वसंतागमीची मोगरी

0

रामाच्या देवळातील कीर्तन, सुंठवडा आणि रामायणातील कथांनी लहानपणाचे भावविश्व समृद्ध झाले. निसर्गातील नवचैतन्य आणि प्रभू रामाचे अयोध्येतील पुनरागमन ह्यांचा सुरेख संगम म्हणजे चैत्र मास. वसंत ऋतूच्या पालवीने नटलेली सृष्टी आणि गुढीपाडव्याचा विजयध्वज मानवी जीवनात सुखाची पहाट आणतात. मोगर्‍याच्या कळीप्रमाणे हा महिना भक्ती, गंध आणि मांगल्याचा अक्षय्य सोहळा साजरा करतो.
……………………..

डॉ. अपर्णा बेडेकर

लहानपणी चैत्राबद्दल आकर्षण वाटण्याची जी कारणं होती त्यात रामाच्या देवळातलं कीर्तन हे एक प्रमुख कारण होतं. आमच्या देवळाच्या प्रवेशद्वाराशी दोन संगमरवरी सिंह होते. अंगणात मोठा पार होता. दीपमाळा होत्या. तिथले खेळ, खाऊ, सिंहावर बसून खेळणं, प्रसादाचे साखरफुटाणे, सुंठवडा अशा नाना तर्‍हेच्या आमीषांनी का होईना कीर्तनाला जायचं, अशी नकळत्या वयातली सवय होती. आई, आजीने चल च! असा ‘च’ कधी जोडला नाही. काही कळतंय का कीर्तनातलं? म्हणून कान पकडले नाहीत. खेळ खेळले म्हणून डोळे वटारले नाहीत. नकळत्या वयातल्या ह्या नकळत झालेल्या गोष्टींमुळे कळत्या वयात त्या सवयीचं मोल कळू लागलं. कीर्तनातल्या शब्दांची, सुरांची मोहिनी पडत गेली. कविता समजत गेली आणि रामजन्माचा सोहळा साजरा करणारा चैत्र लक्षात राहू लागला.

रामायण कुणी कुणाला शिकवत नव्हतं. ते असं आपोआप मनात झिरपत होतं. कवितेसोबतच गोष्टीवेल्हाळपणा मुळातच आवडत असल्याने श्रावणबाळापासून शबरीच्या बोरांपर्यंत, जनकाच्या शिवधनुष्यापासून कुंभकर्णाच्या झोपेपर्यंत आणि मंथरेच्या कारस्थानांपासून त्रिजटेच्या पहार्‍यापर्यंत गोष्टी सांगणारं कीर्तन अतिशय आवडू लागलं. हनुमंत हा तर आमचा लहानपणीच्या विश्वातला साक्षात हिरो होता. जटायू, संपाती, खार, क्रौंच हे सारे पक्षी-प्राणी सुद्धा मनाच्या जवळ होते. आज विचार करताना असं प्रकर्षाने जाणवतं की, ह्या सगळ्या कथा-उपकथा ज्या राम-सीतेकरता सांगितल्या गेल्या, ते ‘राम-सीता’ आणि त्याचं ‘रामायण’ ह्यांच्यामुळे लहानपणचं आमचं भावविश्व आकार घेत होतं. वाल्याचा वाल्मीकी होणं ह्यासाठीची खडतर साधना वगैरे कळणं त्या वयात शक्य नव्हतं. पण तरी, त्यातली अद्भुतता थक्क करून जायची. ‘वैनतेय कुळातल्या जटायूचा भाऊ संपाती सीतेचं अशोकवनातलं वास्तव्य तीक्ष्ण नजरेने प्रत्यक्ष पाहू शकत होता. संपाती नसता तर सीतेचा शोध कसा लागला असता?’ कीर्तनकार बुवांच्या गोष्टीतली हतबलता अस्वस्थ करून जायची आणि संपातीने सीतेचा ठावठिकाणा सांगितला हे ऐकल्यावर माझा लहानगा जीव भांड्यात पडायचा. खरं सांगू का? कीर्तनातून रामायण उलगडणारे असे अनेक चैत्र आजही लख्ख आठवत आहेत. ती कीर्तनं… तो रामजन्म… गोड आठवणी घेऊन आजही येतो आणि सुंठवड्याची तीच चव जिभेवर रेंगाळल्याचा भास होतो.

असेच रामजन्माचे दिवस होते. बुवा मुक्तेश्वरांचं संक्षेप रामायण सांगत होते. चैत्र महिना आसमंतात नटून भरून राहिला होता. रावण वध करून, जानकीला घेऊन रामराजे चौदा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येला परतत होते. हजारो वर्षांपूर्वी गुढ्या-तोरणांनी नटलेली अयोध्या आमच्या मनातही उतरत होती. ऐकणार्‍या श्रोत्यांचे अंतरंग राम गुणगान करत होते. नव्या मोहोराचा गंध ऋतुराजाच्या आगमनाची वर्दी देत होता.

तरु सर्वही देवमंदार झाले । नदीवाटिकी पूर्ण पीयूष आले ।
दिसे रंगली पद्मरागी धरित्री । जगी निंद्य ना वंद्य वंद्या सुपुत्री ।

पये वोळल्या कामधेनू जनाते । हरिचिंतने एकनिष्ठा मनातें ।
धराधीश होता परानंदसिंधु । जगी जीव झाले गुणी संत साधू ।

कनकरसपियूषे मेघधारा न खंडी । सुमनधनसुगंधी विश्व झाले करंडी ।
अगणित गुण ज्याचे अक्षयी रामराजा । उभित गुढी सुखाची शक्र संतुष्ट काजा ॥

बुवा चैत्राच्या वर्णनात रंगून गेले होते. चौदा वर्षांनी रामाचं शुभागमन होतंय ही सर्वसामान्य गोष्ट नव्हती. अयोध्यावासियांचं मन ज्याप्रमाणे चौदा वर्षांची मरगळ झटकत होतं त्याप्रमाणे शिशिरात गारठलेल्या ऋतूची मरगळही दूर सरत होती. सार्‍या निसर्गावर रंग-गंधाचे अलंकार घातले जात होते. मुक्तेश्वरांसारख्या कवीला सारीच झाडं देवमंदार वृक्षाप्रमाणे श्रीमंत वाटू लागली. कुठे नवी पालवी, कुठे आम्रमोहोर, कुठे कोकीळकूजन, कुठे हिरव्या पानांच्या मागे चांदणीप्रमाणे लकाकणारा शुभ्र मोगरा. वसंत ऋतूसाठी सृष्टीने पायघड्या घातल्या. सुगीचे दिवस सुरु झाले. नदी जणू अमृत घेऊन वाहू लागली. कामधेनूच्या दुधाने सुबत्ता आणली. अशा ह्या मंगल मुहूर्तावर रामराजा अयोध्येत येत असल्याची सुवार्ता आली… अयोध्यावासीयांनी त्याच्या स्वागतासाठी सुखाची गुढी उभारली.

रामराजाचं अयोध्येत येणं ही पौराणिक घटना आणि निसर्गाने त्याच्या स्वागताची सर्वतोपरी तयारी करणं ही भौगोलिक, नवसर्जनाची घटना ह्यांच्या आधाराने चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा हिंदू नवसंवत्सराचा पहिला दिवस मानला गेला. वसंत ऋतूने नव्या संवत्सराचा शुभारंभ झाला. रामराजाच्या स्वागतासाठी ऋतुराजही सार्‍या वैभवासह अवतरला!

शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्या सार्‍या संवेदनांसह ऋतुराज अवतरला! मानवी संवादांच्या पठडीत बोलली जाणारी भाषा त्याच्याकडे नव्हती कदाचित! पण हिरवीकंच बोली मात्र कणाकणात दडली होती. तो रसराज होता. त्याच्या सकस मातीला गंध होता. ऋतुराज वसंताचं, चैत्राचं चित्र डोळ्यासमोर रंगवताना नेहमी असं वाटतं की, अशावेळी आपल्या हातात ओंजळभर तरी बिया असाव्यात! आपण त्या निगुतीने पेराव्यात आणि बीजातून जन्म घेणारा सर्जनाचा कोंभ बघावा. नवजात बाळाच्या तळव्यासारख्या दिसणार्‍या त्याच्या लाल कोवळ्या पानांचा स्पर्श अनुभवावा. रुजलेल्या शब्दांची कविता होताना पाहावी!

नाना गुंफिलीं कां मोकळीं ।
उणीं न होती परिमळीं।
वसंतागमीचीं वाटोळीं ।
मोगरीं जैसीं॥

माऊली ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने ह्या एका ओवीत सारा वसंत ऋतू त्याच्या सार्‍या गुणवैशिष्ट्यांसह मांडलाय. माउली म्हणतात, किती रुजून आलं त्या संख्येवर परिमळाचं परिमाण अवलंबून नाही, कारण हा वसंतऋतूतला मोगरा आहे. असंख्य फुलांचा गुंफलेला गजरा असो किंवा अगदी एखादंच सुटं फूल… त्यांच्या परिमळात जराही अधिक-उणेपणा नाही. संगमाच्या पाण्याचे काही थेंब तीर्थ म्हणून प्राशन केले तरी त्यात संगमावरच्या सार्‍या नद्यांचे गुणधर्म सामावलेले असतात, त्याप्रमाणे वसंतऋतूतली एक कळी सारा ऋतू धारण करते. इवल्याशा एका कळीतही गंधाचं सारं साम्राज्य, ऋतूचा सारा डौल, शुभ्रतेतली सारी शुचिता आणि सर्जनातला सारा सोहळा सामावलेला असतो.

असा हा चैत्र… पुढे येणार्‍या नव्या संवत्सराचं स्वागत करणारा महिना… रामरायाच्या जन्मोत्सवाचा महिना आणि रामसीतेच्या अयोध्या आगमनाचा महिना… चैत्रगौरीचा महिना..! ह्या सार्‍या शुभसंकेतांना धारण करणारी गुढी, म्हणजेच रामाचा विजयध्वज सदा लहरत राहो! सारा वसंतऋतू धारण करणारी मोगर्‍याची वेल त्या विजयध्वजासोबत गगनावरी जात राहो आणि नवसंवत्सर सर्वांना सुखदायी, फलदायी असो!

(लेखिका संतसाहित्याच्या अभ्यासक, लोकप्रिय वक्त्या आणि विद्यावाचस्पती उपाधीविभूषित आहेत.)

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech