मुंबईत ड्रग्जचा विळखा: ‘ओव्हरडोस’मुळे दररोज दोन मृत्यू; खासदार रवींद्र वायकरांनी लोकसभेत सरकारला झापले!

0

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ड्रग्जच्या विळख्याने तरुण पिढीचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचा गंभीर मुद्दा लोकसभेत उपस्थित करण्यात आला आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर यांनी शून्य प्रहरात या विषयावर कडाडून भाष्य करत, ड्रग्ज माफियांवर कठोर कारवाई करून त्यांचे कंबरडे मोडण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. “विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर भावी पिढीला या नशेच्या पाशातून बाहेर काढणे अनिवार्य आहे,” अशा शब्दांत त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.

मुंबईला लाभलेल्या ७२० किलोमीटरच्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्याचा आणि रस्ते मार्गांचा वापर करून ड्रग्जची तस्करी होत असल्याचे धक्कादायक वास्तव वायकरांनी मांडले. विशेषतः जोगेश्वरी, पवई आणि गोरेगाव यांसारख्या वर्दळीच्या भागांत ड्रग्जची विक्री सर्रास सुरू असून, यामुळे दररोज सरासरी दोन तरुण ‘ओव्हरडोस’मुळे आपला जीव गमावत असल्याची आकडेवारी त्यांनी सभागृहासमोर ठेवली. ड्रग्ज पेडलर्सना वेळीच वेसण घातले नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

केवळ कारवाई करून थांबता येणार नाही, तर या व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांच्या पुनर्वसनासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी महत्त्वपूर्ण सूचनाही त्यांनी केली. “जे तरुण ड्रग्जच्या विळख्यात अडकले आहेत, त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांच्या रुग्णालयातील उपचारावर आणि समुपदेशनावर शासनाने जास्तीत जास्त खर्च करावा,” असे आवाहन खासदार वायकर यांनी केले.

मुंबईत फोफावणाऱ्या या अमली पदार्थांच्या जाळ्यामुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले असून, आता केंद्र आणि राज्य सरकार या माफियांच्या विरोधात कोणती ठोस पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech