‘लालपरी’साठी सरनाईकांचा ‘रिफॉर्म्स’ गियर; तोट्याची घरघर थांबवून एसटी आता धावणार नफ्याच्या रुळावर!

0

लालपरीच्या चाकाला लागलेली ‘तोट्याची घरघर’ थांबवण्यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आता थेट ‘रिफॉर्म्स’चा गियर टाकला आहे. सुमारे १२ हजार कोटी रुपयांचा संचित तोटा आणि दररोज होणारा कोट्यवधींचा तोटा भरून काढण्यासाठी महामंडळाने केवळ तिकीट विक्रीवर अवलंबून न राहता ‘बहुआयामी’ उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे. यामध्ये डिझेल खरेदीतून वाचणारे २४१ कोटी रुपये आणि जाहिरातींतून मिळणारे २५० कोटी रुपये हा या प्लॅनचा मुख्य कणा ठरणार आहे.

परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिझेल खरेदीच्या निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणून तेल कंपन्यांच्या मक्तेदारीला लगाम घातला आहे. “कोणताही राजकीय हस्तक्षेप न जुमानता स्पर्धात्मक निविदा काढल्यामुळे आता प्रति लिटरमागे मिळणारी सवलत थेट ५.१३ रुपयांवर पोहोचली आहे. यामुळे वर्षाकाठी एसटीचे तब्बल २४१ कोटी रुपये वाचणार आहेत,” असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, एका तेल कंपनीने या प्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिले होते, मात्र न्यायालयानेही एसटीची बाजू रास्त ठरवत हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

– एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर: इंधन चोरी आणि गळती रोखण्यासाठी एसटीच्या प्रत्येक इंधन टाकीला ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आधारित सेन्सर बसवण्यात येणार आहेत. यामुळे १०० लिटरमागे होणारी ४ ते ५ लिटरची चोरी थांबणार आहे.
– इंधन विक्रीत प्रवेश: एसटी आता स्वतः पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी पंप सुरू करणार आहे. पीपीपी तत्त्वावर १०० हून अधिक ठिकाणी ‘मल्टी-मोडल इंधन पंप’ उभारून वर्षाला १०० कोटींचे उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट आहे.
– जाहिरातीचा धमाका: यापूर्वी केवळ २०-२२ कोटी मिळवून देणाऱ्या जाहिरात विभागाला आता २५० कोटींचे लक्ष्य दिले आहे. बसस्थानके आणि बसेसवर डिजिटल फलकांच्या माध्यमातून महसूल वाढवण्यात येणार आहे.
सौर ऊर्जेतून बचत: बसस्थानकांच्या छतावर सौर प्रकल्प उभारून स्वतःची वीज स्वतः निर्माण करण्याचा आणि जास्तीची वीज विकून १० ते १५ कोटी रुपये कमावण्याचा आराखडा तयार आहे.

“केवळ तिकीट विक्रीने एसटी जगू शकणार नाही, म्हणूनच आम्ही व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारला आहे,” असे सांगत प्रताप सरनाईक यांनी पुढील आर्थिक वर्षात चालक-वाहकांच्या ड्युटी नियोजनातही एआयचा वापर करून ‘ओव्हरटाइम’ खर्चावर नियंत्रण मिळवण्याचे संकेत दिले आहेत. या सर्व धडाकेबाज निर्णयांनंतर आता लालपरी तोट्यातून बाहेर पडून ‘नफ्याच्या रुळावर’ कधी धावणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech