‘बद’नाम ‘संजू’

0
सत्यघटनांवर आजवर अनेक चित्रपट निघालेत आणि त्यापैकी अनेक गाजलेतही. काल्पनिक कथानकापेक्षा सत्य घटनांवरील कलाकृती अधिक लोकप्रियता मिळवतात असा, आजवरचा अनुभव आहे. अनेक सत्यघटना पडद्यावर पचनी न पडणारं वास्तव दाखवतात म्हणूनच अशा कलाकृतींना विरोधही होतो. अशा अनेक चित्रपटांची नावं सांगता येतील. खळबळजनक खैरलांजी प्रकरणावरील चित्रपटही असाच वादाच्या भोवऱ्यात सापडला. सध्या हवा आहे ती ‘संजू’ चित्रपटाची. अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर चित्रपट पाहून कोणती शिकवण घ्यायची, असा सवाल काही विचारत आहेत. तर त्याचवेळी बॉक्स ऑफीसवर ह्या चित्रपटाने धम्माल करीत १८६ कोटी रूपये गोळा केले आहेत.
शस्त्रास्त्रं बाळगल्याप्रकरणी ‘टाडा’अंतर्गत खटला दाखल झाल्यावर संजय दत्तच्या जीवनातील भल्याबुऱ्या घटना कशा घडत गेल्या, हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेपायी त्याच्या चित्रपटाला गर्दी होणं साहजिक आहे. अगदी त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणो मिळत गेलेल्या राजाश्रयाचीही लोकांना उत्सुकता आहे. पुण्यात १९७६-७७ मध्ये खळबळजनक जोशी-अभ्यंकर हत्याकांड घडलं होतं. त्यात आरोपी होते कॉलेजमधील तरूण. त्या चौघा आरोपींवर १९८६ साली ‘माफीचा साक्षीदार’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रमुख भूमिका होती नाना पाटेकर यांची. त्या सत्यघटनेवरील चित्रपटामुळे आरोपींचं उदात्तीकरण होईल, असं म्हणत शिवसेनेने त्या चित्रपटाला विरोध केला. तत्कालीन शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांनी नाना पाटेकरच त्या चित्रपटात असल्याने तो विरोध मागे घेतला ही बाब अलाहिदा. कालांतराने याच शिवसेनाप्रमुखांनी संजय दत्तला ‘उगवता सूर्य’ असं प्रमाणपत्र दिलं.
एकाच वेळी समाजाकडून तिरस्कार आणि त्याचवेळी कमालीची लोकप्रियता असं वेगळंच जीवन संजय दत्त जगत आला. कारण असंगाशी संग. आईवडील हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित कलाकार दाम्पत्य. इंदिरा गांधी तर त्याच्या आईची मैत्रीणच. वडील सुनील दत्त यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून खासदारकीही पटकावली. पण ह्या काळात दुसरीकडे संजय दत्त संभ्रमावस्थेत जगत होता. त्यात वांद्रे परिसरातील ‘आडेतेडे’ लोक त्याच्या संपर्कात आले. अगदी ड्रग्जपासून शस्त्रास्त्रांपर्यंत सर्वकाही त्याच्या ह्या मित्रंनी त्याला पुरवलं. तब्बल आठ वर्षे तो ड्रग्जच्या आहारी गेला होता. त्याचवेळी त्याला बॉलीवुडमध्ये हिरो म्हणून स्थिरावण्यासाठी दत्त दाम्पत्य धडपडत होतं. ‘रॉकी’ चित्रपटात संजय दत्त हिरो झाला पण चित्रपट साफ कोसळला. संजय दत्तने नशेतच चित्रिकरण केलं की काय, असा प्रश्न तो चित्रपट पाहणारे विचारत होते. त्यानंतर आलेल्या ‘नाम’ चित्रपटाने संजय दत्तची करीयर सावरली आणि ‘साजन’सारखे चित्रपट लोकप्रिय झाले. त्याची लोकप्रियता वाढत असतानाच त्याची वागणूक कशी साधी सरळ आहे, याचे अनेक किस्से चर्चिले जात असत. अगदी स्पॉटबॉयच्या खांद्यावर हात ठेवून गप्पा मारणारा संजय दत्त दोन शॉटच्यामध्ये तो कशी दुसऱ्याची विडी ओढतो, असे किस्से असत.
१९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर दाऊद टोळीविरूद्ध पोलिसांनी मोहीम सुरू केली. तोवर दाऊदने भारतात आरडीएक्स, हॅन्डग्रेनेड आणि काडतुसांचा साठा समुद्रमार्गे पाठवल्याचं उघडकीस आलं होतं. माहिम पोलीस ठाण्यात तत्कालीन पोलीस उपायुक्त राकेश मारीया यांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्बस्फोट मालिकेचा तपास सुरू होता आणि १२ एप्रिल रोजी पोलिसांना एका आरोपीच्या जबानीतून खळबळजनक माहिती मिळाली. संजय दत्तने दाऊद टोळीच्या गुंडाकडून एके ५६ सारखी शस्त्रं घेतली होती. पत्रकारांपर्यंत ही माहिती पोहोचली. पत्रकार त्या दिवशी ह्या माहितीबाबत तपशील जाणून घेण्यासाठी सुनील दत्त यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते. पण तेव्हा सुनील दत्त जर्मनी आणि लंडन दौऱ्यावर होते. त्यामुळे त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. दुसरीकडे संजय दत्तशीही पत्रकार संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते. पण तो मॉरिशसमध्ये चित्रिकरणात असल्याचं सांगण्यात आलं. अखेर वृत्तपत्रांत बातमी आलीच, ‘अभिनेता संजय दत्तकडे एके ५६’. सुनिल दत्त यांच्या अजिंठा बंगल्यावर हलकल्लोळ उडाला. विशेष म्हणजे अशी बातमी देणाऱ्या काही वृत्तपत्रंना त्याच सायंकाळी अॅड. राम जेठमलानी यांची बदनामीविषयक कायदेशीर नोटीसही गेली. पुढील चार दिवस पोलिसांनी ना ह्या बातमीचा इन्कार केला ना बातमी कन्फर्म केली. उलट पोलीस आयुक्त अमरजितसिंह सामरा यांनी पत्रकारांशी बोलताना ‘संजय इनोसंट आहे’ असे उद्गार काढले.
दरम्यान मॉरीशसमध्ये असलेल्या संजय दत्तने पोलीस आयुक्त अमरजितसिंह सामरा यांनाच फोनवरून संपर्क साधला आणि भीत भीत आपल्यावरील आरोपांबाबत विचारणा केली. त्यावेळी सामरा यांनी विचार केला, जर आपण त्याने घेतलेल्या शस्त्रांबाबत विचारणा केली आणि तो भारतात परतलाच नाही तर? त्यांनीही तो विषय ताणून धरला नाही. पण संजयचा फोन ठेवल्यावर त्यांनी आपली स्ट्रॅटिजी नक्की केली. तिकडे संजय दत्तनेही आपली स्ट्रॅटिजी नक्की केली. त्याने मुंबईतील आपल्या एका जिवलग मित्राला फोन केला आणि आपल्या बंगल्यावर जाऊन लपवून ठेवलेल्या एके ५६ नष्ट करण्यास सांगितलं. त्यांनी त्याप्रमाणे आपली कामगिरी पूर्ण केली.
१९एप्रिल रोजी चित्रिकरण आटोपून संजय दत्त मुंबईत येणार, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पत्रकारांनाही त्याला अटक होते का, याची उत्सुकता होती. पोलीस आणि पत्रकार त्या मध्यरात्री सहार विमानतळावर पोहोचले. मॉरिशसहून विमान आलं पण बराच वेळ झाला तरी कुणीही बाहेर आलं नाही. पोलिसांकडूनही काही माहिती मिळेना. विमानतळाबाहेर असलेल्यांना संजय आला की नाही, त्याला पकडलं का, याची काहीच माहिती मिळेना. तिकडे विमानतळाच्या आतील भागात वेगळंच नाटय़ घडत होतं. विमान लँड झाल्यानंतर पोलीस अगदी धावपट्टीपर्यंत पोहोचले तेव्हा रात्रीचे दोन वाजून गेले होते. ठीक २ वाजून १८ मिनिटांनी पोलिसांनी संजयला अटक केली आणि भलत्याच मार्गाने त्याला विमानतळावरून बाहेर काढून थेट क्रॉफर्ड मार्केट येथील पोलीस मुख्यालयात नेलं. एव्हाना संजय दत्त देशद्रोही असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या. त्या आरोपाने सुनिल दत्त खचून गेले होते. पत्रकारांशी संपर्क साधून ते पोटतिडकीने आपलं कुटुंब देशद्रोही असल्याचं छापू नका, अशी विनवणी करीत होते. युद्धकाळात मी आणि नर्गिस सीमेवर जाऊन जवानांचं कसं मनोरंजन करत होतो. देशाची बांधिलकी आपण कशी मानतो, याचे दाखले ते देत होते. पण पोलीस यंत्रणा त्यांचं काम करीत होती.
पोलिसांसमोर संजयने सांगितलेली कहाणी. डिसेंबर १९९२ आणि जानेवारी १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या जातीय दंगलीत सुनिल दत्त यांनी वांद्रयासह पश्चिम उपनगरात अनेक ठिकाणी दंगे थोपवण्याचं काम केलं. त्याला काही जातीय पक्ष, संघटनांचा विरोध होता. अजिंठा बंगल्यावर धमक्यांचे फोन येत होते. ते संजय दत्तही उचलत होता. अश्लील शिवीगाळ होत होती, कुटुंबीयांना ठार मारण्याच्या धमक्या येत होत्या. धमकीसत्रमुळे मी घाबरलो होतो आणि माझ्या कुटुंबीयांचं संरक्षण करण्यासाठी मी अबू सालेममार्फत एके ५६ मागवल्या, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली. पुढचा सारा इतिहास सर्वज्ञात आहे. अत्यंत लाडाकोडात आणि मौजमजेत वाढलेल्या संजयला पोलीस कोठडीत एकएक दिवस काढणं कठीण जात होतं. कोठडीतील इतर कैदी त्याची ही अवस्था अचंबित होऊन पाहत होते. पुढे तो  जामिनावर सुटला. तुरूंगात गमावलेलं आपलं शरीरसौष्ठव त्याने पुन्हा कमावलं. कोर्टात खटल्यासाठी तो तारखेला येई तेव्हा ओळखीच्या पोलिसांना त्याच्याशी हात मिळवण्याचा मोह आवरेनासा होई. अशा एका अतिउत्साही पोलिसावर आयुक्तांना कारवाईही करावी लागली. एकूणच संजय दत्त प्रकरणाने अनेक पत्रकारांना बातम्यांच्या दृष्टीने मसाला पुरवला. पोलिसांना कामाला लावलं. अनेक वकिलांनी ह्या खटल्याच्या कामात सहभाग घेतला. एकूणच संजय दतची ही भानगड दत्त कुटुंबाला भलतीच महागात पडली.
संजय  दत्तवरील ह्या कारवाईला आता पाव शतकाचा काळ उलटला आहे. ह्या कालावधीत संजय शिक्षा भोगूनही तुरुंगाबाहेर पडलाय. ह्या चित्रपटाने आता पुन्हा त्याच्या गतायुष्यातील कृत्य चुकीची आहेत का? त्याच्याबद्दल सहानुभूती वाटावी अशी आहेत का? चित्रपटामुळे तो आदर्श वाटेल का? अशा प्रश्नांवरून चर्चा सुरू झाली आहे. अर्थातच त्याच्या आयुष्यातील अनेक घटना वाईट होत्या. त्याचं कोणत्याही स्थितीत उदात्तीकरण होऊ नये. मग अशा चित्रपटाचं प्रयोजन काय असावं?
यावर सर्वसाधारण असं म्हणता येईल, की चित्रपट पाहून असं आयुष्य कुणाच्या वाट्याला येऊ नयेत, अशा चुका कुणाकडून होऊ नयेत, असं प्रकर्षाने वाटणं हेच अशा चित्रपटांचं खरं यश असायला हवं. पण नीरक्षीरविवेकाने कोण चुकीचा संदेश घेतो, कोण योग्य बोध घेतो हा व्यक्तिसापेक्ष मुद्दा आहे.
Share.

About Author

Comments are closed.

Maintain by Designwell Infotech