ओठावर गोडवा… हृदयात माणुसकीचा निर्मळ झरा… आपुलकीच्या बंधनात विणलेली प्रेमळ नाती… सणांची रेलचेल… खाद्यपदार्थांची मेजवानी… हीच तर खरी आपली संस्कृती. होळी हा ह्या संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आणि होळी म्हटलं की पुणपोळी हवीच की! मऊ, टम्म फुगलेली गरमागरम पुरणपोळी, वरून तुपाची धार… अहाहा! तोंडाला पाणी सुटले ना? पण अनेकदा पुरणपोळी टम्म फुगण्याऐवजी फुटते आणि मग ही कष्टाची वेळखाऊ, फसवी प्रक्रिया नकोशी वाटते म्हणूनच लुसलुशीत पुरणपोळी कशी करायची, हे तर जाणून घेऊयाच, सोबतच पुरणपोळीचे काही मजेशीर, खमंग प्रकारही पाहूयात.
- पुरणपोळी
साहित्य : २ वाटी मैदा, २ वाटी चणाडाळ, गरजेनुसार पाणी, २ वाट्या गूळ, अर्धा टीस्पून वेलची पूड, अर्धा टीस्पून जायफळ पावडर, १ टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ, आवडीनुसार तूप
कृती :
कुकरमध्ये चणाडाळ घाला. चणाडाळीपेक्षा दुप्पट पाणी घलून तीन शिट्या करा. कुकर थंड होऊ द्या.
मैद्याचे पीठ, मीठ, तेल, पाणी घालून, मळून घ्या. (जास्त सैलसर किंवा जास्त घट्ट मळू नका) मळलेले पीठ तासभर ओल्या कपड्यात झाकून ठेवा.
आता गूळ बारीक चिरून घ्या त्यात वेलची, जायफळ पावडर घालून पाणी निथळून घ्या. डाळीत गूळ घाला.
जाड बुडाच्या कढईत हे मिश्रण शिजवायला ठेवा. मिश्रण कोरडे होऊन गोळा व्हायला हवा. (खूप कोरडे करू नका) त्यानंतर हे मिश्रण पुरणयंत्रात घालून पुरण तयार करून घ्या.
ओल्या कपडयात झाकलेले पीठ पुन्हा एकदा नीट मळून घ्या. त्याच्या बारीक पारी करून त्यात आवडीनुसार पुरण भरा (लिंबाच्या आकाराची पारी असेल तर पुरण त्यापेक्षा दुप्पट हवे)
पोळपाटावर मैदा पसरून त्यावर पोळी लाटून घ्या.
तव्यावर खरपूस भाजा वरून तुपाची धार सोडा.
टीप : मैद्याऐवजी कणिक (गव्हाचे पीठ) वापरता येईल. कणिक मळताना अर्धे पाणी व अर्धे दूध घालून मळल्यास पुरणपोळ्या मऊ होतात. - रताळ्याची पुरणपोळी
साहित्य: १ वाटी उकडलेली, कुस्करून घेतलेली रताळी, अर्धा वाटी गूळ, १ वाटी गव्हाचे पीठ, १ वाटी मैदा, पाव टीस्पून जायफळ पूड, १ टेबलस्पून तेल, चवीनुसार तेल, आवडीनुसार तूप
कृती : गव्हाचे व मैद्याचे पीठ वेगवेगळे चाळणीतून काढून एकत्र करून घ्या. त्यात मीठ, तेल, पाणी घालून नीट मळून घ्या. तासभर ओल्या कपड्यात झाकून ठेवा.
गॅसवर पॅनमध्ये उकडून कुस्करलेली रताळी घाला. त्यात किसलेला गूळ घालून सतत ढवळत राहा. जायफळ पूड घाला. कडा सुटायला लागल्यावर त्यात तूप घालून मिश्रण एकजीव करा. पुरण तयार. आता गॅस बंद करा.
पुरण थंड झाले की ओल्या कपडयात झाकून ठेवलेले पीठ पुन्हा थोडे मळून घ्या. त्याच्या पारी करा. त्यात पुरण भरून पुरणपोळी लाटून घ्या.
लाटताना पोलपाटावर मैद्याचे पीठ पसरवून घ्या म्हणजे पोळी नीट लाटता येईल.
पोळी तव्यावर खरपूस भाजून घ्या. वरून तुपाची धार सोडा.
टीप : आवडीनुसार गुळाऐवजी साखर वापरली तरी चालेल. वेलची पूडही टाकू शकता. - बटाट्याची पुरणपोळी
साहित्य : पाव वाटी गव्हाचे पीठ, पाऊण वाटी मैदा, अर्धा वाटी किसलेला गूळ, १ टेबलस्पून तेल, गरजेनुसार पाणी, उकडून कुस्करलेले मध्यम आकाराचे बटाटे, एक टीस्पून वेलची पावडर, १ टीस्पून जायफळ पूड, चवीनुसार मीठ, एक वाटी साखर, आवडीनुसार तूप
कृती : गहू व मैद्याचे पीठ एकत्र करून त्यात मीठ, तेल, पाणी घालून मळून घेणे (नेहमीच्या पोळीच्या पिठापेक्षा थोडे सैलसर मळणे) तासभर ओला कपडा घालून झाकून ठेवणे.
गॅसवर कढई ठेवून त्यात १ चमचा तूप घालून उकडून कुस्करलेला बटाटा परतून घेणे. त्यात साखर घालणे (१ वाटी बटाट्यास १ वाटी साखर) त्यात किसलेला गूळ, वेलची पावडर घालून ढवळून घेणे. कडा सुटू लागल्यावर गॅस बंद करणे. पुरणाचे मिश्रण तयार.
वरील मिश्रण थंड होऊ द्या. ओल्या कपडयावर झाकलेले पीठ नीट मळून घ्या. त्याच्या पारी तयार करा. पुरण घालून पोळी लाटून घ्या. ह्या पोळ्या मैदा, गव्हाचे पीठ किंवा तेल लावून लाटल्या तरी चालेल. खरपूस भाजून वरून तूप सोडा.
टीप : बटाट्याऐवजी दुधी भोपळ्याचा किसही वापरता येईल. साखर, गूळ दोन्ही घेण्याऐवजी केवळ साखर किंवा फक्त गूळ घातले तरी चालेल पण साखर, गूळ एकत्र केल्यास पुरणपोळ्या खूप चविष्ट लागतात. - लाल भोपळ्याची पुरणपोळी
साहित्य : ३ वाटया किसलेला लाल भोपळा, १ वाटी साखर, ३ वाटया मैदा, ५ चमचे मिल्क पावडर, ३ चमचे तेल, चवीप्रमाणे मीठ, पाव टीस्पून वेलची पूड, आवडीनुसार तूप.
कृती : मैद्याचं पीठ, तेल, मीठ एकत्र करून पाणी घालून पीठ मळून घ्या (फार घट्ट किंवा फार पातळ नको) हे पीठ तासभर ओल्या कपडयात झाकून ठेवा.
गॅसवर एका पॅनमध्ये थोडे तूप टाकून त्यावर किसलेला लाल भोपळा परतून घ्या. मिश्रण सुके करायला हवे. थंड झाले की पुरण तयार.
ओल्या कपडयात ठेवलेले पीठ पुन्हा नीट मळून घ्या. त्याच्या पाऱ्या तयार करा. त्यात पुरण भरून पोळपाटावर मैदा पसरवून पुरणपोळी लाटून घ्या.
तव्यावर खरपूस भाजा वरून तूप सोडून गमागरम सर्व्ह करा.
टीप : मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचाही वापर करता येईल. वेलचीसोबत आवडत असल्यास थोडी जायफळ पूड घालावी. - उपवासाची पुरणपोळी
साहित्य : दोन वाटी शिंगाडयाचे पीठ, १ वाटी उकडलेल्या बटाटयाचा कीस, १ वाटी उकडलेल्या रताळ्याचा कीस, १ वाटी साखर, अर्धी वाटी किसलेला गूळ, चवीनुसार मीठ, १ टेबलस्पून तेल, आवडीनुसार तूप
कृती : शिंगाडयाच्या पिठात मीठ, तेल घालून सैलसर मळून घ्या. अर्धा तास भिजवलेल्या कपडयात झाकून ठेवा.
गॅसवर एका पॅनमध्ये बटाटा, रताळ्याचा कीस, साखर घालून परतून घ्या. आता त्यात किसलेला गूळ घाला. गुळाला पाणी सुटून सर्व मिश्रण गोळ्याप्रमाणे जवळ आले की गॅस बंद करा. पुरण तयार. मिश्रण थोडे थंड होऊ द्या.
ओल्या कपडयात गुंडाळून ठेवलेले पीठ पुन्हा मळून घ्या. त्याची पारी करून त्यात पुरण भरा.
पोळपाटावर शिंगाडयाचे पीठ पसरवून पुरणपोळी लाटून घ्या.
पॅनवर छान भाजून वरून तुपाची धार सोडा.
टीप : शिंगाडयाच्या पिठाऐवजी साबुदाण्याचे पीठ किंवा उपवासाचे भाजणीचे पीठ वापरता येईल. यात मळताना अर्धे पाणी व अर्धे दूध घातले तरी पोळी छान होते. हे पीठ लाटताना पोळी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे पोळी थोडी छोटी लाटावी