चैत्र महिन्यातील ऋतुसंधि निसर्ग आणि शरीर ह्या दोन्हीच्या शुद्धीकरणाचा काळ असतो. वाढत्या उन्हामुळे आणि कफदोषामुळे उद्भवणारे आजार टाळण्यासाठी कडुनिंबाचे सेवन अत्यंत शास्त्रीय आहे. गुढीपाडव्याचा कडवट प्रसाद, नैसर्गिक पेये आणि सात्विक आहार शरीर डीटॉक्स करून रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. थोडक्यात, पाडव्याच्या परंपरा पाळून आपण बदलत्या ऋतूत वर्षभर निरोगी राहू शकतो.
डॉ. दीपक जोशी
चैत्र महिन्यातील ऋतुसंधि म्हणजे शिशिर संपून वसंत ऋतूचे आगमन होते. हा काळ निसर्गासाठी व निसर्गातील प्राणीमात्रांसाठीही खूप सुंदर असतो, कारण ह्याच काळात निसर्गात झाडांच्या पानांची गळती होऊन नवीन पालवी फुटते. म्हणजेच निसर्ग एक प्रकारे जुने टाकून नवीन ग्रहण करत असतो. म्हणजेच निसर्गातील झाडे एक प्रकारे स्वत:ची शुद्धीच करत असतात. त्याचप्रमाणे मानवाचे शरीरही ह्या काळात डीटॉक्स; म्हणजेच शुद्धी करते. पण हा काळ मानवाच्या शरीरासाठी तितकाच संवेदनशील असतो.
ह्या काळात आपल्या शरीरातील कफदोष वाढतो. ह्याने पचनशक्ती मंदावतेे, भूक कमी लागून अपचनचा त्रास होतो, आपल्यात चिडचिडेपणा वाढून शरीरात आळस आणि मरगळ वाढते. शरीरातील पाणी कमी झाल्याने उत्साह कमी होतो. थकवा वाढतो. ह्याच काळात संसर्गजन्य रोग (सर्दी, खोकला, ताप) वाढण्याची शक्यता असते. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असून ह्या दिवशी कडुनिंबाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून आपल्या चैत्र पाडव्याला कडूनिंब खाण्याची शास्त्रीय परंपरा आहे.
आरोग्यदायी सुरुवात
गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची पाने नुसती न खाता ती एका विशिष्ट मिश्रणात खाल्ली जातात. ह्या मिश्रणात जीवनातील सहा रसांचा (चवींचा) समावेश करण्याचा प्रयत्न असतो. जसे की कडुनिंबाची कोवळी पाने, गुळ, ओवा, जिरे, हिंग आणि सैंधव मीठ. हे मिश्रण पचन सुधारते आणि पोटातील जंतूंचा नाश करते. गुळामुळे कडूपणा कमी होतो आणि शरीराला ऊर्जा मिळते.
– ऋतू बदल आणि कडुनिंबाचे आयुर्वेदिक महत्त्व
चैत्र महिन्यात उन्हाळ्याची सुरुवात होते. कडुनिंब हे रक्त शुद्ध करते आणि शरीरातील उष्णता नियंत्रित करते. ह्या काळात होणार्या शारीरिक बदलांना सामोरे जाण्यासाठी कडुनिंब रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतो.
– गुढीला कडुनिंबाचा हार
आपण गुढीला जी डहाळी बांधतो त्यात आपण कडुनिंबाचाही उपयोग करतो. ह्याने आपल्या घरातले व घराच्या आजूबाजूचे वातावरणही शुद्ध होण्यास मदत होते. कडुनिंब हा कडू असला तरी तो रक्तातील अशुद्धी दूर करून, त्वचेच्या विकारांपासून संरक्षण देतो.
– जीवनाचे तत्त्वज्ञान
जीवनात फक्त गोडवा नसून कडू अनुभवांचेही (दु:खाचेही) महत्त्व आहे, हे कडुनिंबाचे पान आपल्याला शिकवते. सुख आणि दु:ख ह्या दोन्ही गोष्टींना समान भावनेने स्वीकारण्याचे हे प्रतीक आहे.
– नैसर्गिक कीडनाशक
जुन्या काळी नवीन पीक घरात येताना धान्याला कीड लागू नये म्हणूनही कडुनिंबाचा उपयोग केला जात असे.
– तापमान आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण
गुढीपाडव्यानंतर वातावरणातील उष्णतेमुळे, आपल्याला येणार्या घामावाटे शरीरातील पाणी कमी होत असते आणि उष्णतेमुळे आपल्याला थंड पाणी पिण्याची इच्छा होत असते. पण ते थंड पाणी आपल्या आरोग्यास खूप हानिकारक असते त्या ऐवजी उसाचा रस, माठातील पाणी, कैरीचे पन्हे, कोकम सरबत असे नैसर्गिक पेय पिणे खूप चांगले. ह्या काळात शरीरही स्वत: स्वत:ची शुद्धी करत असते. म्हणून ह्या काळात आपण योग्य आहारविहार घेतला तर माणूस वर्षभर निरोगी राहू शकतो.
थोडक्यात सांगायचे तर, गुढीपाडवा आणि कडुनिंब ह्यांचा संबंध केवळ धार्मिक नसून तो आयुर्वेद, निसर्ग आणि मानवी आरोग्य यांच्याशी घट्ट जोडलेला आहे.
– आहारविहार
गुढीपाडवा हा केवळ हिंदू नववर्षाचा आरंभ दिन नाही तर तो ऋतू परिवर्तनाचा पण काळ आहे. ह्या काळात वातावरणातील थंडी कमी होऊन उष्णता वाढायला लागते आणि ह्याचा थेट परिणाम वर सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीरावर आणि आपल्या पचनशक्तीवर होतो. ह्या काळात कडुलिंब आणि कडू पदार्थ खाल्ले असता शरीरातील रक्त शुद्ध होते आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. आहारात ताजे आणि गरम, तसेच पचायला हलके अन्न घ्यावे. उदाहरणार्थ, ज्वारी/बाजरीची भाकरी, मुगाची खिचडी आणि पालेभाज्या. ह्या काळात धान्यांमध्ये जुने धान्य आणि कडधान्य खाणे चांगले असते. तसेच, जास्त तेलकट, तूपकट गोड पदार्थ खाणे टाळावे. कारण ह्याने शरीरामध्ये कफ वाढून आजारपण येते.

ह्या काळात वातावरणात उष्णता वाढल्याने शरीराला येणार्या घामामुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ह्या काळात पाण्याचे प्रमाण वाढवले पाहिजे. वर सांगितल्याप्रमाणे उसाचा रस, माठातले पाणी, लिंबूपाणी हे सतत घेत राहिल्याने शरीरात पाण्याचे प्रमाण टिकून राहते. तसेच जर आपण बाहेर उन्हात असलो तर त्या काळात कलिंगडाचे सेवन केलेले चांगले. करण कलिंगड आपल्या शरीरातील पेशींना हायड्रेट करते, म्हणजे उन्हाळ्यात घामावाटे जे पाणी निघून जाते त्याची कमतरता कलिंगड भरून काढते आणि उन्हाळ्यात शरीराला नैसर्गिक थंडावा देते.
व्यायाम
ह्या ऋतूत खूप अतिरिक्त व्यायाम करणे टाळावे. ह्यात योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम हे केल्याने शरीरातील कफ कमी होण्यास मदत होते. वातप्रकृतीच्या लोकांनी सकाळी आंघोळीपूर्वी तिळाच्या तेलाने अंगाला मालिश केल्याने ज्यांची त्वचा खूप कोरडी पडते किंवा त्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे. कफप्रवृत्तीच्या लोकांनी, म्हणजेच ज्यांना शरीरात जडपणा जाणवतो, त्यांनीही हे तेल वापरण्यास हरकत नाही. पित्तप्रकृतीच्या लोकांनी ह्या काळात ह्या तेलाचा वापर मुळीच करू नये. पित्तप्रवृत्तीच्या लोकांनी चंदनाचे तेल किंवा वाळ्याचे तेल ह्याचा उपयोग करावा. ह्या काळात उष्णता वाढत असल्याने आपण सुती कपड्यांचा वापर करावा. आपल्या कपड्यांचा रंग शक्यतो काळा नसावा तर पांढर्या किंवा फिक्कट रंगाचे कपडे वापरावेत.
(लेखक निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत.)