मधुमासातील नवचैतन्य

0

चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात गुढीपाडवा हा केवळ नवीन वर्षाचा प्रारंभ नसून, तो निसर्गातील नवचैतन्य आणि आरोग्याचा उत्सव आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ह्या दिनी सृष्टीची निर्मिती, प्रभू रामांचा विजय आणि शालिवाहन शकाचा इतिहास दडलेला आहे. अभ्यंगस्नान, कडुनिंबाचे सेवन आणि गुढी पूजनाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीने जपलेला हा वैज्ञानिक व आध्यात्मिक वारसा आहे.
…………………….

दा. कृ. सोमण

आपले सर्व सण-उत्सव हे ऋतूंवर आधारित आहेत. गुढीपाडवा हा शालिवाहन शकवर्षाचा पहिला दिवस मधुमासात वसंत ऋतूमध्ये येत असतो. 18 फेब्रुवारी रोजी सूर्याने सायन मीन राशीत प्रवेश केला, त्या दिवसापासून वसंत ऋतूचा प्रारंभ झाला. वसंत ऋतूमध्ये संपूर्ण सृष्टीला नवचैतन्य रूप प्राप्त होते. काही वृक्षांवर नवीन पालवी येते. काही झाडांवर विविध रंगातील फुले वसंत ऋतूच्या स्वागतास सज्ज झालेली दिसतात. काही वृक्ष फळांनी समृद्ध झालेले दिसतात. आम्रवृक्षांवर हिरव्या कैर्‍या दिमाखाने लटकत असतात. कडुनिंबाचे झाडही निळसर फुलांच्या तुर्‍यांनी बहरून गेलेले दिसते. कोकिळ पक्षाला कंठ फुटून तो वसंताचे सौंदर्य गात असतो. चैत्र हा मधुमास आहे. वसंत ऋतूचा आत्मा आहे. हा कुसुमाकर आहे. ह्या महिन्यात फुलांतून, फळांतून मधुर रस वाहत असतो. चैत्र महिन्यात चित्रा नक्षत्र रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला उगवून रात्रभर आपणास आकाशात दर्शन देऊन पहाटे पश्चिमेस मावळते. तसेच चैत्र पौर्णिमेला चंद्र चित्रा नक्षत्रापाशी असतो. म्हणून ह्या मधुमासाला ‘चैत्रमास’ म्हटले जाते.

गुढीपाडवा
म्हणूनच चैत्र मासापासून शालिवाहन शकवर्षाचा प्रारंभ होतो. चैत्र शुक्ल प्रतिपदा हा गुढीपाडव्याचा दिवस असतो. साडेतीन मुहूर्तातील हा एक दिवस मानला जातो. ह्यावर्षी ह्या दिवशी पराभवनाम संवत्सर, शालिवाहन शक 1948 चा प्रारंभ होत आहे. तसेच ह्या दिवशी युगाब्द 5128 चा प्रारंभ होत आहे.
गुढीपाडवा हा दिवस तसा खूप महत्त्वाचा आहे. ब्रह्मदेवाने हे जग चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले. त्यामुळे गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्ताने आपण ह्या दिवशी जगाचा वाढदिवस साजरा करीत असतो. पैठणच्या शालिवाहन राजाने अत्याचारी शक लोकांचा पराभव करून त्यांच्या जाचापासून जनतेची मुक्तता केली. ह्या विजयाप्रीत्यर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून त्याने शालिवाहन शक सुरू केला. ज्या राजाने विजय मिळविला तो शालिवाहन आणि ज्यांच्यावर विजय मिळविला ते शक ही दोन्हीही नावे ह्यामध्ये येतात. तसेच प्रभू रामचंद्र दुष्ट रावणाचा वध करून, विजयी होऊन चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी अयोध्येत आले. लोकांनी आनंदाने आपापल्या घरासमोर गुढी उभारून प्रभू रामचंद्रांचे स्वागत केले. म्हणून ह्या दिवशी घरासमोर विजयाची गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली.

गुढीपाडव्याचा दिवस
गुढीपाडव्याच्या दिवशी अभ्यंगस्नान करावयास सांगितले आहे. सुगंधी तेलाने अगोदर शरीराला मसाज करावा, त्यानंतर गरम पाण्याने स्नान करावे. अभ्यंगस्नानाला ‘मांगलिक स्नान’ असेही म्हणतात. अभ्यंगस्नान करण्याची प्रथा फार प्राचीन कालापासून आहे. माणूस ऐहिक सुखोपभोगासाठी तेले व सुगंधी द्रव्ये वापरू लागल्यावर अभ्यंगस्नानाचा विधी रूढ झाला. शरीराचे स्नायू बलवान व्हावे बल, पुष्टी आणि त्वचेची कांती वाढावी, ह्या उद्देशाने अभ्यंगस्नान करण्याची पद्धत सुरू झाली. शरीराचे आणि मनाचे आरोग्य चांगले राहावे, हा त्यामागचा उद्देश होता. पुढे अभ्यंगस्नानाला धार्मिक स्वरूप प्राप्त झाले. मसाज करण्यासाठी तीळ, खोबरे ह्यांचे तेल किंवा तूप वापरतात. तसेच अभ्यंगस्नानासाठी चंदन, गुलाब, मोगरा इत्यादी फुलांपासून नैसर्गिक पद्धतीने तयार केलेली अत्तरे वापरतात. मात्र केमिकल वापरून तयार केलेली अत्तरे वापरू नयेत. त्यापेक्षा स्नानासाठी वापरण्याच्या पाण्यामध्ये सुगंधी फुले घालावीत.

प्राचीनकाली उटण्यामध्ये चंदन, हळद, कोष्टकोळिंजन, नागरमोथा, कचोरा, कापूरकाचरी, वाळा, बावची, अनंतमूळ, आवळा, दवणा, मारवा, पुदीना, मुलतानी माती, चणाडाळपीठ इत्यादींचा वापर केला जात असे. ह्यातील वनस्पती औषधी आहेत. पूर्वी अनेक गावातून नैसर्गिक पद्धतीने सुगंधी फुलांपासून नैसर्गिक अत्तरेही तयार केली जात होती. कनोज गाव तर अत्तरांसाठी प्रसिद्ध होते. केमिकल वापरलेली कृत्रिम सुगंधी अत्तरे त्वचेसाठी घातक असतात.

अभ्यंगस्नानानंतर नवीन वस्त्रालंकार परिधान करावेत. दरवाजाला आंब्याची पाने आणि फुले यांचे तोरण बांधावे. नंतर घरासमोर रांगोळी काढावी. रांगोळी रंगवली, रंगमाळी, रंगमाळा, रंगावली, रंगोली ह्या नावाने ओळखली जाते, कर्नाटकात रांगोळीला ‘रंगोली’ म्हणून संबोधतात. आंध्रप्रदेशात ‘मुग्गुलू’ किंवा ‘मुग्गु’ ह्या नावाने ओळखतात. तामिळनाडूमध्ये रांगोळीला ‘कोलम’ ह्या नावाने ओळखले जाते. केरळमध्ये रांगोळीला ‘पुविडल’ असे म्हणतात. गुजरातमध्ये रांगोळीला ‘साथिमा’ म्हणतात. सौराष्ट्रात रांगोळीला ‘सथ्या’ म्हणतात. राजस्थानमध्ये रांगोळीला ‘मांडणा’ म्हणतात. बंगालमध्ये रांगोळी ‘अल्पना’ ह्या नावाने ओळखली जाते. बिहारमध्ये ‘अलिपना’, उत्तर प्रदेशात ‘सोनराखना’ आणि ओरिसामध्ये रांगोळी ‘झुंटी’ किंवा ‘ओसा’ ह्या नावाने ओळखली जाते. विष्णुपुराणात लक्ष्मी-विष्णूच्या विवाहप्रसंगी शुभ चिन्हांच्या तसेच फुलांच्या रांगोळ्या काढल्याचा उल्लेख आहे. रांगोळी ही सर्वत्र शुभप्रद आणि अशुभनिवारक मानली जाते. जिथे रांगोळी आहे तिथे देवदेवतांचा निवास असतो, असा समज आहे.

गुढी पूजन
गुढीला ब्रह्मध्वज’ असे म्हणतात. वेळूची (बांबूची) काठी घ्यावी. ती स्वच्छ धुवून तिच्या टोकावर रेशमी वस्त्र, फुलांची माळ, साखरेची माळ बांधून त्यावर एक उलटा कलश ठेवून ती गुढी उभारावी. गुढीची षोडशोपचार पूजा करावी. प्रत्येक उपचार समर्पण करतांना ‘ब्रह्मध्वजाय नम:’ असे म्हणावे. पूजा झाल्यावर नमस्कार करून प्रार्थना करावी-
ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभिष्टफलप्रभ । प्राप्तेऽस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु ॥
नंतर नूतन शालिवाहन शक 1948 पराभवनाम संवत्सराच्या पंचांगाची पूजा करून त्यातील संवत्सर फलादेश वाचावा. तसेच कडुनिंबाची कोवळी पाने घेऊन त्यात जिरे, मिरी, हिंग, सैंधव मीठ आणि ओवा घालून चांगले वाटावे आणि ते घरातील सर्वांनी थोडे खावे. वर्षारंभी कडुनिंब खाल्ल्याने वर्षभर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

कडुनिंब हा कल्पवृक्ष आहे. ह्या झाडाची प्रत्येक गोष्ट उपयुक्त आहे. कडुनिंब ही मौल्यवान औषधी आहे. आर्यभिषक ह्या प्राचीन ग्रंथामध्ये कडुनिंब वृक्षाला सर्वरोगपरिहारक वृक्ष असे म्हटले आहे. कडुनिंबापासून साबण, कीटकनाशके, धूप, हेअर टॅानिक, टूथपेस्ट इत्यादी अनेक उत्पादने तयार केली जातात. रासायनिक कीटकनाशकांचे दुष्परिणाम दिसून आल्यावर कडुनिंबापासून तयार करण्यात येत असलेल्या कीटकनाशकांची उपयुक्तता सर्वांना पटू लागली आहे. भारतीय जमीन आणि हवामानात कडुनिंबाची झाडे चांगली वाढतात. पर्यावरण रक्षणासाठीही रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ही झाडे असणे आवश्यक आहे. ज्या जमिनीत कमी पाणी असते, तेथेही ही झाडे वाढतात. खडकाळ, डोंगराळ जमीन ह्यांना चालते. आठ ते दहा वर्षांत ह्या झाडांची पूर्ण वाढ होते. कडूनिंबाच्या झाडाच्या सालीत मागोसिन, तेल, गोंद, विस्तार, साखर, एझारिडॅाक्टिन असते. कडुनिंबाच्या बियांमध्ये स्थिरतेल आणि गंधाचा अंश असतो.
‘कैकदेव निघण्टु’मध्ये कडुनिंबाचे गुणधर्म एका श्लोकामध्ये वर्णन केले आहेत.
निम्बस्तिक्त: कटु: पाके लघु: शीतोऽग्नि-वात-कृत् ।
ग्राही हृद्यो जयेत् पित्त- कफ- मेह- ज्वर- कृतीन् ॥
कुष्ट- कासारूपी हल्लास – श्ववथु- व्रणात् ।

भूक न लागणे, उलट्या होणे, आम्लपित्त, कावीळ, मूळव्याध, पोटदुखी, पोटात जंत होणे, केसात उवा होणे, वेगवेगळ्या प्रकारचे त्वचारोग, व्रण, जखमा, दाह रोग, विंचूदंश, सर्पदंश, अकाली केस पांढरे होणे, वेगवेगळ्या प्रकारचे ज्वर, मुखरोग, दातांचे आजार, नेत्रदोष, स्त्रियांच्या आजारावर, सांधेदुखी इत्यादी आजारांवर कडुनिंब उपयुक्त औषध आहे. मात्र वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा वापर करावा. अति कडुनिंबसेवनही आरोग्यास अपायकारक आहे.

साडेतीन मुहूर्तातील दिवस
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक शुभ मुहूर्त मानला जातो. ह्या दिवशी मौल्यवान वस्तूची खरेदी केली जाते. तसेच शुभ कार्याचा प्रारंभ ह्या दिवशी केला जातो. ह्या दिवसापासून वासंतिक देवी नवरात्रारंभ होतो. तसेच श्रीरामनवरात्रारंभ होतो. महिला वासंतिक हळदी-कुंकू समारंभ करतात. गौरीची पूजा करून तिला आंबाडाळ, गूळ-खोबरेर्‍याची खिरापत आणि कैरीचे पन्हे यांचा नैवेद्य अर्पण केला जातो, तसेच तो प्रसाद सर्वांना वाटला जातो. आदिशक्ती- निर्मितीशक्तीचे रूप म्हणून प्रत्येक स्त्रीचा आदरसत्कार, ओटी भरून केला जातो. विविध रंगांच्या विविध सुगंधित फुलांचे गजरे, माळा चैत्रगौरीला आणि स्त्रियांना दिले जातात. संपूर्ण घर-परिसर सुगंधित, आनंदित आणि उल्हासित झालेला असतो. वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत म्हणजे अक्षय्य तृतीयेपर्यंत (ह्यावर्षी 19 एप्रिल) हा उत्सव सुरू असतो.

मागील सुमारे 25 वर्षांपासून गुढीपाडव्याच्या दिवशी गावोगावी शोभायात्रा काढल्या जातात. सर्व क्षेत्रातील सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, पर्यावरणविषयी जागृती करणार्‍या संस्था आणि कार्यकर्ते ह्यामध्ये सहभागी होतात. आरोग्यविषयक, समाजप्रबोधनविषयक, पर्यावरण विषयक जागृती करणारा संदेश ह्या शोभायात्रेच्या निमित्ताने दिला जातो.

ह्यावर्षी नूतन चंद्रकोरीचे दर्शन शुक्रवार, 20 मार्च रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावर होणार आहे. ह्या दिवशी ‘बालचंद्रमाव्रत’ करण्याची प्रथा आहे. सूर्यास्तसमयी स्नान करून आकाशातील चंद्राची किंवा तांदुळाचे चंद्रबिंब करून त्याची पूजा केली जाते.

गौरी तृतीयेच्या दिवशी (21 मार्च, 2026) गौरीशंकराची पूजा करून झोपाळ्यावर/ पाळण्यात त्यांची स्थापना केली जाते. महिनाभर हा दोलोत्सव साजरा केला जातो. ह्यावेळी स्नान, अभिषेक, पूजा ह्यासाठी त्यांना बाहेर काढतात. तसेच पंचांगात दिलेल्या दिवशी श्रीराम, विष्णू, श्रीकृष्ण इत्यादी देवतांचाही दोलोत्सव साजरा केला जातो. 21 मार्च, 2026 रोजी मत्स्य जयंती आहे. चैत्र शुक्ल पंचमीच्या दिवशी हे व्रत केले जाते. चैत्र शुक्ल अष्टमी आणि चंद्र पुनर्वसू नक्षत्रात असतांना अशोक कलिका प्राशन केले जाते. चैत्र शुक्ल अष्टमीच्या दिवशी (ह्यावेळी 26 मार्च 2026) भवानीदेवी प्रकट झाली. तिची पूजा ह्या दिवशी करण्यात येते.

श्रीरामनवमी
चैत्र शुक्ल नवमी मध्यान्हकाली असेल, त्या दिवशी श्रीराम जयंती साजरी केली जाते. दोन्ही दिवशी मध्यान्हव्यापिनी असली तर किंवा नसली तर नवमीच्या दिवशी श्रीराम जयंती साजरी केली जाते. दिनमानाचे पाच भाग करावेत. पहिल्या भागाला प्रात:काल, दुसर्‍या भागाला संगवकाल, तिसर्‍या भागाला मध्यान्हकाल, चौथ्या भागाला अपराण्हकाल आणि पाचव्या भागाला सायान्हकाल असे म्हणतात. ह्यावर्षी गुरुवार, 26 मार्च, 2026 रोजी सकाळी 11.48 वाजेपर्यंत चैत्र शुक्ल अष्टमी आहे. मध्यान्हकाल सकाळी 11.31 ते दुपारी 1.57 आहे. त्यादिवशी मध्यान्हकाली नवमी आहे. दुसर्‍या दिवशी शुक्रवार 27 मार्च, 2026 रोजी मध्यान्हकाल सुरू होण्यापूर्वीच सकाळी 10.06 वाजता नवमी संपते. म्हणून ह्यावर्षी चैत्र शुक्ल अष्टमीच्याच दिवशी गुरुवार, 26 मार्च, 2026 रोजी मध्यान्हकाली श्रीरामनवमी साजरी करावयाची आहे. रामनवमीला सुंठवडा नैवेद्य अर्पण करून त्याचा प्रसाद वाटला जातो.

ह्यावर्षी 20 एप्रिलपर्यंत वसंत ऋतू आहे. वसंत ऋतूमधील निसर्ग सौंदर्याचे निरिक्षण करीत आंबाडाळ, कैरीचे पन्हे ह्यांचा आस्वाद घेत मधुमासातील हे सण-उत्सव साजरे करीत आपण आपल्या जीवनातील क्षण आनंदात घालवू या. तसेच, गरजू लोकांना मदत करीत त्यांच्याही जीवनात आनंद फुलवूया.

पुढील 10 वर्षांतील गुढीपाडव्याचे दिवस
2027 बुधवार, 7 एप्रिल
2028 सोमवार, 27 मार्च
2029 शुक्रवार, 16 मार्च
2030 बुधवार, 3 एप्रिल
2031 सोमवार, 24 मार्च
2032 शनिवार, 10 एप्रिल
2033 गुरुवार, 31 मार्च
2034 मंगळवार, 21 मार्च
2035 सोमवार, 9 एप्रिल
2036 शुक्रवार, 28 मार्च

(लेखक पंचांगकर्ते आणि ज्येष्ठ खगोल अभ्यासक आहेत.)

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech