‘मी कशाला आरशात पाहू गं, मीच माझ्या रूपाची राणी गं’, असं कुणीही कितीही म्हटलं, तरीपण आरश्यासोबत असलेली आपली मैत्री काही सुटत नाही. पूर्वीच्या काळी, सूर्य मावळला की घरंदाज मुली-महिलांनी आरश्यात पाहायचं नाही, अशी एक प्रथा प्रचलित होती. काळ बदलला. महिला घराचा उबंरठा ओलांडून बाहेर पडल्या. आज असे कोणतेच क्षेत्र नाही की जिथे स्त्रियांचा वावर नाही!
आपल्यातील गुणवत्ता, कौशल्य आणि कर्तबगारीच्या बळावर महिला आज प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवीत आहेत. हे सर्व करत असतानाच स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाची, सौंदर्याची काळजी घेणे ओघाने आलेच. दिनक्रम कितीही धावपळीचा असला किंवा वेळ हाताशी उरत नसला तरी स्वत:साठी थोडाफार वेळ तरी काढायला हवाच. आपले असणे, जगणे अधिक खुलवण्यासाठी थोडीशी मेहनत आणि खूप सारी काळजी घ्यायला हवी.
प्रत्येकजणीला असे वाटतच असते की, आपण सुंदर दिसावे. नेहमी उत्साही आणि प्रसन्न राहावं. स्वत:साठी रोज थोडासा वेळ काढला तर हे अशक्य नाही. मात्र, आपले सौंदर्य वाढविताना आपण नक्कीच काळजी घ्यायला हवी.
त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी
त्वचा हा आपल्या शरीराचा आणि सौंदर्याचा अविभाज्य घटक आहे. त्वचा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. नितळ त्वचेकडे जसे लोकांचे लक्ष वेधले जाते, तसेच ते खराब त्वचेकडेही वेधले जाते. म्हणूनच आपण आपल्या त्वचेची नीट काळजी घेणे अत्यावश्यक आहे. चॅनेलच्या भाऊगर्दीत आपण प्रत्येक चॅनलवर वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींचा रतीब पाहतो. त्यांचा वापर करायचा अथवा नाही, करायचा असल्यास तो कसा करायचा, हे सर्व व्यक्तीसापेक्ष झाले. मात्र, आपल्या नेहमीच्या वापरातल्या काही घटकांच्या माध्यमातून आपण आपल्या त्वचेसंबंधातील काही व्याधींचे सहजगत्या निवारण करू शकतो.
- रुक्ष त्वचेमुळे कित्येकदा अंगाला खाज सुटते. अशावेळी त्वचेला कोथिंबिरीचा रस लावावा व अर्ध्या तासाने स्नान करावे.
- हिरवे मूग सालीसह दळावेत आणि अंघोळीच्यावेळी पाण्यात किंवा दुधात कालवून त्वचेवर लावावे. हा उपाय नेहमी करता येतो. मुगाच्या पिठामुळे त्वचेचा पोत सुधारतो.
- जायफळ दुधात उगाळून त्याचा लेप त्वचेला लावावा. काही दिवसांतच त्वचेला झळाळी आल्याचे दिसून येईल. मुरुमांचे डागही नाहीसे होतात.
- वारंवार धुवूनही कितीतरी जणींच्या चेहर्याचा तेलकटपणा राहतो. ही समस्या असेल तर, नागरमोथ्याची पावडर पाण्यात कालवून स्नानापूर्वी अर्धा तास आधी सर्वांगाला लावावी व नंतर स्नान करावे. हा उपचार आठवड्यातून दोनच वेळा करावा.
- याविरुद्ध आपल्याला कोरड्या त्वचेच्या समस्येनेही त्रास होतो. यावर खोबरेल तेल आणि साजुक तुपाचे मिश्रण नैसर्गिक मॉईश्चरायझरचे काम करत असल्याने त्वचेची आद्रता टिकून राहण्यास मदत होते.
- अभ्यंग हे त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे, मात्र आजच्या धावपळीच्या दिनक्रमात एवढा वेळ कोणापाशी असत नाही. अशावेळी शक्य तेव्हा त्वचेला तेल लावून स्नान करणे गरजेचे आहे. त्वचा तेल शोषून घेत असल्याने त्याचा नक्कीच फायदा होतो. तसेच, वारंवार साबण बदलू नये, त्वचेला रुक्ष करील असा साबण वापरणे टाळावे. दिवसातून 2/3 वेळा पाण्याने चेहरा, हातपाय धुतल्यासही त्वचा चांगली राहते. निस्तेज, पिंपलयुक्त त्वचा सौंदर्यात बाधा आणते. चेहेर्याची त्वचा मऊ, चमकदार, सतेज ठेवण्यासाठी दैनंदिन कार्यक्रमात क्लिन्जींग, टोनींग, मॉईश्चरायजिंग, व एक्सफोलीएशन यांचा समावेश जरूर करावा. यामुळे त्वचेचा पोत सुधारतो.
- क्लिन्जींग : हा त्वचेच्या निगराणीतला पहिला टप्पा असून यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ केली जाते. यासाठी तेलकट, कोरडी किंवा संमिश्र अशा त्वचेच्या प्रकारानुसार क्लिन्जरची निवड करावी. चेहर्यासाठी नेहमी क्रिमी क्लिन्जर वापरावा.
- टोनींग : क्लिन्जरने चेहर्याची त्वचा स्वच्छ केल्यावर टोनरचा वापर करावा. यामुळे त्वचेत राहिलेले तेलाचे किंवा मेकअपचे अंश निघून जाण्यास मदत होते.
- मॉईश्चरायजिंग : टोनरचा उपयोग केल्यानंतर उघडी झालेली त्वचेची रंध्रे बंद करण्यासाठी मॉईश्चरायजरचा वापर करावा. यामुळे तेथे जंतुसंसर्ग होणार नाही. शिवाय घराबाहेर पडण्यापूर्वी हानिकारक किरणांपासून बचाव करण्यासाठी चेहर्याला, मानेला सनस्क्रीन लोशन जरूर लावावे.
- एक्सफोलीएशन : चेहेर्यावर साठत असलेल्या मृत पेशींच्या थरामुळे त्वचेला एक प्रकारचा निस्तेजपणा येतो. हा थर हटविण्याचे काम एक्सफोलीएशनमुळे केले जाते. यासाठी सौम्य स्क्रबरचा किंवा पीलचा वापर करावा. घरगुती फेसपॅकही यासाठी उपयोगी पडतात.
केसांची काळजी कशी घ्याल?
प्रदूषित वातावरण, थकवा आणि रोगांमुळे केस निस्तेज होण्याचे प्रमाण वाढले आहे. केसांची योग्य काळजी न घेणे , केस कापण्याची चुकीची पद्धत आणि विटॅमिन, प्रोटीनचा अभाव यामुळे केस निकृष्ट बनतात, गळतात आणि निस्तेजही होतात. आपल्याला जगण्यासाठी ज्याप्रमाणे अन्नाची गरज भासते त्याप्रमाणे केसांसाठीही पोषक आहाराची गरज असते. केसांच्या आरोग्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. मासे, सोया, कॉटेज चीझ आणि डाळी यांचा आहारात समावेश करावा. संत्र, पिवळी फळे आणि भाज्यांत बीटा केराटीन आढळते. बी1, बी6, बी12, सी आणि ए विटॅमिन केसांसाठी पोषक असते. शाकाहारी असणार्यांनी दोन टेबलस्पून प्रोटीनयुक्त पावडरचा आहारात समावेश करावा .
काही टीप्स
- ओले केस कधीही विंचरू नयेत.
- केसांतील गुंता प्रथम बोटांनी सोडवावा. केस विंचरताना कमरेत वाकून केस चेहर्यावर आणा आणि मानेपासून केसांच्या टोकापर्यंत केस विंचरा. रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यासाठी कमीत कमी 100 वेळा केसांत कंगवा फिरवणे आवश्यक आहे .
- शॅम्पू केल्यानंतर प्रोटीनयुक्त कंडिशनर केसांना लावावेत .
- जोजोबा तेल , कोरफड आणि सोडिअम लॉरेथ सल्फेटयुक्त शॅम्पूने केस धुवावेत. कंडिशनर लावताना कानाच्या मागील केसांपासून केसांच्या टोकापर्यंत लावावे. डोक्यावरील त्वचेला कंडिशनर लावू नये.
- केस कोरडे असताना कंडिशनर लावावे आणि कोमट पाण्याने ते धुवावे .
- केस धुतल्यानंतर ते कोरडे करण्यासाठी टॉवेलने घासून कोरडे करू नयेत. डोक्याला पाच ते सात मिनिटे टॉवेल बांधावा आणि हलक्या हाताने केस पुसावेत.
- केसांमधील कोंडा घालविण्यासाठी आंबट दही केसांना लावावे. आंबट दही आंघोळीपूर्वी केसांना लावावे व साधारणपणे 15 ते 20 मिनिटांत केस धुवून टाकावे. तसेच आपण लिंबाचा रस केसाला लावला तर कोंड्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
सौंदर्य प्रसाधने वापरताना…
प्रत्येकीला प्रत्येक सौंदर्य प्रसाधनाची ऍलर्जी असलेच असे नाही. प्रत्येकीच्या त्वचेची संवेदनक्षमता वेगवेगळी असते. सौंदर्य प्रसाधने वापरण्यापूर्वीच नीट दक्षता घेतली गेली तर त्याचा त्रास होण्याची शक्यता कमी असते.
- हेअर डाय : आकर्षक आणि तरुण दिसण्यासाठी केसांना कलप लावला जातो. ह्या कलपांमध्ये फेनिल-अलानाईन-डायमाईन नावाचं द्रव्य वापरलं जातं. असे कलप वापरल्याने चेहरा सुजणं, लाल होणं, तसंच टाळू, चेहेरा आणि डोळ्यांची आग होणं अशा गोष्टी होऊ शकतात. दीर्घ काळापर्यंत हे कलप वापरल्यामुळे ह्या व्याधी त्या व्यक्तीला कायमच्या चिकटतात. कदाचित कलप वापरल्यानं त्वचेचा कॅन्सरही होऊ शकतो.
- केसांचे सुगंधी तेल : सुगंधी द्रव्यांची ऍलर्जी असेल तर डोके जड होणे, दुखणे, अशी दुखणी सुरू होतात. आयुर्वेदिक साबण व सौम्य तेल विशेषतः खोबरेल तेल वापरणे हितकारक असते.
- लिपस्टिक : लिपस्टिकमधील मेण आणि रंग काहीजणींना अपायकारक ठरू शकतात. त्याच्या रोजच्या वापरामुळे ओठ काळेसुद्धा पडतात.
- मस्कारा व आय शॅडोज : ह्या प्रसाधनांमध्ये विविध धातूंचा उपयोग केला जात असल्यामुळे त्वचेचा रंग कायमचा बदलू शकतो, डोळ्यांभोवती काळे होणे आणि डागही पडू शकतात.
- फेस पावडर, क्रीम : विविध प्रकारच्या फेस पावडरींमध्ये, क्रीम्स आणि फाऊंडेशन्समध्ये असे काही पदार्थ वापरलेले असतात की त्यांची अनेकांना ऍलर्जी असते. त्यामुळे त्वचा लाल होते. चेहर्याची आग आग होते, पुरळ उमटते, तर कित्येकदा चेहर्यावर चट्टेही पडतात.
- ब्लिचिंग : गोरे दिसण्यासाठी महिला ब्लिचिंग करतात. पण ह्या ब्लिचमध्ये अमोनियाकरण केलेला पारा वापरलेला असतो. त्याच्यामुळे त्वचेला अपायच होत असतो.
- साबण : बहुतेक सर्व साबणांमध्ये कॉस्टिक सोडा वापरलेला असतो. विशेषतः औषधी साबणांमध्ये जंतू प्रतिबंधक द्रव्ये वापरलेली असतात. ह्या द्रव्यांमुळे त्वचेला कोरडेपणा येतो. त्यातून पुढे त्वचेचे विविध विकार उद्भवू शकतात.
- नेल पॉलिश : सर्वसामान्यपणे नेलपॉलिशमध्ये ’फॉर्मलडिहाईड लिकर’ ह्या द्रवाचा वापर केलेला असतो. त्यामुळे ’पॅरानोसिया’, म्हणजे नखांचा विकार होऊ शकतो.
सौंदर्यवृद्धीसाठी काही घरगुती उपाय…
घरगुतीच उपाय करून आपण आपल्या शरीराची काळजी घेऊ शकतो. बाजारातील केमिकल असलेल्या वस्तू वापरण्यापेक्षा घरच्या वस्तू वापरल्या तर आपण आपल्या त्वचेची जास्ती काळजी घेऊ शकतो.
- डोळ्याखालची वर्तुळे घालविण्यासाठी चंदन आणि जायफळाची पेस्ट डोळ्यांभोवती रात्री लावून ठेवावी. सकाळी धुवून टाकावे. यामुळे डोळ्यांना गारवा मिळून त्याखालील काळी वर्तुळे नाहीशी होतील.
- सावळेपणा दूर करण्यासाठी एक बादली पाण्यात एका लिंबाचा रस टाकावा. ह्या पाण्याने स्नान करण्याने त्वचेची बंद रंध्रे खुलतात आणि त्वचा उजळते. हिवाळ्यात हा प्रयोग करताना गरम पाणी घ्यावे आणि उन्हाळ्यात थंड पाणी घ्यावे. सावळेपणा दूर करण्यासाठी आवळा चूर्णात थोडं पाणी मिसळून ती पेस्ट चेहर्यावर व पूर्ण शरीरावर लावावी.
- ओठांचे सौंदर्य राखण्यासाठी ओठ काळे पडले असतील तर दुधात मीठ मिसळून लावावे. काही वेळाने स्वच्छ पाण्याने धुवून टाकावे. ओठांवर पापडी जमा होत असेल तर लोण्यात केशर मिसळून ओठांना लावावे.
- हातापायांवरील व्रण, डाग घालवण्यासाठी लिंबाची साल त्यावर पाच ते सात मिनिटांसाठी चोळावी. हा उपाय दिवसातून दोनदा असा कमीत कमी सात दिवस तरी करावा. डाग कमी होतील.
- पुटकुळ्या घालविण्यासाठी कारल्याची साल चेहर्यावर चोळावी. यामुळे पुटकुळ्या, काळी वर्तुळे, काळे डाग निघण्यास मदत होईल. हा उपाय साधारणतः तीन ते पाच दिवस करून पाहावा.
- हिवाळ्यात पावलांची खूप काळजी घ्यावी लागते. त्यासाठी रात्री झोपण्याआधी थोडावेळ कोमट पाण्यात पाय बुडवून ठेवावेत व मऊ कपड्याने पुसून घ्यावे.
- नखांची स्वच्छता ठेवण्यासाठी गरम पाण्याने हात धुवावेत म्हणजे नखे लगेच स्वच्छ होतात. लांब नखं असतील हात धुतांना काळजी घ्यावी, कारण गरम पाण्याने हात धुतल्याने नखं मऊ होऊन तुटू शकतात.
हेअर स्टाईल निवडताना…
नवी केशरचना करण्यास उत्सुक असलेल्या स्त्रिया इतक्या गोंधळलेल्या असतात की आपल्याला कुठला हेअरकट शोभून दिसेल हेच त्यांना कळत नाही. अशा त्या अनिश्चिततेत मग पार्लरमध्ये जाऊन एखादी आगळीवेगळी केशरचना किंवा आपल्या आवडीच्या अभिनेत्रीसारखीच हेअर स्टाईल करण्यास सांगतात. मात्र, त्यावेळी आपल्या चेहर्याला, व्यक्तिमत्त्वाला आणि आपल्या नोकरी व्यवसायाला,शोभणारीच हेअर स्टाईल निवडण्याचे भान त्यांना राहत नाही.
अंडाकृती चेहरा : अंडाकृती, अर्थात ओव्हल शेप चेहर्यावर, अनेक प्रकारच्या आधुनिक हेअरस्टाईल करता येतात. मात्र, साधारण प्रकारची, त्याचप्रमाणे सिंगल लेन्थ कट हेअरस्टाईल अधिक चांगली दिसते. अशा चेहर्यावर व गालावर मोठ्या प्रमाणात बटा कधीच सोडू नयेत.
गोल चेहरा : गोल आकाराच्या चेहर्यावर लहान केस अधिक चांगले दिसतात. अशा केसांसाठी वरच्या बाजूने केस विंचरा. मध्यभागी भांग पडण्याऐवजी कानाच्या बाजूने भांग पाडल्यास शोभून दिसेल, सगळे केस एकत्र करून विंचरल्यास चेहरा अधिक मोहक दिसेल. चेहर्यावर थेट ओघळणार्या किंवा कानाच्या बाजूला अधिक बटा सोडू नका.
आयताकृती चेहरा : आयताकृती चेहर्यासाठी लहान, तसेच मध्यम लांबीची केशरचना करू शकता. भरपूर केसांसाठी उपयुक्त अशी ही केशरचना सौंदर्याला शतगुणित करते. मात्र, अशा चेहर्यावर खूप लांब केसांची हेअरस्टाईल करू नये.
त्रिकोणी चेहरा : अशा आकाराच्या तरुणींनी लहान हेअरस्टाईलची निवड करावी. मध्यभागी भांग पाडण्याऐवजी बाजूला भांग पाडून केस विंचरावेत. त्रिकोणी आकाराच्या चेहर्यावर कानशिलापर्यंत केस भुरभुरणारी हेअरस्टाईल चांगली दिसेल. मात्र, ह्या केसांच्या बटा ओठांजवळ लहान आकाराच्या ठेवाव्यात. जेणेकरून केशासौंदर्य पाहणार्यांच्या नजरा ओठाकडे वळणार नाहीत.
चौकोनी चेहरा : ह्या आकाराचा चेहरा असणार्या तरुणींनी लहान किंवा मध्यम लांबीची केशरचना निवडावी. चेहर्याच्या चहुबाजूने काहीशी असमान किंवा गोलाकार कापलेली केशभूषासुद्धा अनुभवून पाहावी. मध्यभागी भांग न पाडता जर चेहर्यावर वलयांकित बटा सोडून वरच्या बाजूला जुन्या हिंदी सिनेतारकांप्रमाणे उंच भासणारी केशभूषा केल्यास चेहरा अधिक मोहक दिसेल. मात्र, शक्यतो लांब आणि सरळ जाणारी हेअरस्टाईल टाळावी. लिनियर किंवा पातळ, सरळ बटा सोडू नका.
लांब चौकोनी चेहरा : डायमंड शेप, अर्थात लांबचौकोनी, चेहर्यावर बहुतांशी सगळ्याच हेअरस्टाईल शोभतात. गळ्यामागे मानेवर भरपूर केसांची आणि शक्यतो लहान आकाराची हेअरस्टाईल निवडा. लांब बटा टाळा आणि केस एकत्र करून उंच अंबाडा किंवा पोनीटेलसुद्धा बांधू नका.