मराठीचे सौंदर्य टिकवायचे तर ती काचेच्या कपाटात ठेवून चालणार नाही. काचेआड काही काळ दिसेल ती छान छान. पण काच बंदच राहिली तर गुदमरेल मराठी नि सोबत तिचे सौंदर्यही. मराठीला खुल्या हवेत आणायला हवी. तिची पावले मातीत मळायला हवीत. तिने ऊनसावलीत चालायला हवे. तिने पावसात भिजायला हवे आणि हे सगळे आपण करायला हवे.
‘सौंदर्यशास्त्र’ हा शब्द तसा जडबंबाळ. मराठी साहित्यातून वा एकंदरच साहित्यामधून पदव्या मिळवणार्यांसाठी कदाचित नसेल तसा. तसे बोलूही नका त्यांच्यासमोर. त्या शब्दाची बाजू घेण्यासाठी आणखी कुठले कुठले जड शब्द तुमच्या दिशेने भिरकावून बोलती बंद करतील तुमची. तर त्यांचे राहू दे. सामान्यांसाठी मात्र नक्कीच तसा असणार. ज्या शब्दाचा उच्चार करतेवेळीच आपण कुणी प्राध्यापक वा जाड चष्मा डोळ्यांवर चढवलेले गंभीर चेहर्याचे विचारवंत आहोत, असा स्वत:लाच स्वत:चा भास व्हावा, असा हा शब्द. रसिक आणि समीक्षक यांच्यामधील भेदाच्या उदाहरणाने ह्या सौंदर्यशास्त्र शब्दाभोवती जरा फिरता येईल आपल्याला. भेदाचे हे उदाहरण उथळ वाटेल कदाचित अनेकांना. आता वाटले तर वाटू दे!
म्हणजे…
एका संध्याकाळी आपण अगदी छान तयार होऊन निवांत फिरायला गेलो आहोत. नुकतीच पावसाची रिमझिम सर येऊन गेली आहे. संध्याकाळचे मावळते किरण सौम्यपणे अस्तित्व दाखवत आहेत. रस्ता भिजलेला आहे. रस्त्यात एका वळणावर सुंदरसे बहरलेले चाफ्याचे झाड आहे. झाडाच्या खाली काही फुले पहुडलेली आहेत. चाफ्याच्या झाडावरून, फुलांवरून पाण्याचे थेंब हलके हलके पडत आहेत. फुलांचा, मातीचा मंद वास सर्वत्र भरून आहे. इतक्यात एक सुंदर तरुणी येते नि चाफ्याखाली पहुडलेल्या फुलांतील एक फूल हलकेच केसांत माळून, स्वत:शीच गाणे गुणगुणत निघून जाते…
आता जातिवंत रसिक काय करेल?
तर, ते उत्कट वातावरण, त्या वातावरणाचे नि त्या तरुणीचे सौंदर्य अगदी मनापासून निरखेल. कदाचित तोही त्या तरुणीप्रमाणे एखादे गाणे गुणगुणू लागेल…
नि समीक्षक काय करेल?
तर, मावळतीचा सूर्य आता किती अंशातून झुकलेला आहे… चाफ्याच्या त्या झाडाचे शास्त्रीय नाव काय… आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे, त्या तरुणीने चाफ्याचे फूल माळताना जे गाणे गुणगुणले ते कुठल्या रागात बांधलेले होते… याचा विचार आपल्या एका हाताचा तळवा आपल्या गालावर ठेवून करू लागेल!
रसिक नि समीक्षक यांतील फरक दाखवण्यासाठी एवढे उदाहरण पुरेसे व्हावे. येथे हेतू समीक्षकांची हेटाळणी करण्याचा नाही, त्यांचा अधिक्षेप करण्याचा नाही; तर रसिक व समीक्षक यांच्या हेतूंमध्येच कसा मूलत: फरक असू शकतो, हे अधोरेखित करण्याचा आहे. तरीही, आमचा अपमान झाला आहे, आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असे वाटलेच कुणा समीक्षकाला तर क्षमस्व! भावना हुळहुळत्या झालेल्या आजच्या जगात, भावना दुखावल्याने पोलिसांत गेलेला समीक्षक अद्याप तरी दिसलेला नाही कुणी. पण न जाणो, कुणी यायचा नि तक्रार करायचा. म्हणून आधीच माफीनामा लिहून ठेवलेला बरा!
रसिक व समीक्षक यांच्यातील फरक दर्शवून देण्याची ही वाट प्रारंभीच धरली याचे कारण म्हणजे संपादक महोदयांनी सुचवलेला मराठी भाषेचे ‘सौंदर्यशास्त्र’ हा विषय. त्यातील ‘शास्त्र’ वगळू या नि ‘मराठी भाषेचे सौंदर्य’ एवढा परीघ ठेवू या. अर्थात हे संपादकांच्या अनुमतीनेच!
मराठी भाषेचे सौंदर्य ह्या विषयाकडे जाण्याच्या किमान दोन वाटा तरी आहेतच. वरील उदाहरणावरून ते स्पष्ट होईल. त्यातील एक वाट रसिकाची नि दुसरी वाट समीक्षकाची. त्यातील रसिकाच्या वाटेने जाऊन काही हाती लागते का ते पाहू या नि समीक्षकांची वाट समीक्षकांवर सोपवू या. मुळात हा लेखप्रपंच अकादमिक स्वरूपाचा नाही, याची जाणीव असावी. त्यामुळे सौंदर्यशास्त्राचे व्याकरण, क्लिष्टता, जटिलता, ह्या शास्त्राबाबत कुणी काय म्हटले आहे आदी मुद्द्यांना नको स्पर्श करायला. कित्येक विद्वानांनी हे शास्त्र अगदी कमालीच्या अभ्यासाने उलगडून दाखवेले आहे. पण ती वाट त्यांची. ही इथली वाट त्यांच्यापासून वेगळी.
आता यातील अगदी पहिला मुद्दा- सौंदर्य म्हणजे काय? तर, ‘सौंदर्य’ या शब्दाची ठाशीव, आखीव व्याख्या करणे तसे कठीणच की! व्यापक अर्थाने बोलायचे तर आपल्या जाणीव-नेणिवेतील असंख्य गोष्टी, मनाची उत्कटता, मनाची तरलता, संस्कार, विचारांभोवती असलेल्या विविध तटबंद्या, बद्ध चौकटी ओलांडण्याची बुद्धीची-मनाची क्षमता, तत्कालीन परिस्थिती… ह्या आणि अशा कितीतरी गोष्टींवर आपली नजर, आपला दृष्टिकोन ठरत असतो आणि व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे एखादी गोष्ट एका व्यक्तीस सुंदर वाटेल, ती दुसर्यास वाटेलच असे नाही. त्याची सक्तीही नाही करता कामा कुणी. त्यामुळे ज्या रीतीने सौंदर्यशास्त्र हे सुंदरतेचे निकष सांगते, ठोकताळे सांगते त्या रीतीने नजर नकोच करायला ठाकून ठोकून तयार. ती आपली खुली, मोकळी ढाकळी असलेलीच बरी… नव्हे उत्तम!
हे सुरुवातीलाच स्पष्ट झाल्यानंतर मग आता मराठी भाषेच्या सौंदर्याकडे येऊ या. त्याकडे येताना आधी विचार करू या, आपल्या मराठी भाषेला मध्यंतरी मिळालेल्या अभिजात ह्या दर्जाचा. एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्याच मनात, बुद्धीत, जाणिवेत, नेणिवेत नि मुख्य म्हणजे व्यवहार करताना लख्खपणे स्पष्ट हवी ती म्हणजे, हा अभिजात दर्जा मिळाला मराठीला, ही चांगलीच बाब. त्या दर्जाचे काही व्यावहारिक फायदे आहेतच. ते नाकारण्यात काही अर्थ नाही. पण अभिजात दर्जा मिळाला म्हणून मराठी श्रेष्ठ ठरते, असे नाही. तर आपली भाषा श्रेष्ठ आहे म्हणून हा दर्जा मिळालेला आहे तिला. ह्या अभिजात दर्जाचा थेट संबंध येतो तो भाषेच्या वयाशी. भाषेतील लिखित साहित्याशी. तर ते निकष मराठीने पूर्ण केल्यानेच ती त्यासाठी पात्र ठरलेली आहे.
वाहती नदी आहे आपली मराठी भाषा. अर्थात त्या अर्थाने सगळ्याच भाषा ह्या वाहत्या असतात; असाव्यात. त्या वाहत्या राहिल्या नाहीत, स्वीकारशील राहिल्या नाहीत, आपल्या प्रवाहात कोण कोण होड्या वल्हवणार याचे जाचक नियम करीत राहिल्या, एखाद्या विशिष्ट गटाच्या कह्यात राहिल्या तर त्या आटतात, नि आटत आटत नष्ट होऊन जातात. जमीन खणून खणून ओलावा शोधावा लागतो नि त्या ओलाव्याचेच तकलुपी उत्सव करावे लागतात. मग तसे मराठीचे झालेले नाही. पार अगदी चक्रधर स्वामींपासून ते अगदी आजपर्यंत मराठी वाहती राहिली आहे. मराठी टिकेल का? मराठी जगेल का? असे प्रश्न उपस्थित केले जातात ते काही आजचे नव्हेत. मराठी मरणपंथाला लागलेली आहे, अशी चिंता विद्वज्जनांनी शतकापूर्वीही नोंदवलेली होती. पण तसे झालेले नाही.
इथे एक गोष्ट मनात, विचारांत अगदी पक्की हवी. आपण ज्या मराठी भाषेच्या सौंदर्याविषयी बोलत आहोत ती मराठी भाषा म्हणजे फक्त प्रमाण मराठी नव्हे. पुस्तकांमधून, वर्तमानपत्रांतून, कथांमधून, कवितांमधून, समीक्षांमधून, सरकारी कागदपत्रांतून, जाहिरातींमधून, राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांतून आणि विविध औपचारिक माध्यमांतून अवतरणारी मराठी हीच नि एवढीच मराठी नसते. ह्या सगळ्याच्या पल्याड केवढातरी महाराष्ट्र उभा आडवा पसरलेला आहे. ह्या सगळ्या चौकटींच्या बाहेर मराठी माणूस पसरलेला आहे. त्याची भाषा पसरलेली आहे. या गोष्टींची जाणीव ठेवायला हवी. केवळ शहरी नजरेतून, केवळ शहरांपुरतचे बघत राहिलो आपण तर मराठीचे सौंदर्य दिसणार नाही, जाणवणार नाही आपल्याला.
भाषेचे सौंदर्य कशात जोखायचे असते? तर अनेक गोष्टी सांगता येतील. मराठीच्या सौंदर्याचा विचार करतानाही तशा अनेक बाबी नोंदवता येतील. लिखित भाषेला लिपी असते. आपल्या मराठीची लिपी देवनागरी. बाह्य सौंदर्याचा विचार केला तर देवनागरीची रचना लक्षात घेऊन असंख्य सुलेखनकारांनी, भाषातज्ज्ञांनी, लिपीतज्ज्ञांनी त्यात वेगवेगळे प्रयोग केलेले दिसतात. त्यात सौंदर्य आणण्यासाठी अभ्यास केलेला दिसतो. अगदी तुम्ही आत्ता वाचत असलेल्या ह्या लेखासाठी वापरलेली टंकपद्धती ही अभ्यासातून, प्रयोगातून सिद्ध झालेली आहे. हे झाले भाषेचे बाह्यरूप.
ह्या बाह्यरूपासोबतच भाषा लय, नाद, ध्वनी यांच्या झुल्यावर झुलत असते. ह्या गोष्टी भाषेला जिवंत ठेवतात, तिला सौंदर्य मिळवून देतात, तिच्याप्रतीची आस्था वाढवतात. आपल्याकडील शहरांमधील मराठी ही त्या अर्थाने ऐकायला अगदी सपक वाटते. वाटते म्हणजे झालेलीच आहे ती सपक. शहरीकरणातील व्यावहारिक रुक्षतेची कडक इस्त्री फिरल्याने तिच्यातील लोभस घड्या, कंगोरे हरवून गेलेले आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचे शहरीकरण झपाट्याने होत आहे हे अगदी खरे. त्यातील सगळ्याच महानगरांची भाषा ही एकसारखी होत चाललेली आहे. मात्र आजही ग्रामीण भागातील लोकांच्या बोलण्याला त्या-त्या प्रांताचा विशिष्ट ताल लगडून आलेला दिसतो. अगदी कोकणाचा विचार करा. रायगड, रत्नागिरी, मालवण हे सगळे कोकणातलेच भाग. मात्र, ह्या भागांतील लोकांच्या बोलण्यातही कितीतरी वैविध्य असते. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र यांच्या बाबतदेखील असेच आहे. तिथेही थोड्या थोड्या अंतरावर भाषेत सूक्ष्मसा फरक पडत जातो. बोलण्याचा लहेजाच नव्हे, तर शब्दही थोडेथोडे बदलत जातात. उदाहरणार्थ सातार्याची मराठी वेगळी नि कोल्हापूरची वेगळी. हे असे वैविध्य म्हणजे भाषेचे निखालस, लोभस सौंदर्य. मराठीला असलेल्या ह्या प्रांतिक लयींना, तालांना शहरी मानसिकतेमधून, शहरी अहंगंडातून हेटाळणे म्हणजे निव्वळ कपाळकरंटेपणा. ह्या प्रांतिक लयी, ताल हे टिकवून धरायलाच हवेत. त्याबाबत मनात इतकुसाही न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. अगदी इंग्रजी किंवा हिंदी वा अन्य कुठली भाषाही जर आपण आपल्या मराठीच्या तालाने बोलत असू, तर त्यात लाज बाळगण्याचे कारण काय? दाक्षिणात्य लोक दाक्षिणात्य पद्धतीने इंग्रजी नि हिंदी बोलतात, अभिजनतेचा, अभिजाततेचा जणू मक्ता घेतल्याप्रमाणे वागणारे बंगालीजन त्यांच्या तालाने इंग्रजी नि हिंदी बोलतात. मग आपल्याला आपल्याप्रमाणे ह्या भाषा बोलण्यात लाज का वाटावी?
महाराष्ट्राचे संतसाहित्य हे मराठीचे अगदी ठसठसशीत सौंदर्यस्थळ. हे सौंदर्य अगदी चक्रधर स्वामींपासून चालत आलेले. चक्रधर स्वामी तर मराठीचा आजच्या भाषेत जाज्ज्वल्य अभिमान बाळगणारे. संत ज्ञानेश्वरांच्या भाषेतील कोवळिक आणि संत तुकारामांच्या भाषेतील रोखठोक रांगडेपणा ह्या दोन शिखरांच्या दरम्यान मराठीतील संतसाहित्याची भाषा आंदोळली. विविध जाती, विविध धर्म, विविध पंथ यांतील संतमंडळींनी आपापल्या पार्श्वभूमीला अनुसरून सुख-दु:खे, आशा-निराशा, अध्यात्म हे सगळे अगदी मन:पूत मांडले. अभंग, ओव्या, भारूड, गोंधळ अशा प्रकारांनी मराठीचे भाषिक सौंदर्य वाढले, तसेच वैचारिक व तात्विकही. खेळे, लावणी, तमाशा, शक्तीतुर्याचा सामना, सवाल जबाब अशा लोककलांचेही महत्त्व मोठे. आरत्या, पुराणे, स्तोत्रे… कितीतरी मोठा खजिना आहे मराठीचे सौंदर्य खुलवणारा.
वाढते शहरीकरण, जागतिकीकरणाचा रेटा, इंग्रजी व हिंदी यांचा वाढता प्रभाव यामुळे आपल्याला आपल्याच भाषेच्या वाहत्या नदीच्या काठाशी बसून तिच्याशी संवाद साधण्याची, तिचा नाद ऐकण्याची उसंत मिळेनाशी झालेली आहे. ही उसंत मिळणे कठीण असल्याने तिच्या उगमाच्या दिशेने नजर टाकणे तर दूरच राहिले. ही अशी नजर टाकली तर केवळ वापरात नसल्याने लुप्त होऊ पाहणारे कितीतरी मराठी शब्द आपल्याला आढळतील. हे शब्द मराठीचे सौंदर्य घडविण्यात मोलाची भूमिका बजावणारे. अगदी साधे उदाहरण. ‘परिमळ’ हा शब्द. शब्द तसा जुनाच. सुवास हा त्याचा सोपा अर्थ. हा शब्द माहीत असतो अनेकांना. ‘म्हणजे अवचिता परिमळु…’ ही ज्ञानेश्वरांची रचना ऐकलेली असते. पण शब्दार्थच माहीत नसतो. मराठीची ही सौंदर्यस्थळे जपायला हवीत ना? मराठीतील म्हणी, वाक्प्रचार ह्या गोष्टीही आपल्या भाषेच्या सौंदर्यात भर टाकणार्या नि तात्विक बोधही सांगणार्या. त्यातून भाषेचे नैपुण्य सिद्ध होते.
शिव्या हेदेखील भाषेचे एक वैशिष्ट्य. ओव्या जितक्या स्वाभाविक, तितक्याच शिव्याही. समाजसंमत असे काही शिरस्ते, नियम भाषेच्या बाबतीत, निदान सार्वजनिक ठिकाणी पाळावे लागतातच. ते पाळायलाही हवेत. पण म्हणून शिव्यांना केवळ शिव्याच घालाव्यात असेही नाही! हे कुठल्या अर्थाने? तर सौंदर्य हे काही फक्त चांगल्याचुंगल्या, गोडगोड गोष्टींनी खुलत नसते. काही जहाल, बोचर्या गोष्टीही असतातच गरजेच्या. भाषेचेही तसेच आहे. शिव्या ह्या भाषा खुलवणार्या, भावभावनांच्या अभिव्यक्तीला टोक देणार्या असतातच. मग त्यास कुणीही, कितीही नाके मुरडोत. नि आपल्या मराठीत शिव्यांना तोटा नाही. त्यांचे भांडार खुलेच आहे. त्यांचा वापर जरा तारतम्याने करायला हवा, हे मात्र मान्य!
लेखाच्या शेवटाकडे येताना मुद्दा मराठी भाषेच्या सौंदर्याच्या जपणुकीचा. मराठी भाषा जपणे, तिचे सौंदर्य जपणे ही जबाबदारी ज्यांचे रोजचे जगणे, उदरनिर्वाहदेखील शब्दांशीच जोडलेला आहे, असे लेखक, कवी, पत्रकार यांच्यावर आहे का? तर ती आहेच. ती नाकारण्यात काय हशील? प्राचीन साहित्य राहू दे, पण अर्वाचीन काळातही असंख्य लेखक-कवींनी, विचारवंतांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, जोपासण्यासाठी, तिचे सौंदर्य खुलविण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. ते प्रयत्न आजही सुरूच आहेत. त्यात खंड पडणार नाहीच. पण त्याचसोबत ही सगळी जबाबदारी ह्या लिहित्या, बोलत्या मंडळींची; मराठीचे नि मराठीच्या सौंदर्याचे, तिच्या भवितव्याचे काय ते त्यांनी बघून घ्यावे, अशी मानसिकता इतर लोक जर बाळगणार असतील तर ते खचितच चुकीचे. कारण लेखक-कवी-पत्रकार नि शब्दांवर जगणे अवलंबून असलेल्या लोकांचा टक्का किती असणार? तर एकूण मराठी लोकसंख्येच्या अगदीच इवलुसा. अल्पसंख्य हा शब्दही वापरता येणार नाही, इतकी ह्या घटकांची संख्या. त्यामुळे इतर बहुसंख्यांवरील जबाबदारी भरपूरच. ह्या बहुसंख्यांनी मराठीवर जागते प्रेम करायला हवे, तिची जोपासना करायला हवी. भाषेला जीव असतो. भाषेला धमन्या असतात. भाषेतून रक्त वाहत असते. भाषेला कान, नाक, तोंड, हात-पाय असे सगळे अवयव असतात. हे सारे अवयव चालतेफिरते ठेवले तर अवघे शरीर टिकेल. शरीराचे सौंदर्य टिकेल.
मराठीचे सौंदर्य टिकवायचे तर ती काचेच्या कपाटात ठेवून चालणार नाही. काचेआड काही काळ दिसेल ती छान छान. पण काच बंदच राहिली तर गुदमरेल मराठी नि सोबत तिचे सौंदर्यही. मराठीला खुल्या हवेत आणायला हवी. तिची पावले मातीत मळायला हवीत. तिने ऊनसावलीत चालायला हवे. तिने पावसात भिजायला हवे.
आणि हे सगळे आपण करायला हवे.
– राजीव काळे