कुटुंब ही मुलाच्या ओळखीची पहिली सामाजिक संस्था, शाळा ही दुसरी. ह्या दोन्हीत कानावर पडणारी भाषा ही एकच असेल, तर मुलाच्या मनात ’आपलेपणाची’ आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते. मुलांसाठी शिक्षणाचे माध्यम निवडतांना मराठी पालकांनी मुलांचा आनंद आणि ’सहज-शिक्षण’ हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला तर ते निश्चित ’मराठी माध्यमच’ निवडतील, आणि जितके अधिकाधिक सुशिक्षित पालक हा निर्णय घेतील तसा तो तळागाळापर्यंत झिरपत जाईल.
…………………….
आज सर्वत्र आपण पर्यावरणाचा होत चालला र्हास वैश्विक तापमान वाढ (ग्लोबल वार्मिंग), जंगल तोड, भूकंप, त्सुनामी नह्यांनी जागरूक होतो आहोत. ही पर्यावरण हानी रोखण्यासाठी काही कार्यकर्ते संस्थात्मक पातळीवर, तर काही देशांतील सरकारं काही कडक कायदे व निर्बंध लावून ही हानी रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. नैसर्गिक पर्यावरणाइतकेच सांस्कृतिक पर्यावरण हाही मानवी जीवनातला एक महत्त्वाचा घटक आहे. पण जसे आपण नैसर्गिक पर्यावरणातील समतोल गृहित धरत गेलो तसेच आपण सांस्कृतिक पर्यावरणही गृहित धरले.एखाद्या विशिष्ट प्रदेशातली संस्कृती अभ्यासतांना, ओळखतांना त्या प्रदेशात बोलली जाणारी भाषा ही त्या संस्कृतीची पहिली ठळक ओळख असते. भाषा म्हणजे फक्त लिपी, व्याकरण, र्हस्व – दीर्घाचे नियम, उच्चार नव्हते, तर त्या-त्या प्रदेशाचा इतिहास, भूगोल, राहणीमान (खानपान, आर्थिक सुबत्ता किंवा गरीबी, उद्योगधंदे, उदरनिर्वाह) मानसिक संरचना, स्वभाव ह्या सार्यांचा निर्देश त्या-त्या भाषेतून होतो. जितकी भाषा जास्त वापरली जाते, बोलली जाते तितकी ती अधिकाधिक समृद्ध होते.’महाराष्ट्र’ ह्या राज्याची भाषा मराठी. इथे राहणार्या बहुसंख्य लोकांची आडनावे मराठी आहेत. हा भाग सांस्कृतिक, औद्यागिक, शैक्षणिक दृष्टीने समृद्ध असल्याने अनेक इतर प्रांतीय लोकही स्थलांतर करून ह्या राज्यात वसले आहेत. त्यातील बर्याच लोकांनी स्वत:ची सांस्कृतिक अस्मिता न मिटवता मराठी संस्कृतीही स्वीकारली आहे. पण राज्याच्या शैक्षणिक धोरणात मात्र मराठीला त्याप्रकारचे महत्त्व दिल्याचे दिसत नाही. किंबहुना, सतत मराठी माध्यमातल्या शिक्षणाला डावलल्याचे दिसून येते. जगभरातील शिक्षणतज्ज्ञांनी, मानसशास्त्रांनी संशोधनाअंती, असा निष्कर्ष काढला आहे की, कुठल्याही मुलाच्या बौद्धिक, भावनिक, मानसिक विकासासाठी मातृभाषेतील शिक्षणाला पर्याय नाही.
लॉर्ड मॅकले ह्यांनी केलेल्या भारत भ्रमणाअंती असे निरिक्षण नोंदवले होते. ‘अख्ख्या भारतात एव्हडी सुबत्ता आहे की, इथे एकही भिकारी नाही की एकही चोर नाही. एतद्देशीय संस्कृती आणि शिक्षण प्रणाली बळकट असल्याचेेच हे चित्र दिसते. (अर्थात हे शिक्षण मातृभाषा आणि परिसर भाषेत होत असे.) हेच शिक्षण आपण इंग्रजीत दिले आणि जे परदेशी आणि इंग्रजी तेच श्रेष्ठतम, असे ह्या जनमानसात बिंबवून त्यांचे स्वदेशी भाषेतले शिक्षण रोखले, तरच आपण ह्यांच्यावर राज्य करू’, थोडक्यात, गुलामगिरी रुजवण्यासाठी आपल्या देशात ’इंग्रजी शिक्षण’ सुरु झाले. ब्रिटिशांकडून आपला देश स्वतंत्र करण्यात आपण यशस्वी झालो, परंतु मानसिक गुलामगिरीतून मात्र आपण अद्याप बाहेर पडलो नाही, उलट अधिकाधिक गुरफटत चाललो आहोत.सर्वं गोष्टीत वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरणारी आधुनिक जनता मातृभाषेतील शिक्षण हेच शास्त्रीयदृष्ट्या मुलांसाठी श्रेयस्कर आहे, ह्या गोष्टीकडे मात्र सपशेल दुर्लक्ष करते. सर्वसाधारणपणे बालकाचा भावनिक आणि बौद्धिक विकास हा वयाच्या पहिल्या आठ वर्षांत घडतो, मातृभाषेतील शिक्षण हे ’सहज’ आणि नैसर्गिक असल्याने सोपे आणि म्हणूनच आनंददायीही असते.मुळात कुठलीही भाषा शिकताना मूल आधी ते ऐकते मग ती बोलते आणि त्यानंतर ते तो लिहायला शिकते. लहान मूल आपल्या आई-वडिलांकडून, कुटुंबातल्या लोकांकडून जी भाषा ऐकते, ती भाषा ते बोलू लागते. हळूहळू हुंकारापलीकडे मूल एकेक शब्द उच्चारू लागते. मग हळूहळू वाक्यरचना करू लागते. आधी घरातल्या, जवळच्या लोकांशी संवाद साधत नंतर त्याची भाषा ज्यांना कळेल अश्या अपरिचितांशीही संवाद करू बघते, घरातल्यांचीच भाषा (मातृभाषा) घराबाहेरच्या भोवतालातही ऐकू आली (परिसर भाषा) की ती परिचित वाटते आणि ते मूल त्या भाषेत ’सहज’ संवाद करू लागते. हा प्रवाह अगदी नैसर्गिक आहे.

कुटुंब ही मुलाच्या ओळखीची पहिली सामाजिक संस्था, शाळा ही दुसरी. ह्या दोन्हीत कानावर पडणारी, बोलली जाणारी भाषा ही एकच असेल, तर मुलाच्या मनात आपसूकच ’आपलेपणाची’ आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते. आधी शब्दाचा नाद, मग उच्चार, मग अर्थबोध आणि त्यानंतर अक्षरओळख हा अनुक्रम शिक्षणात असला पाहिजे. इंग्रजी शिकताना नाद, स्वर अनोळखी, अर्थ माहीत नसतांना शब्द नुसतेच उच्चारणे, ते लिहायला शिकणे आणि नंतर अक्षरबोध, अर्थबोध अशी उलट क्रमवारी असते. मुलांची वाक्यरचना वाचतांनाची अवधान कक्ष 12 ते 20 सेकंदाची असते. (6 ते 8 वर्षांपर्यंत) वाक्यातील शेवटच्या शब्दाचा अक्षरबोध होऊन अर्थबोध होईपर्यंत पहिला शब्द विसरला जाऊ शकतो. पण हेच शिक्षण मातृभाषेत घडत असेल तर अक्षरबोध आणि अर्थबोध ह्या गोष्टी हातात हात घालून येतात. त्यामुळे वाचन, लेखन ह्या गोष्टी सहज साध्य होतात.मूल जेव्हा शाळेत जाऊ लागते तेव्हा ते घरापासून दूर निराळ्या वातावरणात अपरिचित लोकांमध्ये वावरणार असते. उठणे, बसणे, खाणे-पिणे ह्या सर्व गोष्टींमध्ये एक निराळी सुसूत्रता अंगीकारावी लागणार असते. मुलासाठी हा एक संक्रमणाचा काळ असतो. नवी शिस्त, नवीन लोक, सवंगडी, नव्या संकल्पना ह्या सार्यांना सामोरे जातांना त्यातली भाषा ही नित्य परिचयाची असेल तर मुलासाठी हे ’शिकणे’ सुकर होते.आजच्या घडीला महाराष्ट्रात अनेक राज्यांनी द्विभाषा सूत्र अवलंबले आहे. प्रथम स्तरावर राज्यभाषा आणि दुसर्या स्तरावर इंग्रजी, पण महाराष्ट्रात हे चित्र नाही. ’शिक्षण’ हा महाराष्ट्रातील तथाकथित ’शिक्षण महर्षी’ लोकांनी, ज्यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील धनदांडगे राजकारणी समाविष्ट आहेत, ह्यांनी ’इंटरनॅशनल स्कूल्स’ची निर्मिती करून, ‘हेच खरे शिक्षण’ हे जनमानसात बिंबवले आहे.
’लोकल ते ग्लोबल’ (स्थानिक ते वैश्विक) असा शिक्षणाचा प्रवाह न करता ’स्थानिकतेशी’ पूर्ण फारकत घेऊन फक्त विश्वाचे ’स्मार्ट’ (?) नागरिक घडवण्याचा हा अत्यंत अनैसर्गिक प्रयत्न आहे. सध्या सर्वत्र एकजिनसीकरण, सांस्कृतिक सपाटीकरण करण्याकडे कल वाढतो आहे. भारतातील सांस्कृतिक विविधता हीच भारताची खरी ओळख, अस्मिता आहे. एखाद्या व्यक्तीची प्रकृती बघायची असेल तर तिची जनुकीय संरचना (डीएनए) तपासली जाते. पण माणसाची वृत्ती-प्रवृत्ती बघायची असेल तर ती व्यक्ती कोणती भाषा आणि ती कश्याप्रकारे वापरते ह्यातूनच त्याचे दर्शन होते.शिक्षणाद्वारे व्यक्ती कौशल्य शिकते, ज्ञान संपादन शिकते हे खरेच, पण त्याचबरोबर समजून घेणे, माणूस म्हणून अधिक उदात्त होणे, अधिक समाजशील होणे, विविधता स्वीकारणे, समन्वय साधणे, सुस्पष्ट विचार करणे, विवेकाने व्यक्त होणे, हेही शिकते. आपल्या स्वत:च्या भावना व विचार ह्यांच्या स्वत:साठीच्या बोधासाठीसु्द्धा भाषिक विकास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. लहानपणापासून थोरामोठ्यांकडून ऐकलेल्या कविता, बालगाणी, गोष्टी, ऐकलेल्या म्हणी, वाक्प्रचार ह्यांतही मोठा सांस्कृतिक संचय असतो. कित्येक गाणी, म्हणी, त्या-त्या भूप्रदेशातली भौगोलिक वैशिष्ट्ये, इतिहास, धार्मिक जडणघडण दर्शवणारी असतात. अंगभूत शहाणपण व जाणीव, समाजजीवन ह्यांचे प्रतिबिंब त्या-त्या ठिकाणच्या बोलीभाषेत दडलेलं असतं. ती भाषा एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत राहाणे हे ती-ती भाषा जगणं आणि संस्कृती टिकणं ह्यासाठी आवश्यक आहे.महाराष्ट्रातील मराठी माध्यमातील शिक्षणाचा पुरता बट्ट्याबोळ होण्यात सरकारबरोबरच मराठी समाजाचेही योगदान आहे. मराठी शाळांमध्ये शिकून अधिकारपदांवर पोहोचून स्वत:च्या अपत्यांसाठी मात्र इंग्रजी शाळांची निवड करणारे पालक मोठ्या प्रमाणावर दिसतात. उत्तम मराठी शाळा चालवणार्या संस्थाही ’पालकांची मागणी’ ह्या बाबीखाली मूळ संस्थेच्या अर्ध्या जागेत इंग्रजी शाळा सुरू करत आहेत.आदिवासीबहुल भागातही आजकाल एखाद्या घराच्या पडवीत ’ऑक्सफर्ड’, ‘केम्ब्रिज’ अशा नावाच्या नर्सरीज फोफावतांना दिसत आहेत. नर्मदा खोर्यातले कार्यकर्ते आदिवासींना मुख्य प्रवाहात आणतांना त्यांची मूळ संस्कृती, बोलीभाषेतील शब्दांचे, ’शब्दकोष’ संपादित करत आहेत. पावरी, गोंड भाषेतील ’शब्दकोष’ निर्माण करून संस्कृती जतन करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर हे कार्यकर्ते करत आहेत.मराठी जनात मात्र शुद्ध, अशुद्ध, प्रमाणभाषा, बोलीभाषा अशी आधी वर्गवारी आणि नंतर श्रेष्ठ, कनिष्ठ अशी प्रतवारी करत भाषा व्यवहार वाढवण्याऐवजी तो ठप्प कसा होईल ह्याचाच प्रयत्न चाललेला दिसतो. मुंबईतल्या महानगरपालिकेच्या शाळा रंगरंगोटी करून, साजर्या करून, त्यांमध्ये इंग्रजी सीबीएससीचा अभ्यासक्रम लागू करून, गरिबीसाठी ’दर्जेदार’ मोफत शिक्षण उपलब्ध करून दिले गेले. मराठी शाळेतील ’प्रमाण भाषेतील’ शिक्षण घेणे ही ज्यासाठी फारसे सुलभ नव्हते त्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम कुठल्या पद्धतीने विकसित करणार आहे ते ‘शिक्षणधुरीण’च जाणोत.छोटा शिशुगट म्हणजेच ’ज्युनियर के.जी’पासूनच शिकवणीला धाडली जाणारी इवली इवली मुले, आयते प्रोजेक्ट तयार करून देणारे छोटे छोटे ’कुटीरोद्योग’, मुलांचा सर्वांगीण विकास झालाच पाहिजे ह्या इरेला पेटून अभ्यास, संगीत, चित्रकला, एखादा खेेळ ह्यांच्या वर्गांच्या वेळापत्रकात आपल्या पाल्याला जखडून टाकणारे पालक बघितले की अतिशय अस्वस्थ व्हायला होते.वरून खाली झिरपत जाणे हा निसर्गनियम हा भाषाशिक्षण आणि संस्कृती जतनाबाबतीतही लागू होतो. सुशिक्षित मध्यमवर्ग जे करतो तेच खाली झिरपते. मराठी माध्यमाची कास आधी उच्च वर्गीयांनी मग मध्यमवर्गीयांनी आणि आता निम्न आर्थिक स्तरातील लोकांनीही सोडायला सुरुवात केली आहे. हे चित्र असेच राहिले तर येणार्या काळात मराठी माध्यमाची एकही शाळा महाराष्ट्रात दिसणार नाही.शिक्षणांतून उत्तम नागरिक, उत्तम माणूस, उत्तम व्यक्तिमत्त्व घडणे, घडवणे अभिप्रेत असते. व्यक्तिमत्त्व ह्या गोष्टीत ’दिसणे’ ह्यापेक्षा अधिक ’असणे’ ह्या गोष्टीला महत्त्व आहे. एखाद्या व्यक्तीची विचार करण्याची शक्ती, विचार व्यक्त करण्याची पद्धत, इतरांचे विचार समजून घेण्याची क्षमता, इतरांचे विचार स्वीकारता येण्याची वृत्ती ह्या सर्वांवर एखाद्याचे व्यक्तिमत्त्व ठरते. ह्या सर्वांसाठी ’भाषा’ हे एक प्रभावी माध्यम आहे.भाषा ही संस्कृतीची वाहक आहे आणि मराठी माध्यमातील शाळा ह्या मराठी भाषेच्या कणा आहेत. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मराठी संस्कृतीच्या जतन आणि समृद्धतेसाठी मराठी माध्यमाच्या शाळा टिकणे परमावश्यक आहे.कुसुमाग्रजांच्या म्हणण्याप्रमाणे, ’इंग्रजी ही जर खिडकी असेल तर आम्ही नुसत्या खिडक्याच उभारत चाललो आहोत. सुंदर घरासाठी ऊब हवी, भिंती हव्यात, दारे हवीत, डोक्यावर छप्पर हवे, अंगण हवे, परसदार हवे, परसदारी अंगणातल्या मातीच्या रंगाचे मातृभाषेतले नाव माहीत हवे. परसदारातील झाडाफुलांची आधी मनाला ओळख पटली पाहिजे. त्यांच्याशी मैत्री झाली पाहिजे आणि मग अख्ख्या जगाची मुशाफिरी करायला तयार झाले पाहिजे.’भाषा जितकी जास्त वापरली जाईल तितकी ती वृध्दिंगत होईल. मुलांसाठी शिक्षणाचे माध्यम निवडतांना मराठी पालकांनी मुलांचा आनंद आणि ’सहज-शिक्षण’ हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला तर ते निश्चित ’मराठी माध्यमच’ निवडतील, आणि जितके अधिकाधिक सुशिक्षित पालक हा निर्णय घेतील तसा तो तळागाळापर्यंत, शहरांपासून ग्रामीण भागांपर्यंत झिरपत जाईल.
-चिन्मयी सुमीत