कच्च्या तेलाचा भडका! एप्रिलअखेर भाव १८० डॉलरपार जाण्याची भीती; जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट?

0

मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सौदी अरेबियातील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत अंदाजानुसार, जर इराण संघर्ष आणि पुरवठ्यातील अडथळे एप्रिलच्या अखेरपर्यंत कायम राहिले, तर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १८० डॉलरपेक्षा जास्त जाऊ शकतात.

द वॉलस्ट्रिट जर्नलच्या अहवालानुसार, सध्या ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे ११५–१२० डॉलर दरम्यान आहे, जी फेब्रुवारीच्या अखेरीपासून जवळपास ५० टक्क्यांनी वाढली आहे. या वाढीमागे ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ले आणि पुरवठा साखळीतील व्यत्यय हे मुख्य कारण आहे.

विशेषतः होर्मूझ सामुद्रधुनी परिसरातील तणावामुळे जागतिक तेलपुरवठ्यावर मोठा परिणाम होत आहे. या मार्गातून जगातील सुमारे २० टक्के तेलपुरवठा होतो. तसेच सौदी अरेबियातील यांबू टर्मिनलवर झालेल्या हल्ल्यामुळे पर्यायी पुरवठा मार्गही धोक्यात आला आहे.

सौदी अधिकाऱ्यांनी किमतींचा संभाव्य टप्प्याटप्प्याने वाढणारा अंदाज मांडला आहे:
नजिक काळ: १३०–१४० डॉलर
एप्रिलच्या सुरुवातीला: सुमारे १५० डॉलर
पुढील वाढ: १६०–१६५ डॉलर
एप्रिल अखेर: १८० डॉलरपेक्षा अधिक

सौदी अरामको लवकरच अधिकृत किमती जाहीर करणार असून, त्यातून बाजारातील पुढील दिशा स्पष्ट होईल.

इतक्या वेगाने वाढणाऱ्या किमतींबाबत सौदी अरेबिया सावध आहे. उच्च किमतींमुळे इंधन वापर कमी होऊन जागतिक मागणी घटण्याचा धोका आहे. तसेच महागाई वाढ, व्याजदर वाढ आणि आर्थिक वाढ मंदावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एकूणच, तेलबाजार सध्या अत्यंत अनिश्चित टप्प्यात असून, संघर्ष किती काळ चालतो यावर पुढील किमती अवलंबून असतील.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech