40 वर्षांपेक्षा जास्त अशी रंगभूमीवरची कारकीर्द. तीही विविध वळणांची, अभ्यासपूर्ण, नवनिर्मितीची, काहीतरी नवीन घडविणारी, त्यासाठी धजणारी आहे. केवळ एक ‘स्त्री’ रंगकर्मी म्हणूनच नाही तर एक ‘समर्थ रंगकर्मी’ म्हणूनही विजयाबाई मेहता यांनी अनेक कलाकारांना प्रगल्भपणे घडविलेले आहे. आजही बाई अथकपणे त्याच उत्साहात, मिश्कील हास्य चेहर्यावर ठेवून नव्या पिढीसाठी कार्यशाळा घेत आहेत. बाई अजूनही नातवंडांच्या वयाच्या रंगकर्मींसाठी नवीन काही देऊ पाहतायत… घडवू पाहताहेत… त्यामुळे त्या अजूनही नाटकाच्या शाळेतील ‘बाईच’ आहेत…
मराठी रंगभूमीला दीडशे वर्षांपेक्षा मोठी परंपरा आहे. त्यात संगीत रंगभूमीचा फार मोठा वाटा आहे. यातूनच मराठी रंगभूमीची जडणघडण, प्रगती झाली आणि उर्जितावस्था आपल्या नाट्यसृष्टीला प्राप्त झाली. आपल्या रंगकर्मींनी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पाश्चात्य रंगभूमी, परदेशी नाटके, ग्रीक शोकनाट्य ह्यांची माहिती करून घेतली. नाटकांचे अनेकविध प्रकार शैली, रचना कौशल्य, लेखन, दिग्दर्शन आणि बदलत जाणारे प्रवाह, ह्यामधून आपल्या रंगकर्मींनी शोध-बोध घेत अभ्यास केला. यातूनच प्रायोगिक किंवा समांतर रंगभूमी नावाची नवी वाट चोखाळली. प्रायोगिक रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि सृजनशील नाट्यकर्मींच्या चळवळी उभ्या राहिल्या. नाट्यक्षेत्रात नवे वारे वाहायला लागले आणि पारंपरिक नाट्यनिर्मिती, संगीत रंगभूमी, ह्यापेक्षा एक वेगळे नाटक ह्या नवनिर्मितीचे सृजन आकाराला आले आणि मराठी रंगभूमी ही अग्रगण्य रंगकर्मींची अशी ओळख प्राप्त होऊ लागली.
मधून अनेक तंत्रामध्ये, नवनवीन प्रयोग होऊ लागले आणि नावीन्याचा ध्यास घेतलेले वेगळा विचार घेऊन येणारी मंडळी रंगभूमीवर आली. यामुळे नाटकाला एक वेगळे अवकाश प्राप्त झाले. असेच, एक नाटक ह्या एकाच वेडाने, तळमळीने वावरणारे सृजनशील नाव म्हणजे विजया मेहता.
विजया मेहता ह्यांच्या नाट्य प्रवासावर दृष्टीक्षेप टाकण्याआधी थोडे मागे जाऊन पाहायला हवे, की जिथे पुरुषच ‘स्त्री’ भूमिका करीत होते. त्यामुळे ‘पुरुष’ पुन्हा तिथे होतेच पण कालांतराने अभिमानास्पद गोष्ट घडली ती अशी की स्त्रीयांनीही ह्या क्षेत्रात यायला सुरूवात केली.
मराठी रंगभूमीवर स्त्रियांनी कामे केली. त्यात गिरीजाबाई केळकर, ह्यांनी नाट्य लेखन केले त्यात ‘पुरुषाचे बंड’, ‘राजकुमार’, ‘मंदोदरी’, ‘अमिषा’, ‘सावित्री’ ‘हीच मुलीची आई’ असे नाट्यलेखन केले. त्यामुळे त्या पहिल्या ‘स्त्री’ नाटककार ठरल्या, 1928 च्या मुंबईत झालेल्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षही झाल्या.
त्यानंतर हिराबाई पेडणेकर, हे दुसरे नाव. ही स्वातंत्र्यपूर्व काळातील वाटचाल, पण स्वातंत्र्योत्तर काळात मात्र ह्यात भर पडली. त्यात प्रामुख्याने मालती बेडेकर, जोत्स्ना भोळे, मुक्ताबाई दीक्षित, तारा वनारसे, सरिता पत्की, सुधा करमरकर, लीलावती भागवत, सुहासिनी मुळगांवकर, शिरीष पै, सई परांजपे, जोत्स्ना देवधर, कविता नरवणे, माधुरी पुरंदरे, नीलकांती पाटेकर, कुसुम अभ्यंकर, लीला फणसळकर, वसुधा पाटील, वंदना विटणकर, ज्योती म्हापसेकर, सुषमा देशपांडे, प्रतिमा कुलकर्णी आणि नव्या दमाच्या मनस्विनी लता रविंद्र, इरावती कर्णिक. सगळ्यांनीच नाट्यसृष्टीत कमी अधिक प्रमाणात वावर केला, पण ज्यांच्या कार्याची दखल घेतली गेली, अशी नावे फारच थोडी आहेत. त्यात सई परांजपे, सुधा करमरकर, जयमाला शिलेदार, कीर्ती शिलेदार, ज्योती म्हापसेकर, सुहासिनी मुळगांवकर, सुषमा देशपांडे, प्रतिमा कुलकर्णी ही नावे महत्त्वाची ठरली यात कोणी नाट्यलेखन केले, कोणी दिग्दर्शनच.
ह्या सार्या नाट्यक्षेत्रात लेखन-दिग्दर्शन करणार्या स्त्रियांमध्ये एक नाव उठून दिसते ते म्हणजे विजया मेहता यांचे. जागतिक रंगभूमीवर केलेले कार्य, विविध नाट्यविषयक शाळांमध्ये प्रमुखपद, नाट्य प्रसार, अभिनय असा चाळीसहून अधिक वर्षे त्यांचा प्रवास अविरत सुरू आहे. विजया जयवंत, विजया खोटे, विजया मेहता ते विजयाबाई हे विलक्षण उर्जेने भरलेले नाव आहे.
केवळ नाट्यक्षेत्रात अभिनय, दिग्दर्शनच नाही तर आपली सगळी ऊर्जा नाटक आणि नाटके यासाठी लावणे, अभ्यासोनी प्रगटावे असच आहे. त्यांचा प्रवास सुरू झाला तो 1951 सालापासून आंतर महाविद्यालयीन एकांकिका – एक उदयोन्मुख अभिनेत्री म्हणून ह्या नवथर वयात त्यांना भेटले ‘दाजी भाटवडेकर’ विल्सन कॉलेजचे ‘माजी विद्यार्थी त्यांच्या दिग्दर्शनात साकारली ‘लग्नाची बडी‘ मधील ‘यामिनी’. ‘घराबाहेर’मधील ‘निर्मला’. ह्याला उत्कृष्ट अभिनयाची पारीतोषिके मिळाली. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर एम.ए. करावसे वाटले. ते करताना विख्यात दिग्दर्शक अब्राहीम अल्काझी, ह्यांचा सहवास मिळाला. त्यातून ‘ऑथेलो’मधील ‘डेस्टीमोना’ साकारली.
अशा प्रवासात ‘ऑथेलो’चा मराठी अवतार ‘झुंझारराव’, ‘नानासाहेब फाटक’ आणि चित्रपट सृष्टीतील नामवंत मंडळी ‘राजा परांजपे’ वसंत ठेंगडी, के. नारायण काळे, कुसुम देशपांडे ह्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यात ‘थिएटर युनिटचे’ नाट्य प्रशिक्षणही मिळाले. मग अल्का झींच्या दिग्दर्शनात ‘आर्म्स अॅन्ड द मॅन’, ‘इंडीपिस’, ‘नो एक्झीट’, ‘द हाऊस ऑफ बर्मार्डा आल्बा’ ‘रेक्स’ ही नाटके अभिनीत केली. ह्या अभ्यासक्रमातून रंगभूमीचे सुजाण-समृद्ध, भान त्यांना आले. ह्याच काळात दोन गुरुंचा लाभ झाला ते मर्झबान आणि दुर्गा खोटे, मर्झबान यांच्यामुळे रंगभूमीविषयीची पुस्तके, संगीताच्या ध्वनिमुद्रिका ह्यांचा लाभ झाला. एकूणच सुरुवातीच्या काळात अभिनय हेच क्षेत्र होते. त्यात महाविद्यालयीन कालखंड होता. संशय कल्लोळ (कृत्तिका), लग्नाची बेडी (यामिनी), घराबाहेर (निर्मला) हा अभिनय प्रवास महत्त्वाचा ठरला. तर ‘बारह बजे (हिंदी एकांकिका) लेखन, फिल्म – एक फार्स (भूमिका, दिग्दर्शन) आणि अल्काझी सोबतचे नाट्यप्रशिक्षण. असा नाट्यप्रवास चालू होता त्यात आयएनटी, मुंबई मराठी साहित्य संघ, भारती विद्या भवन, टेल्को कल्चरल सेंटर जमशेदपूर, कुलाबा महिला विकास मंडळ, एकांकिका ह्याचे काम सुरू होते. इथेच सारे नाटकवेडे भेटले.
अशातच भारती विद्याभवनमध्ये विजय तेंडुलकरांचे ‘श्रीमंत’ हे नाटक दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली. विजय तेंडुलकरांशी चर्चा करताना नाटकावर बोलताना विजय तेंडुलकरांनी त्यांना ‘बाई’ असे संबोधले आणि ‘विजयाबाई’ हे संबोधन रूढ झाले. पुढे त्या सार्यांच्या ‘बाई’ झाल्या.
‘श्रीमंत’ नाटकासाठी विजया जयवंत आणि डॉ. श्रीराम लागू ह्यांना पारितोषिके मिळाली. इथेच पु.ल.देशपांडेंशी त्यांचा परिचय झाला आणि पुलंची नाटकेही त्यांनी अभिनित केली. त्यात ‘सुंदर मी होणार’, ‘तुझं आहे तुजपाशी’ह्या नाटकांचा समावेश आहे. अभिनय, दिग्दर्शन असा प्रवास सुरू असताना त्यांच्यासोबत असणार्या सार्यांनाच एक निश्चित नाव असलेली चळवळ उभी राहावी असे वाटायला लागले आणि त्यातून आकारास आली ‘रंगायन’. ‘पु. शि. रेग्यांचे’ ‘कालयवन’ हे नाटक बाई करणार होत्या, पण ते राहूनच गेले. पण पु. शिं. रेगे ह्यांनी संस्थेसाठी सुचवलेले नाव ‘रंगायन’ सर्वांनाच आवडले आणि एक नाव असलेली संस्था सुरू झाली. श्री. पु. भागवत पहिले अध्यक्ष झाले. माधव वाटवे, वसंत सरवटे, वृंदावन दंडवते ही रंगायनची पहिली फळी. रंगायनमध्ये नाटक, एकांकिका, ह्यांचे प्रयोग केले गेले. त्यात शितू (लेखक गो. नी. दांडेकर) यशोदा (श्री. ना. पेंडसे) मी जिंकले, मी हरलो, कावळ्यांची शाळा, आदी, ही तेंडुलकरांची नाटके, ‘एक होती राणी’(अनुवाद -श्रीराम लागू) ‘आई’ (अनुवाद- माधव मनोहर), ‘एक शून्य बाजीराव’(श्री. चि. त्र्यं. खानोलकर) ‘सुलतान’, ‘होळी’, ‘यातनाघर’, ‘एक म्हातार्याचा मृत्यू’ (महेश एलकुंचवार) ‘देवाजीनं करूणा केली’ (मळ लेखक – बर्टोल्ट ब्रेटल, अनुवाद: व्यंकटेश माडगुळकर) अशा नाटक, एकांकिकांचा नाट्यप्रवासात सहभाग होता.
‘बाईं’बद्दल तेंडुलकर म्हणतात, ‘रंगायन सुरू झाल्यापासून विजया जयवंत, विजया खोटे – मेहता ह्या ‘रंगायन’च्या एकमेव केंद्रबिंदू होत्या. त्यांनी म्हणावे तसे व्हावे हा अलिखित कायदा होता. रंगायन म्हणजे बाई आणि विजयाबाई म्हणजे रंगायन असे मानले जात होते. विजयाबाईंची जी बलस्थाने होती ती रंगायनची बलस्थाने होती. रंगभूमीविषयीची रंगायनची समज विजयाबाईंची होती आणि तिच्यात घडत गेलेल्या बदलाची सरळ प्रतिबिंबे होती.’ बाई प्रायोगिक रंगभूमीवर मनस्वीपणे वावरल्या, सर्व अनुभवांची शिदोरी घेऊन व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश करण्याची तयारी सुरू झाली, त्यावेळी त्याकाळातील व्यावसायिक रंगभूमीवरचे मोहन वाघ, मोहन तोंडवळकर, साहित्य संघ, धी गोवा हिंदू असोसिएशन ह्या संस्था कार्यरत होत्या.
प्रायोगिक रंगभूमीवर बाईंनी आतापर्यंत विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, चि. त्र्यं. खानोलकर, बादल सरकार, स. गो. साठे, पु. ल. देशपांडे, श्री. ना. पेंडसे, रत्नाकर मतकरी, श्रीराम लागू, वृंदावन दंडवते अशा नाट्यलेखकांसोबत काम केले होते. तर आता व्यावसायिक रंगभूमीवर त्यांना काम करावे लागले त्यात सुरेश खरे, पद्माकर गोवईकर, जयवंत दळवी, वसंत कानेटकर, अनिल बर्वे, सई परांजपे, गिरीश कर्नाड, आणि महेश एलकुंचवार ह्यांच्यासोबत. पहिले नाटक होते ते 1972च्या दरम्यान आलेले ‘मला उत्तर हवंय’ (सुरेश खरे) निर्मिती- मोहन तोंडवळकर (कलावैभव) एक मध्यमवर्गीय मुलगी, पैशाच्या हावेमुळे भरकटते आणि कॉलगर्ल बनते, अशी शोककथा असलेले नाटक. हे नाटक जोरदार चालले. पण बाईंना ते फारसे पटले नाही. त्यानंतर दुसरे नाटक ‘रातराणी’ (पद्माकर गोवईकर) ह्यांनी बंगाली नाटकाचे केलेले मराठी भाषांतर (निर्मिती- साहित्य संघ मंदिर) ‘एक अभिनेत्रीची शोकांतिका’ यात दिग्दर्शनासोबत प्रमुख भूमिका, सहकलाकार दत्ता भट, राजा बापट, अनंत वर्तक, मग ‘एका घरात होती’ (सुरेश खरे) (निर्मिती- कलावैभव) अचानक अंपगत्व आलेल्या पतीचा आणि संसाराचा भार वाहणारी आणि आयुष्यातील सुख-दु:खाला जिद्दीने सामोरी जाणारी, परिस्थितीवर मात करणारी ‘स्त्री’ ह्यात सहकलाकार होते श्रीकांत मोघे, दत्ता मोने. ‘अजब न्याय वर्तुळाचा’ (मूळ-लेखक: बर्टोल्ट बे्रख्त/ अनुवाद चि. त्रं. खानोलकर) ‘कॉकेशियन चॉक सर्कल- हे मूळ नाटक, साम्यवादी विचार घेऊन येणार्या ह्या नाटकाचे दिग्दर्शन विजयाबाई व फ्रिट्झ बेनेव्हिटझ यांनी केल होते. साहित्य संघाची निर्मीती होती. ह्यात भक्ती बर्वे, सुहास भालेकर होते. परदेशात जाणारे हे पहिल नाटक, जर्मनीला त्याचे तीन आठवड्यांत सोळा प्रयोग झाले. भारतीय रंगभूमीवरची लोककला ह्या माध्यमातून ब्रेख्तचे नाटक साकारले गेले. वसंत कानेटकरांसोबतचे नाटक होते. ‘अखेरचा सवाल’ (निर्मिती: धी गोवा हिंदु असोसिएशन, दिग्दर्शन : दामु केंकरे) एक प्रसिद्ध, पेशाने डॉक्टर असलेल्या बाईच्या मुलीला कॅन्सर होतो आणि ह्या असाध्य आजाराला तिची मुलगी आणि ती धीटाने सामोरी जातात. ह्यात डॉक्टर स्वत: बाई तर मुलगी भक्ति बर्वे यांच्या भूमिका होत्या. ह्यानंतरच्या काळात सई परांजपे ह्यांनी लिहिलेल्या नाटकाचे दिग्दर्शन बाईनी केले. नाटक होते ‘जास्वंदी’. ह्यामधील नायिका सोनिया बाहुलीसारखी चाळीशीकडे झुकलेली, श्रीमंत घर, सर्वस्वी कामात गुंतलेल्या एक उद्योजकाची पत्नी. संतती नाही. घरात नोकर-चाकर, सुखासिन आयुष्य, तिने दोन मांजरे पाळलेली आहेत. तिच्या नवर्याचे अस्तित्व केवळ फोनवरच. ह्या एकाकीपणात तिच्या आयुष्यात तरुण येतो आणि त्याच्या सहवासात बाहेरचे जग, मोकळ्या आकाशाशी ओळख होते आणि पिंजरा तोडण्याचा केविलवाणा प्रयत्न करते. तो असफल होतो आणि जास्वंदीच्या फुलासारखे सुंगध नसलेले फूल एवढीच ओळख उरते. ह्यात विक्रम गोखले सहकलाकार होते. अनिल बर्वे ह्या लेखकाचे नाटक ‘हमिदाबाईची कोठी’ हमिदाबाईची गोष्ट, त्याना एका प्रवासात भेटलेल्या मुलीची गोष्ट, एक मुस्लिम गजलगायिका, आपल्या मुलीला आपल्या व्यवसायापासून दूर ठेवते व शिक्षणासाठी बाहेरगावी ठेवते, ह्यावर आधारलेले नाटक. कोठा, कोठ्यावरील वातावरण, तिची मुलगी शब्बो हमिदा (कोठेवाली) ह्यांच्यावर आधारित, भास्कर चंदावरकरांनी 1945 ते 50 चा काळ आपल्या संगीतामधून साकारला. भारती आचरेकर, लीना कुलकर्णी, नाना पाटेकर, अशोक सराफ अशा आत्ताच्या प्रतिथयश कलाकारांनी भूमिका केल्या होत्या. (निर्मिती: माऊली प्रॉडक्शन) अशी नाटके व्यावसायिक रंगभूमीवर सादर करीत असताना जयवंत दळवींची बाईंनी केलेली नाटके ही फार महत्त्वाची ठरली. तो एक विशेष कालखंड ठरला. जयवंत दळवींचे नाट्यलेखन पाहता स्त्री-पुरुष संबंध हा अनेक नाटकातला केंद्रस्थानी असलेला अतिशय महत्त्वाचा विषय. दळवी स्त्री-पुरुष यांच्या संबंधातील प्रतिमा काहीशा स्पष्ट आणि ठामपणे काहीतरी सांगू इच्छितात. पण दळवी त्या काळातील हिट अॅन्ड हॉट नाटकाच्या रांगेत आपल्या नाटकाला बसवू इच्छित नाहीत, तर दळवी आपल्या नाट्यातून संबंधातील वेगळे कोन, काही कोपरे शोधतात आणि त्या काळातील मध्यमवर्गीय मराठी समाजातील लैंगिक प्रश्न मांडतात.
बाईंनी केलेल्या, ‘संध्या छाया’ नाटकात एक वृद्ध जोडप्याचे एकाकी, कंटाळवाणे जीवन आनंदी करून घेण्याची त्यांची धडपड. आपल्या मुलांमध्ये त्यांनी गुंतवलेल्या त्यांच्या अपेक्षा व स्वप्ने ह्या सार्या फोल ठरतात आणि त्यांच्या मनाचा उडणारा थरकाप, शेवटाकडे जाणारा भयाण, उजाड असे एकाकीपण आणि आपल्या जीवनाची जाणीव आणि मग शेवटी स्वत:ला संपविण्याचा त्यांनी केलेला विचार. ह्यानंतरचे दळवीचे नाटक होते ‘महासागर’ त्यांच्याच ‘अथांग’ ह्या कादंबरीवर आधारित. दळवी यू. एस्. आय्. एस. मध्ये नोकरी करीत होते. त्यावेळी तिथल्या पार्ट्यांना त्यांना जावे लागे. त्यामधील उच्च मध्यमवर्गीय मराठी, त्यांच्यामधील संबंध, तिथे एकमेकांना मिठ्या मारणे, चुंबन घेणे, दारू पिणे आणि ह्यात कुठलाही अभिनिवेश न ठेवता सगळा व्यवहार आपल्या लग्नाच्या जोडीदारासमोर चाले. ह्या गोष्टीचे दळवींना आश्चर्य वाटे. ह्यातूनच एक आकर्षण वाढीला लागले आणि ह्यातून मध्यमवर्गीय नैतिकता, सुख-दु:ख, नातेसंबंध, ह्यावर सुचलेली कादंबरी (अथांग) आणि नंतर आकाराला आलेले नाटक ‘महासागर’. ह्यात विक्रम गोखले, नाना पाटेकर मंगेश कुलकर्णी, उषा नाडकर्णी हे कलाकार होते. ह्या नाटकाचे दोन हजार प्रयोग झाले. दळवींची नाटके, कथा, कादंबरीवरूनच आली, त्यामुळे त्यांचा आवाका मोठा होता. पण विजयाबाईंनी त्या सार्यांवर दळवींसोबत चर्चा करून त्याला नीटनेटके नाट्यरूप दिले. ‘अंधाराच्या पारंब्या’ ह्या कादंबरीवर आधारीत नाटक होते ‘बॅरिस्टर’. ह्याचे टप्प्याटप्प्यावर माध्यमांतर होत गेले. आधी नाटक तर नंतर बाईंनी त्यावर ‘रावसाहेब’ नावाचा चित्रपटही केला.
वेड किंवा भ्रमिष्ट अवस्था ह्या माणसाच्या अवस्था दळवींच्या कुतूहलाच्या गोष्टी आहेत. त्याचे प्रत्यंतर त्यांच्या अनेक कथा-कादंबर्यांमधून वाचायला मिळते. चारचौघांसारखे आयुष्य असलेली माणसे अचानक कशी वेडी होतात किंवा वेड कसे लागत असावे याबद्दल दळवी ह्यांच्या मनात जिज्ञासपणा एक कुतूहल, काहीशी उत्सुकता. काही माणसे खंबीर, तर काही मनाने खचलेली. अनेक मानसिक आघात सहन करताना त्यांचे भावनांवर नियंत्रण राहत नाही, जी काहीशी भित्री असतात. असे विश्लेषणात्मक नाटक ‘बॅरीस्टर’. ह्यात विक्रम गोखले, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, आणि स्वत: विजयाबाई मावशीबाई असा कलावंतांचा संच होता. द. ग. गोडसे यांनी ह्या नाटकाच्या नेपथ्यातून 1920 सालाचे वातावरण उभे केले होते. तर विक्रम गोखले आणि त्यांचे वडील चंद्रकांत गोखले ह्यांनी एकत्र भूमिका केल्या होत्या. दळवींच्या नाट्यमालिकेतील आणखी एक नाटक होेते ‘पुरुष’. राजकीय, सामाजिक, नैतिक हिंसाचाराचा विचार, राजसत्ता, हिंसा, शुगरलॉबी, भ्रष्टाचाराची साखळी, दरारा, बोलघेवडेपणा, शिक्षण क्षेत्रातील अगतिकता, दलित चळवळींचा गोंधळ, सामान्य माणसाची होणारी गळचेपी, गांधींच्या अहिंसावादी मुल्यांची पिछेहाट ह्या सार्यांना घेऊन ‘पुरुष’ धगधगीत जीवन वास्तव रंगभूमीवर आले. ह्यामधील बलात्कार, समाजाचे नाकर्तेपण, नाकारणे, अत्याचार सहन करणे आणि आपल्याच माणसांनी विरुद्ध दिशेला तोंड फिरवणे, त्यात कायदा, सहकारी, मित्र, आणि ‘स्त्री’ वर्गसुद्धा ह्यामधून आलेली चिड, अवहेलना. आतून आकारास आलेली ‘दुर्गा’ योग्य रितीने दळवींनी मांडली. ह्यात रिमा लागू, नाना पाटेकर ह्यांनी भूमिका केल्या. सतीश पुळेकर, उषा नाडकर्णी, चंद्रकांत गोखले हे सहकलाकार होते! हे नाटक गाजले, एक अभिनेता म्हणून नाना पाटेकर ह्यांना प्रस्थापित होण्यात महत्त्वाचे ठरले.
ह्या दळवींसोबतच्या प्रवासात विजयाबाईंची काही नाटके फसलीही होती. त्यात ‘अधांतर’ ह्या कादंबरीवर आधारीत ‘सावित्री’ हे नाटक. यामधील ‘सावित्री’ एक सुशिक्षित, सुंदर कर्तृत्ववान एका जाहिरात कंपनीत महत्त्वाच्या पदावर काम करतेय, स्वत:च्या पैशातून घेतलेले घर, प्राध्यापक नवरा आणि चौदा वर्षांचा मुलगा. सावित्रीचे दोघांवरही प्रेम आहे, पण रांधा-वाढा, उष्टी काढा ह्या सार्यात तिचं मन रमत नाही. तिचे उच्च पदस्थ असणे तिच्या नवर्याला मान्य आहे, पण ते खूपतेसुध्दा आणि त्याला येणारे अपयश, ह्यातून दोघांमध्ये तेढ निर्माण होतेे. तो आपल्या मुलाला घेऊन निघून जातो. अशात अस्वस्थ झालेली सावित्री बॉसच्या जवळ येते त्याच्यात गुंतते. तो विवाहीत असूनही तिच्यासोबत आठ वर्षे राहतो आणि अचानक त्याच्या मुलीचे लग्न जमत नाही म्हणून तो परत आपल्या जुन्या संसारात निघून जातो. सावित्री पुन्हा एकाकी होते. ह्या नाटकाच्या शेवटावरून दळवी आणि बाई यांच्यात वाद झाले आणि ते नाटक फसले.
असेच दुसरे नाटक होते नल-दमयंती पुराण कथेवर आधारीत. शृंगार, करुण, अद्भुत अशा रसातून उभी राहिलेली कथा कानेटकरांना हास्यरसातून मांडायची होती. नारदमुनी, देव आणि मानव ह्यांचा सोंगट्याप्रमाणे वापर करतात. ह्यामधील पुराण कथेची मांडणी खुसखुशीत करण्यामध्ये नाटकाचे मूळ हरवले आणि नाटक फसले. हे नाटक दादू इंदूरीकर ह्यांच्या हाती पडले असते तर त्याचा प्रयोग चांगला वळला असता, असे बाईंना वाटते. बाईंना ‘होळी’, ‘सुलतान’ ह्या एकांकिकांमधून गवसलेला नाटककार महेश एलकुंचवार. त्यांच्या मते ते तेंडुलकरांच्या तोडीचे नाटककार वाटतात. त्यांचे नाटक बाईंनी केले ते होते ‘वाडा चिरेबंदी’. वाड्यातील एका कुटूंबात वडील गेल्यामुळे इस्टेटीची वाटणी यामधील प्रसंगामधून नाटक उभे राहते.
बाईंचा व्यावसायिक रंगभूमीवर वावर चालू होता. त्यातच त्यांना आंतरराष्ट्रीय संस्कृत परिषदेसाठी जर्मनीत प्रयोग करण्यासाठी, जर्मनी आणि भारत मिळून करण्याचा प्रकल्प हाती आला. त्यासाठी विशाखादतंच ‘मुद्रराक्षस’ हे नाटक निवडले गेले. ते सातव्या शतकातील नाटक. ह्या नाटकाचे लेखन डॉ. गो. के. भट ह्यांनी केले. ह्या नाटकाची रचना भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावर आधारीत. त्यामधील संकेत मतवारीणी, रंगशीर्ष, रंगपीठ ह्याचे तपशील नट-नटीचे आगमन-गमन, पदन्यास, हस्तमुद्रा ह्या सार्यांचा प्रवास ह्या नाटकात केला होता. ह्यात चित्तरंजन कोल्हटकर ह्यांनी चाणक्याची भूमिका केली. ह्या प्रयोगासाठी गुरुकृष्णन कुट्टी, ह्यांचे नृत्य दिग्दर्शन, द. गो. गोडसेंचे नेपथ्य आणि भास्कर चंदावरकरांचे संगीत. ह्या नाटकाचे प्रयोग जर्मनीला झाले.
विजयाबाई ‘वाडा चिरेबंदी’नंतर व्यावसायिक रंगभूमीपासून दूर झाल्या. पण नाट्यप्रवास थांबविला नाही. ‘लाईफ झिंगला’ जर्मन भारतीय नाटक केले ते होते गिरीश कर्नाड यांचे. ‘नागमंडल’ ते हिंदीतही केले. हे नाटक लोककथेवर आधारित होते. बाईंनी आधी ‘हृदयवदन’ हे कर्नाडांचे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर केले होते. ‘नागमंडल’ हे नाटक जर्मनी, बर्लिनला तितकेसे यशस्वी ठरले नाही. त्यामुळे भारत-जर्मन प्रकल्पातील ते शेवटचे नाटक ठरले. मात्र बाईंनी माध्यमांतर केले. मुंबई दूरदर्शनवरून ‘लक्ष्मीबाई टिळक’ ह्यांच्यावर चित्रपट बनविण्याची त्यांना संधी मिळाली. बाईंनी ‘स्मृतिचित्रे’मधून नाटकातून चित्रपट माध्यमात प्रवेश केला. ‘स्मृतिचित्र’ ह्या चित्रपटाला राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार लाभले. कार्लोव्हावारीत चित्रपट महोत्सवात त्यांचा दिग्दर्शक म्हणून गौरव करण्यात आला. ह्या यशानंतर एनएफडीसीच्या सहयोगाने ‘बॅरिस्टर’ नाटकावर ‘रावसाहेब’ हा चित्रपट साकारला, ह्यात‘बॅरिस्टर’ची भूमिका अनुपम खेर ह्यांनी केली. ह्या चित्रपटलाही राष्ट्रीय, आंतररष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. पण हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. त्यानंतरचा एन. एफ. डी. सी.चा ‘पेस्तनजी’ हा चित्रपट निर्माण केला. त्यालाही विविध पुरस्कार प्राप्त झाले. तर ‘स्मृतिचित्रे’, ‘पेस्तुनजी’, ‘रावसाहेब’ ह्याचा चित्रपट महोत्सव अमेरिकेत संपन्न झाला. युनायटेड टेलीव्हिजनसाठी काही टेलीफिल्म निर्माण केल्या. ‘लेटर टू द डॉटर’, हिंदी ‘शांकुतल’, वाडा चिरेबंदी (हवेली बुलंद थी), हमिदाबाईची कोठी (हमिदाबाई की कोठी) असे दूरदर्शनपट निर्माण केले. तर दूरदर्शनसाठी ‘लाईफलाईन’ ही मालिका दिग्दर्शित केली. ती लोकप्रिय ठरली. अशाच प्रवासात 1993 साली एनसीपीएच्या संचालकपदी सूत्रे हाती घेतली आणि त्यांनी वस्तूत: नाटक-लोककला, नृत्य, गायन, संशोधन असे कार्यक्रम, कार्यशाळा ह्यांचे उपक्रम राबविले. यात डॉ. अशोक रानडे, पु. ल. देशपांडे ह्यांचाही समावेश होता.
विजयाबाईंना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, ‘पद्मश्री’ टोकीयो आंतररष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘पार्टी’ चित्रपटासाठी अभिनयाचा पुरस्कार, मॅनटाईम (जर्मनी), आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शनाचा पुरस्कार (रावसाहेब), श्री. बा. दा. ठाकरसी विद्यापीठांकडून डॉक्टरेट, श्री. विष्णूदास भावे पुरस्कार, मा. दिनानाथ मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव असे अनेक सन्मानाचे पुरस्कार विजयाबाईंना प्राप्त झाले.
गेल्या कही वर्षांत परिस्थिती बदलली आहे. पण गंभीर दृष्टिकोन तितकाच महत्त्वाचा आहे आणि तो अग्रक्रमाचाही आहे. एकूणच स्त्री वर्गाचा नाट्यक्षेत्राकडे बघण्याचा गंभीर असा दृष्टिकोन दिसत नाही. नाटक, चित्रपट, दूरदर्शन ह्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर महिला कलाकार येत आहेत. पण एक नटी त्या व्यतिरिक्त लेखन-दिग्दर्शन ह्यासाठी कोणीच उत्सुक दिसत नाही. कविता, कथा, कादंबरी, वैचारिक लेखन असे त्या करताना दिसतात. पण रंगभूमीवर अभिमानास्पद, सृजनशील अशी कामगिरी करताना दिसत नाहीत. ह्या वर्गाकडे सृजनशीलता, अमाप प्रतिभाही आहे. पण दिग्दर्शन-लेखन ह्यात कोणी वावरताना दिसत नाही, आहेत त्यांची संख्या अगदी नगण्य आहे. त्यामुळे विजयाबाईंसारखी 40 वर्षांपेक्षा जास्त अशी रंगभूमीवरची कारकीर्द. तीही विविध वळणांची. अभ्यासपूर्ण, नवनिर्मितीची अशी असलेली, काहीतरी नवीन घडविणारी, त्यासाठी धजणारी आहे. केवळ एक ‘स्त्री’ रंगकर्मी म्हणूनच नाही तर एक ‘समर्थ रंगकर्मी’ म्हणूनही, त्यांनी अनेक कलाकारांना प्रगल्भपणे घडविलेले आहे.
आजही बाई अथकपणे त्याच उत्साहात, मिश्कील हास्य चेहर्यावर ठेवून नव्या पिढीसाठी कार्यशाळा घेत आहेत. अगदी त्यांच्या नातवंडांच्या वयाच्या मुला-मुलींसाठी. त्यामुळे कलाकाराला वय नसते हेच खरे. कलावंतांकडून जेव्हा नवीन काही देण्याचे थांबते तेव्हाच त्याचे वय झाले असे म्हणू शकतो. पण बाई… अजूनही रंगकर्मींसाठी नवीन काही देऊ पाहतायत… घडवू पाहताहेत… त्यामुळे त्या अजूनही नाटकाच्या शाळेतील ‘बाईच’ आहेत…