“वाझे काय लादेन आहे का?” विचारणाऱ्यांना आता मंत्र्यांचे फोटो दिसू लागले; नवनाथ बन यांचा संजय राऊतांना ‘घरचा आहेर’

0

नाशिकच्या भोंदू बाबा खरात प्रकरणामुळे तापलेल्या राजकीय वातावरणात आता भारतीय जनता पार्टीने शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे या दोन्ही पक्षांना एकाच वेळी लक्ष्य केले आहे. “गुन्हेगारांना पाठीशी घालणारे सरकार आता सत्तेत नाही, त्यामुळे खरात बाबा प्रकरणी सर्व दोषींवर कठोर कारवाई होईल याची खात्री संजय राऊतांनी बाळगावी,” अशा शब्दांत भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी राऊतांना घरचा आहेर दिला.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत नवनाथ बन यांनी संजय राऊतांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ‘वाझे’ प्रकरणाने महाराष्ट्राच्या प्रतिमेला डाग लागल्याची आठवण करून देत ते म्हणाले, “वाझे काय लादेन आहे का?” असे विचारणारे आज मंत्र्यांच्या फोटोंवरून आरोप करत आहेत. केवळ एखाद्या मंत्र्याचे फोटो भोंदू बाबासोबत आहेत म्हणून तो दोषी ठरत नाही. मविआ काळात उद्योगपतींच्या घराबाहेर बॉम्ब ठेवण्याची हिंमत पोलिसांना झाली होती, पण आता फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील गृहखाते अशा प्रवृत्तीची पाळेमुळे उखडून टाकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याच वेळी बन यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. राज्याच्या अर्थव्यवस्थेवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंनी अर्धवट माहितीच्या आधारे बोलू नये, असे त्यांनी सुनावले. “पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात १६.५ लाख कोटी असलेली अर्थव्यवस्था आज ५४ लाख कोटींवर पोहोचली आहे. २०२९ पर्यंत ‘ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्थेचे स्वप्न घेऊन देवेंद्र फडणवीस काम करत आहेत,” असे सांगत त्यांनी मेट्रो आणि कोस्टल रोडच्या यशाकडे लक्ष वेधले. पायाभूत सुविधांमध्ये भाषिक मुद्दा आणण्यापेक्षा राज ठाकरेंनी स्वतः मेट्रोने प्रवास करून जनतेचा अनुभव घ्यावा, अशी खोचक विनंतीही त्यांनी केली.

विशेष म्हणजे, संजय राऊतांनी खरात प्रकरणातील कारवाईबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केल्याचा उल्लेख करत बन यांनी टोमणा लगावला की, “राऊतांना हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडल्याचे दिसतेय.” खरात फाईल्स असोत वा इतर कोणतीही प्रकरणे, राजकीय लागेबांधे असले तरी कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशाराही भाजपाने या निमित्ताने दिला आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech