इराणकडून आखातातील ऊर्जा प्रकल्पांवर हल्ल्याची दिलेली धमकी प्रत्यक्षात उतरल्याने कतारमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. कतारच्या सरकारी ऊर्जा कंपनी कतार एनर्जीने दिलेल्या माहितीनुसार, देशातील प्रमुख नैसर्गिक वायू निर्यात प्रकल्प रास लाफन इथं क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणावर आग लागून “मोठं नुकसान” झालं आहे.
कंपनीच्या निवेदनानुसार, आपत्कालीन पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, सर्व कर्मचाऱ्यांची सुरक्षितता तपासण्यात आली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा तीव्र निषेध करत त्याला “राष्ट्रीय सुरक्षेला थेट धोका” आणि देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असे म्हटले आहे. दरम्यान, अंतर्गत मंत्रालयाने नागरी संरक्षण पथकांनी आगीवर प्राथमिक नियंत्रण मिळवल्याची माहिती दिली.
रास लाफन औद्योगिक शहर हे दोहा शहरापासून सुमारे ८० किमी अंतरावर असून जगातील महत्त्वाच्या एलएनजी (LNG) उत्पादन केंद्रांपैकी एक आहे. इथं अनेक आंतरराष्ट्रीय ऊर्जा कंपन्यांची उपस्थिती आहे.
या हल्ल्यापूर्वी इराणने कतार, सौदी अरेबिया आणि यूएईमधील तेल व गॅस प्रकल्पांना लक्ष्य करण्याचा इशारा दिला होता. त्यात रास लाफन शुद्धीकरण प्रकल्प, मेसईद पेट्रोकेमिकल संकुल आणि अल होसेन गॅस फिल्ड यांचा समावेश होता. या पार्श्वभूमीवर कतारने काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची सुरक्षिततेसाठी स्थलांतर प्रक्रिया सुरू केली होती.
हे हल्ले इस्रायलने इराणच्या साउथ पार्स गॅस क्षेत्रावर केलेल्या कारवाईनंतर झाले असून, अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे संकेत आहेत. यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा आणि तेल-गॅस बाजारपेठेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खासकरून, एलएनजी पुरवठा साखळी येत्या काही दिवसांतच विस्कळीत होऊ शकते.