डोंबिवलीत ‘वंदे मातरम्’च्या निनादात घुमणार हिंदू नववर्षाचा उत्साह

0

महाराष्ट्रातील स्वागतयात्रांची जननी आणि सांस्कृतिक उपराजधानी अशी ओळख असलेल्या डोंबिवलीत यंदाची ‘हिंदू नववर्ष स्वागत यात्रा’ वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. ‘वंदे मातरम्’ गीताचे १५० वे वर्ष आणि छत्रपती संभाजी महाराजांचे सर्वोच्च बलिदान अशा दोन मुख्य संकल्पनांवर आधारित हा उत्सव साजरा होणार आहे. श्री गणेश मंदिर संस्थेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत या नियोजनाची घोषणा करण्यात आली.

यंदाचे मुख्य आकर्षण: देशभक्ती आणि शौर्याचा जागर
यंदा या स्वागतयात्रेचे २८ वे वर्ष असून, उत्सवाचा केंद्रबिंदू ‘वंदे मातरम्’ गीताला पूर्ण झालेली १५० वर्षे हा आहे. यानिमित्त विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे:

७ मार्च: शहरातील ३७ शाळांमधील १८०० विद्यार्थी एकत्रितपणे ‘वंदे मातरम्’ गायन आणि देवदेशोपासना करणार आहेत.

१८ मार्च: छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त ‘शिवशंभू रणशौर्य अमृतगाथा’ या गीत-नृत्याविष्काराद्वारे वीर शंभूराजांना आदरांजली वाहिली जाईल. नाशिकचे महंत सुधीरदास महाराज यावेळी तरुणांशी संवाद साधतील.

तरुणाईचा वाढता सहभाग
यंदाच्या उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे संयोजन समितीत तरुणांना मोठी संधी देण्यात आली आहे. ‘गावकीचा उत्सव’ असलेल्या या सोहळ्यात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री गणेश मंदिर संस्थेच्या अध्यक्षा अलका मुतालिक आणि संयोजन समिती प्रमुख अमेय काटदरे यांनी केले आहे.

उत्सवाचे वेळापत्रक आणि कार्यक्रम
१५ मार्च: अथर्वशीर्ष पठण, बाईक रॅली, श्रीसूक्त पठण, दीपोत्सव आणि रांगोळी प्रदर्शन.

१९ मार्च (गुढीपाडवा):  सकाळी महापौर ॲड. हर्षाली चौधरी थविल यांच्या हस्ते श्री गणेशाची महापूजा आणि पंचांग वाचन होईल.

पालखी प्रस्थान: सकाळी ७:१५ वाजता भागशाळा मैदान येथून ढोल-ताशांच्या गजरात स्वागत यात्रेला सुरुवात होईल.

मार्ग: भागशाळा मैदान → पंडित दीनदयाल पथ → शिवमंदिर पथ → राजेंद्र प्रसाद रोड → मानपाडा रोड → शिवाजी महाराज पुतळा → बाजीप्रभू चौक → फडके रोड.

समाप्ती: सकाळी १०:३० वाजता आप्पा दातार चौक येथे सांगता.

१०० हून अधिक संस्थांचा सहभाग
शहरातील १०० पेक्षा जास्त सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था या यात्रेत सहभागी होणार आहेत. या पत्रकार परिषदेला सचिव प्रविण दुधे, उपमहापौर राहुल दामले, नगरसेवक मंदार हळबे यांसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech