी ही संस्कृतची कन्या नव्हे. त्या भगिनी भाषा आहेत. दुर्गाबाई भागवतांनी हे लिहूनच ठेवले आहे, की जुनी महाराष्ट्री ही संस्कृतपेक्षा जुनी व खरी जिवंत भाषा आहे. त्यातून अवतरली आपली मराठी.
ती समृद्ध होत होत एक वेळ अशी आली, की चक्रधरस्वामींनी आपल्या महानुभाव पंथाची मुख्य भाषा मराठी केली. चक्रधरांचे एक शिष्य भटोबास यांनी काशीच्या एका पंडिताला, हे ‘अस्मात्-कस्मात् आम्ही नेणों गाः सर्वज्ञें आम्हां मराठी निरूपिले : तीतें पूसा’ असे रोखठोक सुनावले. म्हणजे तोवर मराठीला चांगलेच बळ आलेले होते. हे पुढे ज्ञानेश्वरीतूनही दिसते. यानंतरचा मराठीचा प्रवास संतकवींच्या मार्गाने, एकनाथ, तुकाराम येथपर्यंत सहजच होतो आणि शिवकालात जरा मागे वळून पाहिले की लक्षात येते, की अरे, मराठीच्या वावरात केवळ संस्कृत, प्राकृत, महाराष्ट्री, तमिळ वा कानडीचीच भर पडलेली नाही, तर आता अरबी-फार्सीही ह्या शिवारात जोमाने वाढू लागलेली आहे. तेव्हा मग शिवाजी महाराजांनी ‘राज्यव्यवहारकोश’ तयार करवून घेतला. भाषाशुद्धीचा हा पहिला भारी प्रयोग. पण तो काही फारसा यशस्वी झाला नाही. म्हणजे पुढेही पेशव्यांचा पंतप्रधान झालाच नाही. मुद्दा ‘वजना’चा होता.
महानुभावांनंतर मराठीत गद्यनिर्मिती झाली ती बखरींद्वारे आणि त्यानंतर त्यासाठी थेट इंग्रजांची राजवट सुरू व्हावी लागली. इंग्रजी अमदानीत येथे छपाईकला आली. मग इंग्रजीच्या धर्तीवर मराठी गद्याची रचना सुरू झाली. ही मंडळी शास्त्री-पंडित असल्याने मराठीवरील संस्कृतचा वरचष्मा वाढू लागला आणि त्यांचा फार्सी-अरबी-उर्दूशी फारसा संबंधच आलेला नसल्याने ते शब्दही त्यांच्या पुस्तकांतून कमी होत गेले. रूढ होते तेवढे मात्र राहिले. पण इंग्रजी शब्दांचे प्रमाण वाढू लागले. तेव्हा विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी निबंधमालेत लिहिले, की जर सध्याप्रमाणे इंग्रजी शब्दांची व रचनेची आपल्या भाषेत सतत भेसळ होत गेली, तर तिचे स्वरूप पालटता पालटता असे होईल की, ती इंग्रजीपासून निवडता येणार नाही व तिच्या मूळ स्वरूपाचा मागमूसही राहणार नाही. १९२९ सालचे एक पुस्तक आहे, गो. गो. मुजुमदार यांचे ‘मराठीची सजावट’ म्हणून. त्यात त्यांनी त्यांच्या वेळच्या मराठी भाषेतील शब्दांची टक्केवारी दिली आहे. त्यानुसार १०० मराठी शब्दांमध्ये त्यांना शुद्ध संस्कृत १४, विकृत संस्कृत १८, प्राकृतिक २०, देशज व प्रादेशिक १६, कानडी २, तमिळ-तेलगू जवळजवळ शून्य, हिंदी १/२ , गुजराथी १/२, अरबी, फार्सी, उर्दू व तुर्की १७, इंग्रजी, पोर्तुगीज व अन्य पाश्चात्य भाषा ३ आणि बेपत्ता शब्द ९आढळले! म्हणजे मराठीत ही मोठीच सजावट झालेली होती.
ह्या पार्श्वभूमीवर येते माधवराव पटवर्धन (यांचे टोपणनाव माधव ज्युलियन असे आहे!), बॅ. वि. दा. सावरकर यांची भाषाशुद्धीची चळवळ. मराठीतील फारसी, उर्दू, अरबी, इंग्रजी आदी परकीय शब्दांची हकालपट्टी करून मराठीला शुद्ध, सु’संस्कृत’ रूप देणे हे त्यांचे ध्येय होते. म्हणजे ‘नजर’ काढून ‘दृष्टी’ देणं. पण झाले काय, की तीही चळवळ परिणामकारक ठरली नाही. नाही म्हणायला, क्रिकेट, चित्रपट, राजकारण आदी क्षेत्रांत इंग्रजीच्या ऐवजी मराठी शब्द रूळवले तिने. पण आज पुन्हा ओरड होत आहे ती मराठीवरील इंग्रजीच्या (आणि हिंदीच्याही) आक्रमणाची.
हे इंग्रजी, हिंदी वा अन्य भाषिक शब्दांचे आक्रमण का आजचे आहे? आपल्या शुद्ध मराठीत रूळलेले, रुजलेले हे शब्द पाहा –
अक्कल, इरादा, इतराजी, इमला, इमान, इमारत, इरसाल, उरुस, ऊर्फ, औरस, कत्तल, कदम, कनात, कफन, करार, कर्ज, कलम, कायद, कारकीर्द, किंमत, खजील, खलाशी, खलास, खासा, खालसा, गहजब, गुलाम, जादा, जाहीर, जंजिरा, जुजबी, तब्येत, तकवा, तकरार, तहशील, ताईत, तुफान, दफ्तर, दर्जा, दाखल, दीन, नक्कल, लिफापा, साहेब, सैतान, हिंमत, हिशेब हे मुळचे अरबी शब्द आहेत.
अब्दागीर, अलगुज, कारभार, खुशामत, खुशाल, गोषवारा, चाबूक, जबानी, जहागीर, तावदान, दरबार, दस्तूर, दिरंगाई, पायखाना, बाग, बगीचा, बिलंदर, मशीद, महिना, मोहोर, मेणा, रसद, रवानगी, लेजीम, सरकार हे फार्सी आहेत.
काजू, कंपू, फालतू, फीत, घमेले, पगार, टिकाव, बिजागरी, अननस, बिस्कीट, चावी, कोबी, पोपयी, पेरू, पाद्री, हापूस, भोपळा, खमीस हे पोर्तुगीजमधून आलेले आहेत.
फिरंगी, काडाबीन, काडतूस, कुपन, वलंदेज यांचे नाते फ्रेंचशी.
कल्ला, खेटर, डोके, ढोपर, थोबाड, करडू, कालव, कोकरू, टोणगा, पोपट, रेडा, आघाडा, काकवी, घोसाळे, चटणी, जोंधळा, आड, उंबरा, कुंटा, बडबड, रांजण, मुलगा, वाईट, नाजूक हे देश्य. तांबूल, तांबोळी, कापूस, कापड, मयूर, लाकूड, इंगळ, आले, उंदीर, कचरा, ऊस, नांगर, लिंग, अमा (स्तन), गजकर्ण, गाल, गोचीड, कंबल हे ऑस्ट्रिक.
हे आपल्या भाषेतील शब्द आहेत. हे मराठी शब्द आहेत. काही शब्द अवतार बदलून येतात. मराठी होतात. त्यात ‘डॅम धीस’चे होते डँबीस, वॅगनपासून वाघीण, फ्रेंच बीनची फरसबी, जंपरचा होतो झंपर, लँटर्नपासून लालटेन, प्लॅटफॉर्मचा फलाट, आणि गाऊनची होते गवन.
आता ह्या शब्दांना आपण परकी म्हणणार? यांच्यामुळे मराठी बिघडली असे म्हणणार? लक्षात घ्या, शब्द म्हणजे नुसता अक्षरांचा पुंजका नसतो. त्याला अर्थ असतो. त्यामागे संकल्पना असतात. त्याच्या पाठीशी अख्खी संस्कृती असते. आता जर एखादी गोष्ट मराठीला नवीनच असेल, तर साहजिकच तिचे वर्णन करणारे शब्द मराठीत नसणार. उदाहरणार्थ इग्लू घ्या. एस्किमो लोकांचे हे हिवाळ्यातले घर म्हटल्यावर मराठीला ते ठाऊक असणे अशक्यच. तेव्हा मग एकतर त्या घराचे वर्णन करणारा सार्थ शब्द मराठीला स्वतः तयार करावा लागेल किंवा मग सरळ त्याला इग्लूच म्हणावे लागेल. कधी कधी अशीही गोची होते, की आपण एखाद्या शब्दाचे भाषांतर करून त्याला पावन करून घ्यायला जावे, तर त्याचा अर्थच अत्तरासारखा उडून जातो आणि खाली नुसताच अक्षरांचा बोळा उरतो. असे बोळे अनेक आहेत. ते पाहिले की आपण किती उत्कृष्ट भोंगळपणा केलेला आहे, याची गंमत वाटते. एसटीच्या कंडक्टरला ज्याने विद्युतशास्त्रातला ‘वाहक’ ठरवला, त्याला तर दंडवतच घालावयास हवेत! प्रतिशब्द चपखल नसेल तर तो लोकांमध्ये रुळत तर नाहीच, पण त्याने भाषाही बेंगरुळ होते.
तेव्हा जेथे शक्य आहे, तेथे परभाषिक शब्दांना मराठी रुपडे द्यावे. नसेल, तेथे ते सरळ अंगिकारावेत. हे आपल्या मराठीने केलेले आहे. एखादा परकी शब्द मराठी बनला आहे हे ओळखण्याची एक साधी कसोटी आहे. तो शब्द एखाद्या आडगावातल्या निरक्षर बाईच्या बोलण्यात आहे की नाही ते पाहा. एक तर ती आडगावातील बाई. म्हणजे त्यामानाने तिचा बाह्यजगताशी कमी संबंध. त्यात ती निरक्षर. एखादा परकी शब्द जर तिच्या कोशाचा भाग असेल, तर त्या शब्दास कपाळी अबीरगुलाल लावून मराठी करून घ्यावे, हे उत्तम आणि आज हे अनेक क्षेत्रांत करावे लागणार आहे.
आता काळच असा आला आहे. संगणक, माहिती, विदा, कृत्रिम बुद्धिमत्ता हे आजचे परवलीचे शब्द बनले आहेत. जागतिकीकरण तुमच्या आमच्या मेंदूपर्यंत पोचले आहे. नवनवे तंत्रज्ञान, नवनवी उपकरणे त्यांची त्यांची भाषा आणत आहेत. आजच्या जगात टिकायचे, तर हे सारे स्वीकारण्याखेरीज अन्य पर्याय नाही. नव्या ज्ञानाची, तंत्रज्ञानाची शब्दावली पचवावीच लागणार आहे. एक तर ते शब्द त्यांच्या समग्र अर्थच्छटांसह, संकल्पनांसह आपलेसे करावे लागणार आहेत. याने काहीही बिघडत नाही. भाषेची काहीही वाट वगैरे लागत नाही.
एक गंमत बघा. एकोणिसाव्या शतकात एक वृत्तपत्र होते, ‘प्रभाकर’ नावाचे. गोविंद विठ्ठल ऊर्फ भाऊ महाजन हे त्याचे संपादक. त्यांनी १८४२ साली लिहिले होते, की सांप्रत मुंबई येथील हिंदू लोक इंग्रेजी भाषा आणि विद्या यांपासून उपयोग आहे म्हणोन त्या शिकणे हाच पुरषार्थ मानून त्यात सर्व वेळ खर्च करितात आणि देश परंपरागत जी स्वभाषा किंवा त्या भाषेचे मूळ आणि धर्मशास्त्रे आणि पुराणे यांच्या ज्ञानास साधन अशी जी संस्कृत भाषा तिचा अभ्यास करण्याकडेस काहीच लक्ष देत नाहीत, यामुळे येथील लोकांची भाषा व स्थिती ही विलक्षण होत चालली आहे; ती अशी की ते बोलू लागले असता पंचवीस शब्दांमध्ये वीस शब्द इंग्रेजी येऊन, मध्ये विभक्ती, अव्यये, सर्वनामे आणि प्रसिद्ध क्रियापदे, इतकी मात्र बहुधा स्वभाषेचे उपयोगात आणतात. हे प्रसिद्ध झाले त्याला यंदा 182 वर्षे झाली आणि ते भाऊ महाजन मात्र आजही ‘जिंदाबाद’ आहेत. त्यांच्याबरोबरच मराठी भाषाही जिंदा व आबाद आहे.
हे नीटच लक्षात घ्यायला हवे, की असे परभाषिक शब्द, नवनव्या व्यवस्था, संकल्पना, तंत्रज्ञान, व्यवहार यांस अनुकूल असे शब्द पचवूनच कोणतीही भाषा विस्तारते. भाषा ही नदी असते. विविध ओढे, नाले, प्रवाह पोटात घेऊन ती धावत असते. मराठीही त्याला अपवाद नाही. मराठीला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. सातवाहन काळापासून येथे मराठी बोलली-लिहिली जात आहे. पण ती बदललेली, विस्तारलेली मराठी आहे. पार सातवाहनाच्या काळातली, दोन हजार वर्षापूर्वीची मराठी काही आज आपण बोलत नाही. त्याच्या ‘गाहासत्तसई’तील प्रेयसी म्हणते – राईण भणइ लोओ जा किल गिम्हम्मि होंति मडहाओ। मह उण दइएण विणा ण आणिमो कीस वङ्ढन्ति ॥ (लोक सांगतात की उन्हाळ्यातील रात्री लहान असतात. पण अनुभव मात्र असा आला की प्रियकराच्या विहरात त्या फार मोठ्या होतात.) भाषा प्रेमाची आहे, पण ती कोण्या प्रेमिकाला समजेल? मुद्दा असा, की आपण आज बोलतो ती मराठी ज्ञानोबा-तुकाराम बोलत नव्हते, चक्रधर बोलत नव्हते. ही शिवकालीन मराठी नाही. तीच उद्या असेल, असे नाही. मराठीचा इतिहास हेच सांगतो आहे. तेव्हा भाषेने बदलू नये, असा अट्टहास कोणी धरू नये. नवनवे शब्द त्यांच्या संकल्पनांसह येऊ द्यावेत. किंवा मग त्यांना चपखल प्रतिशब्द तयार करून ते रूळवावेत. कंप्युटरला संगणक म्हणून आपण रूळवलेच की. हे प्रयत्न संस्थात्मक पातळीवरून करावे लागणार आहेत. वृत्तपत्रकार आणि साहित्यिक मंडळी यांची यात महत्त्वाची भूमिका असणार आहे. पण प्रश्न केवळ शब्दांचाच नाही. मराठी भाषेच्या सौष्ठवाचा अथवा तिच्यावरील आक्रमणाचा नाही. तो आहे मराठी समाजाच्या वजनाचा.
मराठीवर इंग्रजी आणि हिंदी ह्या भाषांच्या आक्रमणाने आपण चिंताग्रस्त आहोत. का होते हे आक्रमण? मराठीवरील आक्रमण हे केवळ भाषेवरील आक्रमण नाही हे ध्यानी घ्यायला हवे. आक्रमणाचा मुद्दा हा जेवढा भाषिक आहे, तेवढाच तो आर्थिक, सामाजिक आणि राजकीयही आहे. झाले असे, की जागतिकीकरणाची सध्याची भाषा इंग्रजी हीच आहे. आजही ती ज्ञानभाषा आहे, तंत्रभाषा आहे. परिणामी ती वजनदार आहे. तिच्यापुढे – हे लिहिताना संगणकाचा कळफलक फुटला का नाही असे वाटतेय, पण कटू असले तरी सत्य आहे, की – मराठीचे वजन कमी आहे. ते वाढण्यासाठी इंग्रजीला पचवावे लागेल, हे खरेच. हीच बाब हिंदीचीही. हिंदीतील शब्द मराठीत येऊन मर्हाटाळले तर त्यास हरकत असायचे कारणच नाही. उलट त्याने मराठीचा परीघ विस्तारेल. परंतु मुद्दा केवळ शब्दांचा नाही. मुद्दा आहे, तो त्या-त्या भाषेचा आपल्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनावर होत असलेल्या परिणामांचा. याच्या परिणामी मराठीपण हरवून जाण्याचे भय निर्माण झाले आहे आणि ते इंग्रजीचा वापर करून सांगायचे तर- क्लिअर अँड प्रेझेन्ट ‘डेंजर’ आहे.
साधी बाब आहे, माणूस मराठी, पण त्यात मराठीपण नाही असे कसे चालेल? त्याने कालांतराने मराठी भाषाही संपेल. ती टिकवायची तर मराठीपण टिकवणेही तेवढेच गरजेचे. याबाबतीत आपण काय करतो आहोत? शोभायात्रांसारखे इव्हेन्ट, हे मराठीपण टिकवण्याचे मार्ग नसतात हे जेवढ्या लवकर आपल्या लक्षात येईल तेवढे बरे. बाजारबलाच्या ओझ्याने वाकलेला समाज बाजारात ज्याची चलती त्याच्याच मागे जातो. मग तो मयताला पांढरे कपडे परिधान केल्याशिवाय जात नाही आणि विवाह सोहळ्यात ‘संगीत’ करू लागतो. इतके, की त्यातली ती नाचणारी प्रौढपुरंध्री ही वरमाई आहे, की ‘वर्मा’ई असा प्रश्न पडावा आणि हे सारे करून झाल्यावर तो समाजमाध्यमांतून ओरडत फिरतो, की मुंबईच्या गिरगावात मराठी बोलायची चोरी कशी झाली? भाषा म्हणजे अभिव्यक्ती आणि संवादासाठीचे ‘चलन’. ते चलन त्याचेच चालते ज्याची बाजारात किंमत असते. मराठी समाजाची किमान मुंबईसारख्या आर्थिक केंद्रांतील किंमत तरी घसरलेली आहे. याचे कारण आपण एक तर आपले मराठीपण विसरलो आहोत. आपले सामाजिक आणि आर्थिक वजन कमी करून बसलो आहोत. असा समाज इतरांच्या ओझ्याखाली- मग ते भाषिक असो की सांस्कृतिक वा राजकीय, वाकलेलाच राहणार.
मराठी भाषा जिवंत रसरशीत ठेवण्याची पूर्वअट मराठी समाज जिवंत रसरशीत राहणे ही आहे. त्याचे वजन वाढणे हे आहे. तो चर्चेचा वेगळा विषय. येथे एवढेच सांगायचे आहे, की भाषेत परकीय शब्द येतात म्हणून कोणी रडत बसू नये. भाषेने बदलू नये, असा अट्टहास कोणी धरू नये. हां, आता जर आपण सगळे मिळून मराठी संस्कृती, मराठीपण बुडवायला निघालो असलो, तर मग मराठी भाषा राहिली काय आणि गेली काय… कोण फिकीर करतो? किंवा – हू केअर्स?
झालेच तर एवढेच होईल, की दहा हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासाची इये मराठीचिए नगरी पुनरावृत्ती होईल.
– रवि आमले